अकोला – संतोषकुमार गवई
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत जिल्ह्यासाठी यंदा २ कोटी १० लक्ष रू. निधीची तरतूद आहे. त्यात फळबागेच्या विविध कामांसाठी १०० टक्के अनुदान देय आहे. अधिकाधिक शेतकरी बांधवांनी लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले आहे.
फळबागेसाठी खड्डे खोदणे, कलमे रोपे लागवड, पीक संरक्षण, नांग्या भरणे, ठिबक सिंचनाव्दारे पाणी देणे आदी कामे होतात. त्यानुसार अनुदानाची रक्कम फळपीक व लागवडीच्या अंतरानुसार प्रति हेक्टरी मापदंडाप्रमाणे निश्चित होईल व प्रति हेक्टरी कमाल अनुदान मर्यादेनुसार रक्कम लाभार्थ्यास ३ वर्षाच्या कालावधीत ५०:३०:२० या प्रमाणात दिली जाईल. योजनेमध्ये आंबा, संत्रा, मोसंबी, कागदी लिंबू, चिकू, सीताफळ, पेरु, आवळा, चिंच, जांभूळ, फणस आदी पिकांचे किमान ०.२० हे. ते कमाल ६ हे. क्षेत्र मर्यादेपर्यंत लाभ अनुज्ञेय राहील.
योजनेअंतर्गत जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून महाडीबीटी प्रणालीवर प्राप्त अर्जानुसार सोडतीव्दारे लाभार्थीची निवड करण्यात येत असून लॉटरीनंतर लाभार्थी जागा पाहणी, कागदपत्रे छानणी व पूर्वसंमती देणे, अंदाजपत्रके तयार करून तांत्रिक-प्रशासकीय मंजुरी देणे व प्रत्यक्ष लागवडीनुसार अनुदान अदा करणे अशा टप्प्यांमध्ये कार्यवाही होणार आहे. जून, जुलै व ऑगस्ट मध्ये अर्ज करावयाच्या कालावधीमध्ये जास्तीत जास्त फळबाग लागवड करण्यास इच्छुक शेतकरी यांनी कृषी महाडिबीटी पोर्टलवर अर्ज करून योजनेत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्री. कुंभार व जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर किरवे यांनी केले आहे.