रामटेक – राजु कापसे
रामटेक तालुक्यांतर्गत येत असलेल्या गट ग्राम पंचायत बोरडा येथे लालतोंडया माकडांनी हैदोस घातला असून एकाच दिवशी लहान मुलीसह ७ महिलांना जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तरी वनविभागाचा याकडे कोणतेही लक्ष नसल्याचे आरोप होत आहेत.
माहितीनुसार,रामटेक तालुक्यातील बोरडा (सराखा) येथे गेल्या अनेक दिवसांपासून लालतोंडी व काळतोंडी या दोन्ही प्रकारच्या माकडांनी धुमाकूळ घातला आहे.तर वाळू घातलेले कपडे काढायला गच्चीवर गेलेल्या एकाच घरच्या दोन्ही तरुण मुलीच्या मागे माकड धावल्याने पायऱ्यांवरून खाली पडून दोन्ही मुलींना गंभीर इजा झाली होती.
त्यावेळी सुद्धा वनविभागाने कोणत्याच प्रकारची माकडांची सोय केली नाही. म्हणूनच एकाच दिवशी एका लहान मुलीसह सात महिलांना लालतोंडया माकडांनी चावा घेत त्यांना जखमी केले आहे.या घटनेने संपूर्ण गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून परिसरातील लोकांनी घराबाहेर पडणे बंद केले आहे.
घटनेची माहिती वनविभागाला दिल्यानंतर त्यांनी पर्यायी व्यवस्था म्हणून पिंजरे आणून ठेवले मात्र त्या पिंजऱ्यांचा उपयोग कुठल्याही परिस्थितीत झाला नाही. या ठेवलेल्या पिंजऱ्यात माकडे येणार नाहीत त्यांना पकडण्यासाठी वनविभागाने रेस्क्यू टीम बोलावून त्यांचा रेस्क्यू करावा अशी मागणी गावकऱ्यांनी धरून ठेवली आहे.
वारंवार वनविभागाला व ग्रामपंचायतीला पत्रव्यवहार करून देखील माकडांचा बंदोबस्त न केल्याने समस्त गावकरी त्रस्त झाले आहेत.आता या माकडांचा वाढता हैदोस पाहून त्यांचा बंदोबस्त तात्काळ वनविभागाने करावा अन्यथा वनविभागाच्या कार्यालयासमोर गावकऱ्यांमार्फत जनआंदोलन करू असा इशारा यावेळी बोरडा येथील नवनिर्वाचित सरपंच तुळशीदास राऊत यांनी दिला आहे.