Friday, November 22, 2024
Homeराज्यमोदींच्या गॅरंटीने महाराष्ट्र व मुंबईचा गुन्हेगारीत दुसऱ्या क्रमांकावर ‘लौकिक’ - नाना पटोले...

मोदींच्या गॅरंटीने महाराष्ट्र व मुंबईचा गुन्हेगारीत दुसऱ्या क्रमांकावर ‘लौकिक’ – नाना पटोले…

शिंदे, फडणवीस व अजित पवारांनी गुन्हेगारीत महाराष्ट्राचा युपी केला.

कायदा सुव्यवस्थेवर हिवाळी अधिवेशनात सरकारला जाब विचारणार.

मुंबई – कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत महाराष्ट्र व मुंबईचा आजवर मोठा नावलौकिक होता, याला भारतीय जनता पक्षाच्या सरकारने कलंक लावला आहे. राष्ट्रीय गुन्हा नोंद विभागाने (NCRB) ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार महिला अत्याचार, खूनासारख्या गंभीर गुन्ह्यात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे तर महिलांसाठी देशात सर्वात सुरक्षित असलेले मुंबई शहर आता महिला अत्याचारांमध्येही दुसऱ्या क्रमांकावर आहे.

मोदींची गॅरंटी व शिंदे, फडणवीस व अजित पवारांच्या सरकारने गुन्हेगारीच्या बाबतीत महाराष्ट्राला उत्तर प्रदेशच्या पंगतीत बसवून नावलौकिकाला कलंक लावला आहे, अशी जळजळीत टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

यासंदर्भात प्रतिक्रीया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपा सरकारवर तोफ डागली, ते पुढे म्हणाले की, महाविकास आघाडीचे सरकार कटकारस्थान करून पाडून असंवैधानिक मार्गाने सत्तेत आलेल्या भाजपा सरकारमधील आमदार, खासदारच गुंडगिरी करतात, गोळीबार करतात, हातपाय तोडण्याची धमकी देतात, लोकप्रतिनिधींनाही धमक्या दिल्या जात आहेत. अपहरणात महाराष्ट्र व मुंबईचा दुसरा क्रमांक आहे.

राज्यातून महिला व मुली बेपत्ता होण्याच्या प्रकारात प्रचंड वाढ झालेली आहे. महिला अत्याचारात राज्यात १५ टक्क्यांची वाढ झालेली आहे तर मुलांवरील अत्याचारात २० टक्क्यांनी वाढ झालेली आहे. राज्यात दर तासाला महिला अत्याचाराच्या पाच गुन्ह्यांची तर लहान मुलांवरील अत्याचारांच्या दोन गुन्ह्यांनी नोंद होत आहे. भाजपाची ‘बेटी बचाव’, योजना कागदावरच दिसत आहेत, प्रत्यक्षात परिस्थीती अत्यंत भयावह आहे हे अहवालावरूनही स्पष्ट होत आहे.

महिला बेपत्ता प्रकरणासंदर्भात पोलीस महासंचालकांकडे काँग्रेस शिष्टमंडळाने तक्रार दाखल केली होती, राज्यपाल महोदयांकडेही राज्यातील कायदा सुव्यवस्थेसंदर्भात निवदेन दिले होते पण भाजपा सरकारच्या कारभारात काहीही फरक पडलेला दिसत नाही.

एनसीआरबीच्या अहवालातील गुन्हेगारीचे आकडे महाराष्ट्रासाठी धोक्याचे आहेत. मुंबई पोलिसांचे जगात मोठे नाव आहे, महाराष्ट्र पोलीसांची कामगिरीही यापूर्वी चांगली राहिली आहे पण भाजपा सरकारच्या काळात पोलीस दलात होत असलेला सत्ताधारी पक्षांचा हस्तक्षेप ही गंभीर बाब आहे.

गृहखात्याला पुर्ण वेळ मंत्री नाही, देवेंद्र फडणवीस यांना सहा-सहा जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद, इतर विभागाचा कारभार व पक्ष फोडाफोडीतून गृहविभागाकडे लक्ष देण्यास वेळच मिळत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे शहरात गुन्हेगारी व अवैध धंद्यांचे पेव फुटले आहे.

उपमुख्यमंत्री व गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांचा गृहजिल्हा नागपूरातही गुन्हेगारी वाढलेली आहे तर दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुण्यात कोयता गँगने हैदोस माजवला आहे. दुसऱ्यांचे पक्ष फोडून खुर्ची मजबूत करण्यातून या तिघांनाही राज्यातील कायदा सुव्यवस्थेकडे लक्ष देण्यास वेळ नाही.

राजकीय साठमारीत महाराष्ट्रात गुन्हेगारी बोकाळली आहे, याला वेळीच आळा घातला नाही तर गंभीर परिस्थीतीला तोंड द्यावे लागले. ७ तारखेपासून सुरु होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात सरकारला यावर उत्तर द्यावेच लागले, असा इशारा नाना पटोले यांनी दिला आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: