सांगली – ज्योती मोरे
महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन (एम.बी.ए.) राज्य शिखर संघटनेच्या चुरशीच्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष अरुण लखानी यांनी माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रदीप गंधे यांच्यावर सहज विजय मिळवून राज्य संघटनेच्या अध्यक्षपदी व सांगलीचे कार्यसम्राट मा.आ. सुधीरदादा गाडगीळ हे उपाध्यक्ष पदी उंचाकी मताने निवडून आले. ठाण्याचे बॅडमिंटन प्रशिक्षक श्रीकांत वाड यांची सचिव पदी निवड झाली आहे.
रविवारी नागपुरमध्ये झालेल्या निवडणुकीत लखानी पॅनेलने एका पदाशिवाय सर्व पदे जिंकली. अध्यक्षपदा साठी अरुण लखानी यांना ३७ तर उपाध्यक्ष पदासाठी आ. सुधीर दादा गाडगीळ यांनाही ३७ मते मिळाली. सचिव पदासाठी श्रीकांत वाड यांना २९ मतांसह विजयी झाले. महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या (एम.बी.ए.) ३५ संलग्न जिल्ह्यांतील प्रतिनिधित्व करणाऱ्या तब्बल ५२ प्रतिनिधींनी मतदान केले. या राज्य बॅडमिंटन शिखरसंघटनेवर २५ सदस्यीय मंडळ २०२२ ते २०२६ पर्यंत चार वर्षांच्या कार्यकाळासाठी पद धारण करतील.
आमदार सुधीरदादा गाडगीळ यांची उपाध्यक्ष पदी निवड झाल्याने बॅडमिंटन युवा खेळाडूंमध्ये उत्साहाचे वातावरण झाले असून बॅडमिंटन क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे. सध्या ते सांगली जिल्हा शटल बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष आहेत.