सांगली – ज्योती मोरे.
महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठीचे श्री. मनोज जरांगे-पाटील करीत असलेले आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत चाललेले आहे. जरांगे-पाटील यांनी गांधीजींच्या तत्वाने उपोषणाच्या माध्यमातून आरक्षणाची मागणी केली आहे. आज आरक्षणाचा ८ वा दिवस असून मराठा समाजाने नेहमीच सर्व जाती-धर्मांमध्ये सलोखा निर्माण करत मोठया भावाची भूमिका निभावलेली आहे.
मराठा समाजातील अनेक सर्वसामान्य कुटुंबांची परिस्थिती आज खूपच बिकट आहे. ती निश्चितच सर्वानी समजावून घेण्याची गरज आहे. आजवर लाखो मराठा कुटुंबे भूमिहीन झाली आहेत. कधी सततचा दुष्काळ तर कधी अतिवृष्टी यामुळे त्यांच्या कुटुंबाची पार वाताहत झाली. कर्जबाजारीपणामुळे त्यांचा आत्मसन्मान हरवला. कुटुंबातील लोकांच्या जगण्याचे, मुलामुलींच्या शिक्षणाचे आणि लग्नाचे प्रश्न उग्र रूप धारण करत आहेत.
फक्त जात “मराठा” म्हणून त्यांची शिक्षणाची व नोकरीची संधी डावलली जाणे हे निश्चितच त्यांच्यासाठी अन्यायकारक आहे. आपल्या सरकारने कुणबी अशी नोंद असलेल्या लोकांना प्रथम टप्प्यात कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. परंतु मराठा समाजाच्या पुढील दिशा मजबूत करण्यासाठी सरसकट मराठा समाजाला आरक्षण देणे गरजेचे आहे.
तसेच सद्यस्थितीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहणे करिता आणि मराठा आरक्षणाबाबत तातडीने तोडगा काढण्यासाठी व या प्रश्नाचे कायमस्वरुपी उत्तर शोधण्यासाठी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलाविणेत यावे अशी मागणी पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे देऊन आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी केली आहे.