आमदार बच्चू कडू आणि बडनेराचे आमदार रवी राणा यांच्यातील वादावर पूर्णविराम लागण्याची शक्यता असून रवी राणा यांनी आपण बोललेले शब्द मागे घेतो असे बैठकीनंतर नंतर जाहीर केलं. या वादावर तोडगा काढण्यासाठी स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेत ‘वर्षा’वर चर्चेसाठी बोलावलं होतं. तर आज सकाळी सागर बंगल्यावर उपमुख्मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्यानतरच रवी राणा यांनी माघार घेत आमदार बच्चू कडू यांची जाहीर माफी मागत दिलगिरी व्यक्त केली आहे.
माझ्याकडून काही बोललं गेलं असेल तर, परत घेतो. माझ्यासाठी हा विषय संपला आहे. परंतु, बच्चू कडू यांनीही आपले अपशब्द मागे घेतले पाहिजेत, असं रवी राणा यांनी म्हटलं आहे. मात्र अद्यापही या वादावर आमदार बच्चू कडू यांनी यांच्याशी कोणतेही चर्चा झाली नसून चर्चे नंतर बच्चू कडू यांच्याकडून स्पष्ट होणार आहे. यावरच उद्या एक तारखेला आमदार रवी राणा यांना पुरावे सादर करण्याचा अल्टिमेटम दिला होता. आमदार रवी राणा यांनी माफी मागित्यानंतर हा विषय मिटतो की वाढतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
बच्चू कडू बैठकीआधी काय म्हणाले?
“आता आम्ही चर्चेला बसणार आहोत. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे आहेत. चर्चा काय होते, समाधान काय होतं, त्यावर पुढचं ठरवलं जाईल. आमच्यावर झालेले आरोप फार गलिच्छ आणि खालच्या स्तराचे आहेत. त्यामध्ये कार्यकर्त्यांचं समाधान झालं तर आपण पुढचा निर्णय जाहीर करु”, असं बच्चू कडू यांनी बैठकीला पोहोचल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं.
“रवी राणा यांनी इतकी मोठी बदनामी केली आहे, त्यामुळे त्यांनी माफी मागावी या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत”, असं बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं. “१ तारखेला आंदोलन होणार आहे. तोडगा निघाला नाही तर आंदोलन होणारच. कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. त्यामुळे ते आल्यानंतर निर्णय घेऊ”, असं ते म्हणाले.