आकोट- संजय आठवले
वैशिष्ट्यपूर्ण निधी अंतर्गत आकोट शहरातील रामेश्वर स्मशानभूमी नूतनीकरणाचे कामात चक्क आमदार प्रकाश भारसाखळे यांनीच खोडा घातल्याचे स्पष्ट झाले असून पालिकेकडून योग्य तो प्रतिसाद न मिळाल्याने कंत्राटदार अतिशय हैरान झाला आहे. परिणामी हे काम बंद पडलेले आहे. त्या विरोधात एका संघ कार्यकर्त्यांने स्मशानभूमी समोर आमरण उपोषण सुरू करून आमदार भारसाखळेंना घरचा आहेर दिला आहे. आमदार भारसाखळेंमुळे हा प्रसंग आल्याने संघ परिवारात मोठा रोष निर्माण झाल्याचे चित्र आहे.
सन २०१७-१८ मध्ये वैशिष्ट्यपूर्ण निधी अंतर्गत आकोट शहरातील रामेश्वर स्मशानभूमी नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले. निविदा बोलाविणे, उघडणे आदी सोपस्कार पार पाडल्यावर कंत्राटदार सुनील अंबळकर यांना दिनांक १३ सप्टेंबर २०१९ रोजी या कामाचा कार्यारंभ आदेश देण्यात आला. त्या काळात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने काम सुरू होऊ शकले नाही. त्याच दरम्यान निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाल्याने आकोट पालिकेने दिनांक २६.९.२०१९ रोजी कंत्राटदारास काम बंदच ठेवण्याचे आदेश दिले. त्यामुळे हे काम सुरूच झाले नाही. त्यानंतर दिनांक ४.१२.२०१९ रोजी पालिकेने काम सुरू करणे संदर्भात कंत्राटदारास कळविले. त्यानुसार पालिका बांधकाम अभियंता शर्मा व वाघमारे यांचे सल्ल्यानुसार कंत्राटदाराने वाचमेन केबिनचे काम पूर्ण केले. परंतु त्यानंतर करावयाच्या कामाकरिता कंत्राटदारास पालिकेकडून फाउंडेशन स्लॅब, स्टील डिझाईन व कामाचे लेआउट देण्यात आले नाही. तसेच केबिनचे देयकही अदा केले गेले नाही. त्यावर या बाबींची पूर्तता करणे संदर्भात कंत्राटदाराने दिनांक २१.९.२०२० रोजी पालिकेला कळविले.
परंतु त्या संदर्भात पालिकेने कोणतेही पाऊल उचलले नाही. उलट “या कामाची मोजमाप पुस्तिका गहाळ झालेली आहे. ती सापडतच नाही. त्यामुळे तुम्हाला देयक देता येणार नाही.” असे बांधकाम अभियंता करण अग्रवालने कंत्राटदारास सांगितले. याच दरम्यान स्मशान भूमीतील नवीन शेडचे काम जोत्यापर्यंत आलेले होते. पुढील काम करणेकरिता स्मशानभूमीतील जुने शेड पाडणे आवश्यक झाले. त्यामुळे बांधकाम अभियंता यांनी कंत्राटदारास हे शेड स्वखर्चाने पाडण्यास सांगितले. वास्तविक कामाच्या अंदाजपत्रकात याबाबत कोणताही उल्लेख नाही. त्यामुळे “हे काम पालिकेनेच करावे अथवा माझ्याकडून करावयाचे असल्यास मला तसा लिखित आदेश द्यावा” असे कंत्राटदाराने म्हटले. यासोबतच त्याने आपल्या समस्या दि. १३.७.२०२२ च्या पत्रान्वये पालिकेस कळविल्या. यातील एका मुद्द्याने अख्खी पालिका आणि खुद्द विकास पुरुष आमदार भारसाखळे यांचा अंतस्थ हेतू उघड झाला. तो मुद्दा असा कि, कंत्राटदाराने हे काम सुरू करताच महिनाभरातच पालिकेतील एका भाजपा नगरसेविकेच्या पतीने कंत्राटदारास कामाच्या रकमेतील १०% रकमेची मागणी केली. हा नगरसेविका पती फार मोठा दबंग अथवा प्रस्थापित नेता नाही. त्यामुळे स्वतःकरिता ५/२५ हजाराहून अधिकची मागणी करण्याची त्याची जराही औकात नाही. त्यामुळे या मागणीमागे कुणीतरी डायनासोर नेता असल्याचे लगेच ध्यानी येते. आणि हा डायनासोर नेता दुसरा तिसरा कुणी नसून आमदार भारसाखळेंच असल्याचेही लक्षात येते. कंत्राटदाराने ही बाब तत्कालीन बांधकाम अभियंता वाघमारे यांना सांगितली. परंतु या मागणीचे धागेदोरे वाघाशी नाही तर थेट डायनासोरची जुळून आल्याने आणि अभियंता डायनासोरमारे नाही तर वाघमारे असल्याने त्यांनी ही बाब कान बंद करून ऐकली. आणि तिला तिथेच पूर्णविराम दिला.
याच दरम्यान या कामास शासनाकडून दि.३१.३.२०२२ पर्यंत मुदत वाढ देण्यात आली. त्यावर पालिकेने कंत्राटदारास पत्र देऊन मुदत वाढीचे पत्र तुम्हास प्राप्त झाल्याचे सांगितले. सोबतच कामासंदर्भात कंत्राटदारावर विविध आक्षेप घेणारे पत्र दि. १०.८.२०२२ रोजी कंत्राटदारास पाठवले. वास्तविक मुदतवाढीबाबत कंत्राटदारास काहीही कळविण्यात आलेले नव्हते. त्यावर “या कामाची मोजमाप पुस्तिका गहाळ झालेली असल्याने मला देयक अदा करण्यात आलेले नाही. ते देण्यात यावे. सोबतच जुने शेड पाडून द्यावे.” असे कंत्राटदाराने दिनांक २५.८.२०२२ च्या पत्रांन्वये पालिकेस कळविले. या पत्राची प्रतिलिपी त्याने आमदार भारसाखळे यांनाही दिली.
परंतु पालिकेने याकडे दुर्लक्ष केल्याने हे काम रेंगाळतच राहिले. म्हणून मग हे प्रकरण विकास पुरुष आमदार प्रकाश भारसाखळे यांचे दरबारात दि. ४.१०.२०२० रोजी रुजू करण्यात आले. त्याप्रसंगी मुख्याधिकारी व कंत्राटदार सुनवाईकरिता उपस्थित होते. त्यावेळी झालेल्या चर्चेत “तुम्ही काम सुरू करा. तुम्हाला तुमच्या कामाचे देयक व पालिकेद्वारे लागणारी तांत्रिक मदत दोन ते तीन दिवसात मिळून जाईल” असे फर्मान विकास पुरुष आमदार भारसाखळे यांनी सोडले. त्यामुळे विकास पुरुषाचे मुखातून बाहेर पडलेल्या देववाणीनुसार मुख्याधिकाऱ्याने वर्तन करणे अपेक्षित होते. त्याच दरम्यान दिवाळीही उंबरठ्यावर होती. परंतु मुख्याधिकारी यांनी कंत्राटदाराचे देयक अडकवून ठेवले. यासंदर्भात कंत्राटदाराने तत्कालीन मुख्याधिकारी मेघना वासनकर यांची भेट घेतली असता, “आमदार साहेबांनी तुमचे देयक न देण्याचे आदेश दिले आहेत.” असे त्यांनी कंत्राटदारास सांगितले. आणि त्याच क्षणी आमदार भारसाखळे यांच्या अंतस्थ हेतूची दुसरी पाकळी उमलली.
यासोबतच कंत्राटदार सुनील अंबळकार ह्यास पालिकेद्वारे देयक, तांत्रिक मुद्द्यांची पूर्तता, व जुने शेड पाडण्याची कृती का केली जात नाही, याचा उलगडाही झाला. तो असा कि, हे काम सुनील अंबळकार यांना मिळणे आमदार भारसाखळे यांना मुळातच पसंत नव्हते. या नापसंतीचे धागेदोरे सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता प्रवीण सरनाईक यांचेशी जुळतात. परंतु तो आताचा मुद्दा नाही. म्हणून हे काम अंबळकार यांना मिळणे हे भारसाखळेंना नापसंत होते एवढेच तूर्तास लक्षात ठेवणे गरजेचे आहे. राहिला जुने शेड पाडण्याचा प्रश्न. तर त्या संदर्भात वेगळीच चर्चा कानी आली. ती अशी कि, पालिकेने हे शेड पाडण्याचे सुमारे दोन अडीच लक्ष रुपयांचे अंदाजपत्रक तयार केलेले आहे. त्यामुळे हे शेड जुन्या कंत्राटदाराकडून पाडून घ्यावे आणि या अंदाजपत्रकानुसार कागदपत्रे तयार करून ते दोन अडीच लक्ष रुपये आयतेच खिशात घालावेत अशी व्यूहरचना पालिकेने केल्याची कुजबूज आहे.
त्यामुळे अखेरीस कंटाळून कंत्राटदार सुनील अंबळकार यांनी थेट विकास पुरुष आमदार भारसाखळे यांना दि.१९.१.२०२३ रोजी पत्र लिहिले आहे. त्यात “आपणास हे काम मला करू द्यायचे नाही. हे माझे लक्षात आले आहे. करिता माझ्या आतापर्यंतच्या कामाचे देयक मला अदा करावे”. असे सरळ वक्तव्य त्यांनी केले आहे. आणि इथे आमदार भारसाखळे यांच्या अंतस्थ हेतूचे फुल पूर्णपणे उमलले. यावरून विकास पुरुष आमदार भारसाखळे यांनीच या कामात खोडा घातल्याचे व अंबळकार यांना विवश करून त्यांनी काम सोडावे असे षडयंत्र केल्याचे ध्यानात येते.
आता हे काम पूर्ण करून दोषींवर कारवाई करण्यासंदर्भात संघ कार्यकर्ता संजय शेळके यांनी आमरण उपोषण मांडले आहे. त्यामुळे या प्रकरणाची चांगलीच घुसळण होऊन त्यातून आमदार भारसाखळे यांच्या मनातील हेतूचे लोणी बाहेर निघत आहे. परंतु संजय शेळके यांचे मागणीनुसार चौकशी झाल्यास हे काम आमदार भारसाखळे यांचे मुळेच बंद पडल्याचे उघड होणार आहे. याची आकोटकरांना कल्पना आली आहे. त्यामुळे आमदार भारसाखळे आपल्या षडयंत्रापायी शहरातील युवकांना उपोषण करावयास लावून त्यांचा बळी घेत आहेत की काय? असा प्रश्न चर्चिला जाऊ लागला आहे. आणि त्यामुळेच शहरात आणि संघ परिवारात आमदार भारसाखळेंबाबत मोठा रोष निर्माण झालेला आहे.