Saturday, November 16, 2024
Homeराजकीयराष्ट्रवादीच्या एन्ट्रीने घसरला आमदार भारसाखळे यांचा टक्का…नजरेआड गेला आता मंत्रीपदाचा मोका…

राष्ट्रवादीच्या एन्ट्रीने घसरला आमदार भारसाखळे यांचा टक्का…नजरेआड गेला आता मंत्रीपदाचा मोका…

आकोट- संजय आठवले

राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा झालेल्या उलथा पालथीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक धडा तुटून सत्ताधारी भाजपच्या मांडीवर जाऊन बसल्याने आमदार भारसाखळे यांचे मंत्री बनवण्याचे स्वप्न धुसर होत अगदी नजरेआड झाल्याची चिन्हे असून आकोट मतदार संघाला ह्यावेळीही लालबत्ती हुलकावणी देणार असल्याचे दिसत आहे.

आमदार प्रकाश भारसाखळे आकोट मतदार संघातून सलग दोनदा विजयी झाले. प्रथम विजयानंतरच त्यांना लालबत्ती मिळविण्याची महत्त्वाकांक्षा होती. परंतु मागील २०१४ ते २०१९ या पाच वर्षात त्यांना मंत्रीपदाने हुलकावणी दिली. दुसऱ्या निवडणुकीतही ते निवडून आले. परंतु सत्ता मात्र महाविकास आघाडीने पळविली. त्यामुळे भारसाखळेंना ‘हाताची घडी आणि तोंडावर बोट’ ठेवून शालेय विद्यार्थ्यागत शिस्तीत बसावे लागले. परंतु पुण्यापुऱ्या अडीच वर्षानंतर राज्यातील राजकारणाने कुस बदलली. आणि त्याला निमित्त्य ठरली सत्ताधारी शिवसेनेतील उभी फूट.

या फुटी नंतर पुन्हा भाजप शिवसेना फुटीर गटासह सत्तेत आली. त्याने भारसाखळे यांना अगदी आनंदाचे भरते आले. त्यांच्या मंत्रीपदाच्या महत्त्वकांक्षेचा राखेखाली दबलेला निखारा पुन्हा प्रज्वलित झाला. मंत्री पदाकरिता त्यांनी जोरदार फिल्डिंग लावली. परंतु भाजपामधील गटातटाचे राजकारण पाहू जाता भारसाखळे हे गडकरी गटाचे मानले जातात. पण राज्याच्या राजकारणात फडणवीसांचा सर्वत्र बोलबाला असल्याने त्यांचेच नाणे खणखणत होते. त्यामुळे साहजिकच मंत्रिमंडळात त्यांच्याच निकटवर्तीयांचा दबदबा असणार हे उघड होते.
त्यातच शिवसेना फुटीर गटालाही मंत्रीपदे विभागून देणे अपरिहार्य होते. अशा स्थितीत शिवसेना फुटीर गटाच्या निवडणूक आयोग आणि
न्यायालयात वाऱ्या सुरू झाल्या. मुख्यमंत्री शिंदेंसह १६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा धगधगत होता. त्यामुळे सत्ताधारी मंत्रिमंडळ विस्ताराला घाबरत होते. अशात शिंदे फडणवीस या दोघांनीच राज्याचा संपूर्ण गाडा वाहून नेला. अखेर निवडणूक आयोगाचा निकाल आला. शिवसेना हे नाव आणि चिन्ह फुटीर गटाला बहाल करण्यात आले.

या निकालाने सत्ताधाऱ्यांचा जीव काहीसा भांड्यात पडला. म्हणून मग त्यांनी भाजप आणि सेना मिळून १८ लोकांना मंत्रिपदे दिली. २८८ इतक्या संख्याबळाकरिता ४३ मंत्रिपदे मिळू शकतात. त्यामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि १८ मंत्री मिळून २० मंत्री पदांचे वाटप करण्यात आले. २३ मंत्रिपदे रिक्तच राहीली. या अटीतटीच्या खेळात आमदार भारसाकळे यांची मात्र वर्णी लागलीच नाही. ते हिरमुसले. पण ना उमेद झाले नाहीत. पुढील विस्तारात आपला विचार होईल अशी त्यांना आशा होती. अशीच आशा भाजपाच्या व फुटीर शिवसेना गटालाही होती. त्यामुळे भारसाखळे यांनी आपली फिल्डिंग टाईटच ठेवली. आणि योग्य संधीची प्रतीक्षा करू लागले.

पण हाय रे दैवा…. राज्यातील राजकारणाने पुन्हा कुस बदलली. यावेळी कुस बदलताना भाजपच्या टप्प्यात राष्ट्रवादी काँग्रेस सापडली. अजित पवार यांचे नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा धडा भाजप सेनेच्या सत्तेचा भागीदार बनला. त्यामुळे साहजिकच या गटाला मंत्रिपदे देणे अपरिहार्य होते. त्यानुसार या गटाला ९ मंत्री पदांची खिरापत वाटली गेली. म्हणजे रिक्त २३ मंत्रीपदातून ९ वगळल्यानंतर केवळ १४ मंत्री पदे शिल्लक राहिलेली आहेत. त्यातच आपल्याला आणखी मंत्री पदे मिळणार असल्याचे सुतोवाच अजित पवारांनी केलेले आहे. म्हणजे ही १४ मंत्रीपदे भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांमध्ये वाटली जाणार आहेत.

अशा अवघड स्थितीत अत्यंत मातब्बर, वजनदार आणि येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत दमखम दाखविणाऱ्यांचीच पुढील विस्तारात मंत्रीपदी वर्णी लागणार आहे. दुर्दैवाने भारसाखळे यातील एकाही कसोटीवर खरे उतरत नाहीत. त्यातच भाजप संपूर्ण देशात गुजराथ पॅटर्न राबविणार आहे. त्यानुसार ७५ वर्षे वय झालेल्या, जनतेच्या मनातून उतरलेल्या, पक्ष प्रसार प्रचारात कुचकामी ठरलेल्या उमेदवारांना भाजप रिपीट करणार नाही. यामध्ये भारसाखळे हे वयाच्या कसोटीत बसत नसले तरी उर्वरित दोन कसोट्यांमध्ये ते नापास ठरतात. त्यातच जिल्ह्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही त्यांचे बाबत नाक मुरडलेले आहे. या सर्व बाबींचा साकल्याने विचार करता, आमदार भारसाखळे यांचे पासून मंत्रीपदाची खुर्ची कोसो दूर अंतरावर अगदी नजरेच्या टप्प्या बाहेर जाणार हे निश्चित. परिणामी सुधाकरराव गणगणे यांचे नंतर दुरावलेली लालबत्ती आपल्या नशिबी येईल हे आकोट मतदार संघातील नागरिकांचे स्वप्न स्वप्नच राहणार असल्याचे दिसते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: