Sunday, December 22, 2024
Homeशिक्षणआमदार भारसाखळे यांचे दुर्दम्य साहस…आकोट आयटीआय समस्यांच्या वेढ्यात…मात्र भारसाखळे देणार आहेत विद्यार्थ्यांना...

आमदार भारसाखळे यांचे दुर्दम्य साहस…आकोट आयटीआय समस्यांच्या वेढ्यात…मात्र भारसाखळे देणार आहेत विद्यार्थ्यांना करिअर संधीचे धडे…

आकोट- संजय आठवले

आकोट- तेल्हारा मतदार संघातील विविध क्षेत्रात आपल्या अचाट कर्तृत्वाने मतदारांना चक्क पांढरे डोळे करावयास लावणारे विकास पुरुष आमदार प्रकाशभाऊ भारसाकळे यांनी आता समजदार लोकांवर डोळे मिटून घेण्याची पाळी आणणारे दुर्दम्य साहस करण्याचे योजिले असून स्वतः दहावी नापास असल्यावरही ते चक्क दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण, रोजगार, व्यक्तिमत्व विकास व करिअर संधी या विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे ज्याचे वतीने हे आयोजन करण्यात आले आहे तो आकोट आयटीआय समस्यांच्या वेढ्यात असताना त्याकडे ढुंकूनही न पाहता भारसाखळे हा उपक्रम करणार आहेत हे विशेष.

राज्यातील दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन होऊन त्यांना करिअरच्या संधी उपलब्ध होणेकरिता राज्य शासनाद्वारे प्रत्येक मतदारसंघनिहाय मार्गदर्शन शिबिरे घेण्याचे धोरण आखण्यात आले आहे. या शिबिरामध्ये दहावी व बारावीनंतरचे महाविद्यालयीन शिक्षण व अभ्यासक्रम, तरुणांसमोरील रोजगारांची आव्हाने, व्यक्तिमत्व विकास, नवीन तंत्रज्ञान आधारित प्रशिक्षण व रोजगाराच्या संधी आणि शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना व कर्ज योजना माहिती या विषयांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन होणे अपेक्षित आहे. या धोरणानुसार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आकोट व तेल्हारा यांचे संयुक्त विद्यमाने आकोट शहरात या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १५ मे रोजी सकाळी ९ वा. श्रद्धासागर या ठिकाणी हे शिबिर होत आहे. दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक ए. एस. सोळंके, प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था तेल्हारा तथा एस. डी. हिवराळे प्रभारी प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था आकोट यांनी केले आहे.

या शिबिराचे वैशिष्ट्य हे आहे कि, अगदी अल्पशिक्षित म्हणजे केवळ दहावी नापास असलेले आमदार प्रकाशभाऊ भारसाकळे या शिबिराचे उद्घाटक आहेत. उद्घाटनानंतर उपस्थितांना त्यांचे बहुमोल मार्गदर्शनाचा अलौकिक लाभही होणार आहे. दहावी व बारावी उत्तीर्ण झाल्यावर पुढील महाविद्यालयीन शिक्षण व अभ्यासक्रम कसा निवडावा? कसा पूर्ण करावा? रोजगाराची आव्हाने कशी पेलावीत? त्याकरिता व्यक्तिमत्व विकास कसा करावा? आदी अनेक पैलूंवर भारसाखळे दिव्य प्रकाश पाडणार आहेत. त्यांच्या या वर्तनाने मतदार संघातील नवतरुणांची त्यांना अतिव काळजी असल्याची धारणा स्वाभाविकपणे होते. परंतु त्याच क्षणी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आकोटची स्थिती पाहिली असता, आमदार भारसाखळे यांचे अस्सल रूप ध्यानात येते.

आकोट औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे बांधकाम वगळता उर्वरित १९ एकर जागेपैकी १.५ एकर जागा महावितरण अकोला या कंपनीस विद्युत उपकेंद्र बांधणेकरिता हस्तांतरित करण्यात आली. यासंदर्भात झालेल्या शासन निर्णयातील मुद्दा क्र. ६ नुसार हे उपकेंद्र तयार झाल्यावर महावितरणने औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस कायमस्वरूपी वीज जोडणी मोफत उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. हे उपकेंद्र सन २०१६ मध्ये निर्माण झाले आहे. त्यानंतर आकोट आयटीआय कडून कैकदा महावितरण अकोला, आकोट यांचे उंबरठे झिजविले गेले आहेत. मात्र अद्यापही या अटीची पूर्तता करून देण्यात आलेली नाही. परिणामी अवेळी आणि अनिश्चित कालावधीकरिता होणाऱ्या खंडित वीज पुरवठ्यामुळे आयटीआयचे सर्वच कामांवर दुष्परिणाम होत आहे. लक्षावधी रुपये ओतून बनविलेला संगणक कक्ष केवळ शोभेचे दालन बनला आहे. कार्यालयातील संगणक संचही ठप्प राहतात. त्याकरिता महावितरणने आयटीआयला मान्य केलेला विद्युत पुरवठा त्वरित देणे गरजेचे आहे.

दुसरी समस्या आहे पाण्याची. आयटीआयमध्ये एक बोरवेल आहे. तीही आटली आहे. प्रशिक्षणार्थ्यांना एक तर घरून पाणी घेऊन यावे लागते. अथवा आयटीआय बाहेरील टपरीवर जाऊन तहान भागवावी लागते. पाण्याअभावी मोटर मेकॅनिक ट्रेड धोक्यात आला आहे. आहे त्या बोरची दुरुस्ती करणेकरिता आणि अधिकची बोरवेल मिळणेकरिता आयटीआय ने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अनेकदा पदर पसरला आहे. परंतु पूर्णवेळ डांबर, गिट्टी, सिमेंट, लोखंड यातच राहून सामाजिक ओलावा नष्ट झालेल्या सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांना सामाजिक दायित्वाचा पाझर अद्याप फुटलेला नाही. तिसरी आहे माजलेल्या रानाची समस्या. आकोट आयटीआयमध्ये भली मोठी जागा निरुपयोगी काट्या बोराट्यांनी व्यापलेली आहे. या गच्च झाडीत विविध प्रकारचे साप आढळून येतात. अनेकदा प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी मैदानात आलेले साप हुसकावून लावलेले आहेत. काही अति उत्साही प्रशिक्षणार्थी त्यांना पकडण्याचाही प्रयत्न करतात. त्याने कोणत्याही क्षणी जीवावर बेतू शकते. त्याकरिता हे रान नष्ट करणे आवश्यक झाले आहे.

चौथी समस्या आहे खेळ मैदानाची. आयटीआयचे आवारात खेळ मैदानाचे काम सुरू करण्यात आले. पण पुरेशा निधी अभावी ते जवळजवळ ठप्पच आहे. पाचवी समस्या आहे हॉलची. आयटीआयच्या दोन-तीन मोठमोठ्या हॉलमध्ये न्यायप्रविष्ठ निवडणुकांच्या मतपेट्या ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे पुरेशा जागे अभावी प्रशिक्षणार्थ्यांची मोठी कुचंबना होत आहे.

या साऱ्या समस्यांची जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण अधिकारी गजानन चोपडे यांना पूर्ण कल्पना आहे. आकोट आयटीआयचे प्राचार्य म्हणूनही त्यांनी कार्यभार सांभाळलेला आहे. समाजसेवेचीही त्यांना मोठी हौस आहे. त्यामुळे शासकीय कर्तव्यासोबतच सामाजिक दायित्वाचे भान ठेवून त्यांनी या समस्या सोडविणे बंधनकारक आहे. पण त्यांनी ते केल्याचे दिसत नाही. अनेक कार्यक्रमांचे निमित्ताने आमदार भारसाखळेही आयटीआय मध्ये आलेले आहेत. पण येथील समस्यांची त्यांनी कधी विचारणाच केली नाही. या समस्या त्यांच्या केवळ शब्दाने पूर्ण होऊ शकतात. नको ते शब्द टाकून नको ती कामे त्यांनी अनेकदा केलेली आहेत. त्यामुळे ह्या सकारात्मक बाबींकरिता शब्द खर्च केल्याने त्यांचे कोणते भारी नुकसान होत नाही.

परंतु कोणत्याही बाबतीत केवळ लाभच शोधणाऱ्या भारसाकळेंना या समस्या सोडविण्यात काही लाभ आढळला नसल्याने त्यांनी याबाबत काहीच केलेले नाही. वास्तविक कोणत्याही रोजगाराकरिता सखोल आणि योग्य ज्ञान असणे आवश्यक असते. त्यामुळे आयटीआय सारख्या ठिकाणी योग्य आणि सखोल प्रशिक्षण मिळणेकरिता सर्व सुविधा उपलब्ध असणे बंधनकारक आहे. त्याने पूर्ण पारंगत होऊन तरुण बाहेर पडतील. जेणेकरून त्यांना रोजगार उपलब्ध होईल. परंतु याची जाणीव ना आमदार भारसाकळे यांना आहे ना गजानन चोपडे यांना आहे. असती तर, ह्या समस्या चुटकीसरशी त्यांनी सोडविल्या असत्या.

आता होऊ घातलेल्या शिबिराच्या निमित्त्याने गजानन चोपडे यांचेकडे मोठा मोका होता. हे शिबिर आयटीआयमध्ये ठेवले असते तर येथील विदारक स्थिती येणाऱ्या तज्ज्ञांना, अधिकाऱ्यांना आणि विकास पुरुष असलेल्या भारसाखळे यांना दिसली असती. त्यामुळे निदान जनलज्जेखातिर तरी त्यांनी येथील समस्या सोडविल्या असत्या. परंतु राजकीय नेत्यांचे पुढेमागे करण्याची फार जुनी खोड असल्याने आणि या शिबिराचे माध्यमातून तेच साध्य करावयाचे असल्याने गजानन चोपडे यांनी आमदार भारसाखळे यांना राजकीय फायदा होण्याचे दृष्टीने या शिबिराचे आयोजन केले असल्याचे दिसते. या शिबिरातील उपस्थितांवरूनच या शिबिराचे वास्तव ध्यानात येणार आहे.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: