Sunday, September 22, 2024
HomeMarathi News Todayआमदार भारसाखळे यांनी लाटले आकोट बंदचे श्रेय…बालिश व्हिडिओ व्हायरल...आकोटकर उडवीत आहेत खिल्ली…

आमदार भारसाखळे यांनी लाटले आकोट बंदचे श्रेय…बालिश व्हिडिओ व्हायरल…आकोटकर उडवीत आहेत खिल्ली…

आकोट – संजय आठवले

आकोट शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक झाल्याच्या निषेधार्थ शहरातील सकल हिंदू समाजाने दुसऱ्या दिवशी पुकारलेल्या आकोट बंदचे श्रेय या प्रकरणात काडीचाही सहयोग नसणाऱ्या आमदार भारसाखळे यांनी विनासायास पदरात पाडून घेतले असून त्या पोचट श्रेयाचा बनविण्यात आलेला दबंग स्टाईल व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल करण्यात येत आहे. परंतु या बालिश व्हिडिओने भारसाखळे यांची दबंग गिरी सिद्ध होण्याऐवजी त्यांच्या बोगसगिरीचेच अधिक प्रदर्शन होत असल्याने नागरिकांमध्ये या व्हिडिओची मोठी खिल्ली उडविली जात आहे.

वाचकांना ठाऊकच आहे कि, आकोट शहरात दिनांक १८ सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी शहरातील नंदीपेठ परिसरातून मुख्य शोभायात्रेत सामील होणेकरिता जाणाऱ्या गणेश मंडळावर एका प्रार्थनास्थळातून दगडफेक करण्यात आली. घटनेची खबर मिळताच तेथील स्थानिक कार्यकर्ते प्रफुल्ल पिंपळे, विलास घाटोळ, शिवदास सावरकर, सुभाष तेलगोटे, सचिन काळे, ओमप्रकाश सावरकर, रोशन काळे, धोंडोपंत उपासे, ॲड. विकास पिंपळे, चरणदास दिंडोकार यांचे मदतीने पोलिसांनी जमावाला शांत करण्यात यश मिळविले. त्यानंतर सार्वजनिक गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष दिलीप बोचे, माजी नगरसेवक मंगेश चिखले, मंगेश लोणकर, सागर उकंडे यांनीही जमावाला शांत करण्यात आणि गणेश मूर्ती सुरक्षित बाहेर काढण्यास मदत केली.

त्यानंतर हे गणेश मंडळ मुख्य शोभायात्रेत सामील झाले. आणि त्याबरोबरच नंदी पेठ परिसरात पोलीस कारवाईस प्रारंभ झाला. एकीकडे ही कारवाई सुरू होती, तेव्हा दुसरीकडे शहरात शोभायात्रा पार पडत होती. आणि नेमक्या ह्या कठीण समयी आमदार भारसाखळे त्यांच्या दर्यापूर येथील निवासस्थानी विश्राम करीत होते. अशा स्थितीत विसर्जन मिरवणूक संपली. आणि त्यानंतर लगेच हिंदू समाज बांधव आकोट शहर पोलीस ठाण्यात गोळा होऊ लागले. या ठिकाणी पोलीस प्रशासनाने हिंदू बांधवांशी वार्तालाप केला. त्यादरम्यान दुसरे दिवशी आकोट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला गेला. परंतु याच दिवशी ईद मिलादचा जुलूस मुक्रर करण्यात आलेला होता. त्यामुळे हिंदू बांधवांच्या भेटीनंतर उपविभागीय पोलीस अधिकारी अनमोल मित्तल आणि ठाणेदार अमोल माळवे यांनी मुस्लिम बांधवांशी वार्तालाप केला. त्यावर दुसरे दिवशीचा जुलूस रद्द ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. उल्लेखनीय बाब म्हणजे या दोन्ही निर्णयाप्रसंगी विकासपुरुष आमदार भारसाखळे उपस्थित नव्हते.

परंतु शहरातील एका मोठ्या प्रभावी हिंदू नेत्याने भारसाखळे यांच्या या अनुपस्थितीची दखल घेतली. शहरातील शोभायात्रा सुरू असतानाच या नेत्याने भारसाखळे यांचेशी संपर्क साधून त्यांना अशा आणीबाणीच्या प्रसंगी शोभा यात्रेत उपस्थित राहणे बाबत सूचना दिली. त्यावर आपली प्रकृती ठणठणीत असल्याची प्रत्येक भाषणात आवर्जून ग्वाही देणाऱ्या भारसाखळे यांनी आपल्या शिकस्त प्रकृतीची प्रथमच ग्वाही दिली. ते म्हणाले, “भाऊ माझी प्रकृती तुम्हाला माहीतच आहे. माझ्याने जास्त चालणे होत नाही. लवकरच थकवा येतो”. यावर आकोट शहरात दुसरे दिवशी हजर राहण्याची खात्री भारसाकळे यांनी दिली.

दुसरी दिवशी घोषणेनुसार हिंदू बांधव सकाळीच गोळा होऊ लागले. भारसाखळे हे सुद्धा सकाळी सकाळीच आकोट मुक्कामी डेरे दाखल झाले. ते आल्याचे कळल्यावर प्रमुख हिंदू बांधवांनी त्यांची भेट घेऊन त्यांना आकोट शहर ठाण्यात येण्याचा आग्रह केला. वास्तविक शहर बंद संदर्भात त्यांचा काडीचाही सहयोग नसल्याने त्यांनी येण्यास सुरुवातीला जरासे आढेवेढे घेतले. आणि नंतर येण्यास रुकार दिला. त्यानुसार हा सारा ताफा ठाण्यात आला. त्या ठिकाणी भारसाखळे यांनी सवयीप्रमाणे दुटप्पी बोलून साऱ्या घटना क्रमाचे श्रेय लाटले. त्यावर कुणीतरी या ठिकाणचे चित्रीकरण करून त्याचा व्हिडिओ बनवला. आणि त्यात एक शौर्यगीत टाकून आणि भारसाखळे यांनी मोठी दबंगगिरी केल्याचा आभास निर्माण करून तो व्हिडिओ व्हायरल केला.

परंतु या ठिकाणी भारसाखळे किती कावेबाज बोलले ते कुणाला कळलेच नाही. ते म्हणाले कि,” मागील काळात विरोधात निवडून आलेल्या दहा मुस्लिम नगरसेवकांना आम्ही पालिका सत्तेत सामावून घेतले. त्यांची अनेक कामे केलीत. तरीही त्यांनी असे शहर विरोधी वर्तन केले. परंतु मुळात पाहिले असता ही दगडफेक नंदीपेठ परिसरातच झाली. आणि ती तिथेच आटोक्यातही आली. शहरातील मुस्लिम समुदायात याचे कोणतेही पडसाद उमटले नाहीत. सारे शहर शांतच राहिले. त्यात कौतुकास्पद बाब म्हणजे मुस्लिम समुदायाने ईद मिलादचा जुलूस रद्द करून हिंदू बांधवांच्या संवेदनांचा उचित सन्मानही केला. ह्या जुलूस मध्ये सामील होणेकरिता यातील बहुतेक सर्वच मंडळांनी डीजे वाल्यांना बयाना म्हणून दिलेले हजारो रुपये ही बुडाले.

ह्या बाबी लक्षात घेता नंदीपेठ येथील दुर्घटने करिता शहरातील सर्वच मुस्लिमांना जबाबदार धरणे सर्वथा गैर आहे. जो काही रोष आहे तो केवळ नंदी पेठ येथील गैवर्तन करणाऱ्यांवरच असावयास हवा. त्यामुळे त्यांचे वरच कारवाई करणे बाबत बोलणे उचित होते. परंतु या घटनेशी इतरांचा संबंध जोडून त्यांनाही या घटनेबाबत जबाबदार धरणारे वक्तव्य आमदार भारसाखळे यांनी केले. असे करताना त्यांनी आणखी एक कावेबाजी केली ती अशी कि, नंदी पेठ परिसरात आमदार भारसाखळे यांचा एक हस्तक राहतो. सोयर संबंधांनी तो दर्यापूर बाभळी येथील लोकांशी जुळलेला आहे. त्याच धाग्यांनी तो भारसाखळे यांचेशीही जुळलेला आहे. अगदी गॅस सिलेंडर पासून आजतागायत तो भासाखळे यांचेशीच निष्ठ आहे. नंदीपेठ येथील दगडफेकीत त्याचा सिंहाचा वाटा असल्याची अनेकांची खात्री आहे

त्यामुळे त्या ईसमाच्या चौकशीची मागणी भारसाखळे यांनी करावयास हवी होती. परंतु त्याचा उल्लेख मात्र भारसाखळे यांनी मोठ्या युक्तीने टाळला. त्यामुळे दुर्घटनेशी संबंधितांना वगळायचे आणि ज्यांचा संबंध नाही त्यांना मात्र गोवायचे असा आमदार भारसाखळे यांचा प्रयास असल्याचे दिसत आहे. सोबतच अशा वर्तनाने हिंदू बांधवांनाही ते अंधारात ठेवित असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे आकोट पोलीस ठाण्यातील त्यांचे वक्तव्य आणि वर्तन ही निव्वळ नौटंकी असल्याचे लक्षात येते.

ह्या दहा मुस्लिम नगरसेवकांबाबतही एक मजेदार माहिती आहे. ती अशी कि, आकोट पालिकेवर भाजपाची एकहाती सत्ता आली. त्यामुळे भाजपाचे पूर्ण बहुमत होते. त्यांना बहुमता करिता अन्य कुणाचीही गरज नव्हती. अशावेळी भाजप नगरसेवकांची नाराजी असतानाही भारसाखळे यांनी काँग्रेस पक्षाच्या ह्या १० नगरसेवकांना आपल्या सोबत घेतले. त्याचे कारण असे कि, भारसाखळे यांच्या प्रथम अपक्ष निवडणुकीत ह्याच नगरसेवकांनी भारसाखळे यांचे गॅस सिलेंडर डोईवर घेतले होते. दर्यापूर बाभळी येथील मुस्लिमांना आपला विकास पुरुष म्हणून प्रचार करण्याकरिता भारसाखळे यांनी आकोटात पाठविले. त्यावेळी याच नगरसेवकांच्या मदतीने त्यांनी मुस्लिम भागात दबदबा निर्माण केला होता. परंतु ह्या निवडणुकीत भारसाखळे पराभूत झाले होते.

पण या नगरसेवकांशी त्यांचा घरोबा मात्र कायम राहिला. मागील वेळी त्याच घरोब्याचे भरोशावर भारसाखळे यांनी या लोकांना सत्तेत सामावून घेतले. त्यातील विशेष म्हणजे काँग्रेसच्या ह्या दहा लोकांमधून एक स्वीकृत सदस्य निवडून द्यावयाचा होता. त्यावेळी तो नगरसेवक आपल्याच मुठीतील असावा म्हणून काँग्रेस पक्षाचा हा स्वीकृत नगरसेवक राष्ट्रवादीचे नेते नवनीत लखोटिया यांचे सल्ल्याने आणि भारसाखळे यांचे पसंतीने पदावर घेतला गेला. म्हणजेच भासाखळे यांनी हे १० नगरसेवक स्वहिताकरिता पदरी बाळगले होते हे ध्यानात येते. अशा स्थितीत या दहा नगरसेवकांचा दगडफेक प्रकरणाशी संबंध जोडून त्यांचा पोलीस ठाण्यात उल्लेख करून आमदार भारसाखळे यांना नेमका कोणता खेळ करावयाचा आहे? असा प्रश्न निर्माण होत आहे.

भारसाखळे यांचे आणखी एक मजेदार गुपित असे कि, भाजपकडून आपल्या उमेदवारीबाबत भारसाखळे साशंक आहेत. त्याकरिता त्यांनी अपक्ष लढण्याची ही तयारी ठेवलेली आहे. त्यात एक जबर खेळी ते करणार आहेत. ती अशी कि, त्यांना भाजपकडून उमेदवारी मिळाल्यास मुस्लिमांची मते विभाजित करण्याकरिता ते अंजनगाव येथील एका मुस्लिम डॉक्टरला एमआयएम ची उमेदवारी देणार आहेत. त्याकरता भासाखळे यांनी थेट संभाजीनगर येथे जाऊन इम्तियाज जलील यांचेशी संधान साधल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. परंतु त्यांना भाजपची उमेदवारी न मिळाल्यास एमआयएमचा हा उमेदवार निवडणूक न लढविता भारसाखळे यांचा प्रचार करणार आहे. त्यामुळे “ये रिश्ता क्या कहलाता है”? हे नागरिकांनी ठरवावे. महत्त्वाचे म्हणजे आमदार भारसाखळे यांच्या अशा दुटप्पी वर्तणुकीची अनेकांना माहिती आहे. त्यामुळे आकोट पोलीस ठाण्यात चित्रित करण्यात आलेला आणि शौर्य गीताने मंडित केलेला त्यांचा व्हायरल व्हिडिओ आकोटकरांच्या टीकेला पात्र ठरलेला आहे.

Sanjay Athavle
Sanjay Athavlehttp://mahavoicenews.com
नमस्कार, मी संजय आठवले रा. खानापूर वेस आकोट जिल्हा अकोला. मी मागील तीस वर्षांपासून पत्रकारिता करित आहे. समाजातील असामाजिक तत्त्वे, अराजकता, भ्रष्टाचार, अन्याय या विरोधात आवाज उचलण्याचा माझा जन्मताच स्वभाव आहे. त्यातूनच महाविद्यालयीन जीवनात वाचनाशी माझा जवळून संबंध आला. आणि तेव्हा निर्माण झालेली वाचनाची आवड आजतागायत कायम आहे. त्यानेच मराठी भाषेचे बऱ्यापैकी ज्ञान झाल्याने वाणिज्य पदवीधर झाल्यानंतर मी छंद म्हणून पत्रकारिता करू लागलो. त्यातील शोध पत्रकारितेत मला अधिक रुची आहे. अनेक रहस्य उलगडून जगापुढे आणणे मला अत्यंत आवडते. आता मी महा व्हाईस न्यूज चा कार्यकारी संपादक म्हणून कार्यरत आहे. महा व्हाईस न्यूजने पत्रकारितेचा फ्रीहँड दिल्याने विविध स्तरातील, विविध क्षेत्रातील जोखमीची पत्रकारिता मी करू शकत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: