आकोट – संजय आठवले
इन मीन दोनच खेळ मैदाने असलेल्या आकोट शहरातील एका खेळ मैदानाचा आपल्या राजकीय लाभाकरिता आमदार भारसाखळे यांनी खून केला असून एका परिपूर्ण शहराकरिता अनिवार्य असलेल्या खेळ मैदान या बाबीवर आकोट पालिकाही राजकीय दबावापोटी मूग गिळून बसली आहे.
दोघांच्याही या भूमिकेमागे शहराची रचना बाधित करण्याचा आणि या जागेवरील अतिक्रमित वास्तू पाडण्याच्या न्यायालयीन आदेशाला हरताळ फासून त्या वास्तूंना अभय देण्याचा मानस असल्याचे दिसत आहे. परिणामी न्यायालयाची अवमानना व शहरातील युवकांची कुचंबना होणार आहे.
तब्बल सव्वा लाख लोकसंख्या असलेल्या आकोट शहरात दोन खेळ मैदाने आहेत. एक गांधी मैदान व दुसरे कबुतरी मैदान. यातील गांधी मैदान कलहप्रिय मैदान म्हणून विख्यात आहे. या मैदानात अनेकदा धार्मिक कलह उफाळलेला आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण पुढे करित या मैदानात कोणत्याही खेळाचे आयोजन करण्यास मंजुरी दिली जात नाही.
त्यामुळे अनेक वर्षांपासून हे मैदान एकाच धर्मसमूहाचे बनले आहे. विशेष म्हणजे या समस्येवर कोणत्याही जनप्रतिनिधीने अथवा शासकीय यंत्रणेने कोणताही तोडगा काढलेला नाही. परिणामी संपूर्ण शहराचे हे खेळ मैदान असल्याची भावनाच हळूहळू लोप पावत चालली आहे.
अशा स्थितीत भिकुलाल गोयंका यांचे मालकीचे कबुतरी मैदान पालिकेने खेळ मैदानाकरिता आरक्षित केले. त्यासोबतच हे मैदान खरेदी करण्याची प्रक्रिया ही सुरू केली. त्याकरिता खेळ मैदान म्हणून दि.९.११.१९८७ रोजी या जागेचा अवार्डही घोषित झाला.
त्यावर ह्या जागेचे मूल्य कमी लावण्यात आल्याचा दावा भिकूलाल गोयंका यांनी सन २०१६ मध्ये सर्वोच्च न्यायालयात केला. त्यावर सरन्यायालयाने दि. १७.८.२०१६ रोजी मूल्य निर्धारण करून दिले. हे मूल्य निर्धारण करताना सरन्यायालयाने या ठिकाणी खेळ मैदान ही बाब प्रमुख मानून हा निर्वाळा दिला.
ह्या निर्वाळ्यानुसार आकोट पालिकेने खेळ मैदानाकरिता या जागेचे ६१ लक्ष ८० हजार २४० रुपये भिकूलाल गोयंका यांचे वारसांना दि.३.५.२०१७ रोजी अदा केले. यावरून ही जागा खेळ मैदानाकरिता आरक्षित केली, खेळ मैदाना करिताच या जागेचा अवार्ड घोषित केला गेला, खेळ मैदानाकरिताच सर न्यायालयाने या जागेचे मूल्य निर्धारण करून दिले आणि पालिकेने खेळ मैदानाकरिताच या जागेचा मुआवजा भूस्वामीला अदा केला हे ध्यानात येते.
त्यामुळे खेळ मैदानाच्या मानकांनुसार ही जागा खुली ठेवणे, त्यावर कोणतेही अतिक्रमण होऊ न देणे, या जागेवर खेळांच्या सुविधा उपलब्ध करून देणे पालिकेस बंधनकारक होते. परंतु तसे न होता पालिकेने या जागेकडे अक्षम्य दुर्लक्ष केले. परिणामी या जागेवर धार्मिक वास्तू, पक्की दुकाने तथा अन्य अतिक्रमणांची गजबज वाढली.
त्यातच आता पालिकेद्वारे ह्या जागेवर पेव्हर्स ब्लॉक्स टाकण्याचे कामास प्रारंभ झाला आहे. परंतु या कामामुळे हे काम मैदानाचे सुस्थिती करिता आहे की दुर्गती करीता आहे? असा यक्ष प्रश्न उभा ठाकला आहे.
हा प्रश्न निर्माण होण्याचे कारण हे आहे कि, या जागेवर दोन मंदिरे, काही पक्के दुकाने, काही घरे तर काही किरकोळ अतिक्रमण अस्तित्वात आहे. वास्तविक आपली जागा बंदिस्त करताना पालिकेने हे सारे अतिक्रमण हटवून पालिकेची संपूर्ण जागा बंदिस्त करणे बंधनकारक आहे. परंतु तसे न होता ही अतिक्रमणे कायम ठेवून आणि त्याकरिता भलीमोठी जागा मोकळी ठेवून पालिकेद्वारे सिमेंट काँक्रीटचे पक्के बांधकाम करणे सुरू आहे.
अशा विचित्रपणामुळे पालिकेने आपली हद्द निश्चित केली असून ही उर्वरित जागा पालिकेची नाही. असा समज होणे स्वभाविक आहे. म्हणजेच पालिका स्वतःहून या अतिक्रमण धारकांना उत्तेजन देत असून खुद्द पालिकाच या अतिक्रमणधारकांना पार्किंग, स्वच्छता आदींबाबतीत सुविधा पुरवीत असल्याचे दिसत आहे.
संताप जनक बाब म्हणजे या संदर्भात पालिका बांधकाम विभागाशी संपर्क साधला असता, तेथे भूमि अभिलेख कडून दिली गेलेली या जागेची मिळकत पत्रिकाच उपलब्ध नसल्याचे कळले. त्यामुळे पालिकेची जागा नेमकी किती? हे कुणालाच ठाऊक नाही. किती जागेवर पेव्हर्स ब्लॉक्स टाकायचे? याचीही कुणाला कल्पना नाही.
या कामाबाबतचा पालिकेचा ठराव पाहिला असता त्यात “आकोट शहरातील दुर्गामाता मंदिरासमोरील नपचे जागेवर लादीकरण करणे” असे नमूद आहे तर या कामाच्या कार्यारंभ आदेशाचे अवलोकन केले असता त्यामध्ये “आकोट शहरात विविध ठिकाणी सिमेंट काँक्रीट रोड, पेव्हर्स रोड, सिमेंट काँक्रीट नालीचे बांधकाम करणे” असा उल्लेख आहे. त्यामुळे हा ठराव आणि त्यातील कामाचा कार्यारंभ आदेश पाहता हा कार्यारंभ आदेश “कबुतरी मैदानात पेवर ब्लॉक्स बसविणे” नेमक्या याच कामाचा कार्यारंभ आदेश मानताच येत नाही.
दुसरे असे कि, हा कार्यारंभ आदेश एकाच कंत्राटदाराचे नावे असून त्याला तब्बल ३ करोड ४४ लक्ष ९९ हजार ९८३ रुपयांची कामे करण्यास आदेशित केले आहे. याचा अर्थ या एकाच कंत्राटदाराला इतक्या प्रचंड रकमेची कामे दिल्या गेली आहेत. या पेलर ब्लॉक्स कामाची अंदाजीत रक्कम आहे ७९ लक्ष ९९ हजार ९९१ रुपये.
म्हणजे हे काम वगळता तब्बल २ करोड ६४ लक्ष ९९ हजार ९९२ रुपयांची अन्य कामेही या याच कंत्राटदारास दिली गेली आहेत. याचा सरळ अर्थ आहे कि, या कामांची निविदा प्रक्रिया कोणतीही स्पर्धा न होता खुल्या व पारदर्शी पद्धतीने पार पाडली गेलेली नाही. हि प्रक्रिया कायदेशिर न होता त्यात बराच घोळ केलेला आहे. त्यामुळे एकाच कंत्राटदारास इतक्या प्रचंड रकमेची कामे देण्यात आलेली आहेत.
या साऱ्या बाबी स्पष्ट करतात कि, दर्यापूर निवासी विकास पुरुष आमदार प्रकाश भारसाखळे यांनी आकोट शहरातील खेळ मैदानाचा खून केलेला आहे. तर पालिका प्रशासनाने याबाबत मावळ भूमिका घेतली आहे. परंतु या खेळ मैदानातील कामाबाबत मात्र अर्थपूर्ण भूमिका घेतली आहे. त्यामुळे या दोन्ही घटकांद्वारे न्यायालयाची अवमानना तर शहरातील युवकांची कुचंबना होणार हे निश्चित.