Friday, November 8, 2024
Homeराजकीयआमदार हरीश पिंपळे यांचे वक्तव्याने आमदार भारसाखळे अडचणीत...

आमदार हरीश पिंपळे यांचे वक्तव्याने आमदार भारसाखळे अडचणीत…

आकोट – संजय आठवले

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे “बटेंगे तो कटेंगे” हा मंत्र घेऊन मुर्तीजापुर मतदार संघात आले असताना तेथील स्थानिक आमदार हरीश पिंपळे यांनी उपस्थितांसमोर व्यक्त केलेल्या निर्धाराचे अनुपालन करण्याचा विडा आकोट मतदार संघाचे आमदार प्रकाश भारसाखळे हे उचलतील काय? असा प्रश्न आकोट तेल्हारा तालुक्यातील मतदारांना पडला आहे.

परंतु या प्रश्नाने आमदार भारसाखळे चांगलेच अडचणीत आल्याने यासंदर्भात ते किंवा त्यांचे कार्यकर्ते यांनी मात्र मौन बाळगले आहे.त्याचे झाले असे कि, दि. ५ नोव्हेंबर रोजी महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे आले होते. उमेदवारांच्या प्रचारासह आपण शोधून काढलेला “बटेंगे तो कटेंगे” हा निरर्थक मंत्र उपस्थितांचे गळी उतरविण्याचा त्यांचा मानस होता. परंतु सभा स्थळी गर्दीच न जमल्याने त्यांचा चांगलाच विरस झाला.

त्याच सभेत मुर्तीजापुरचे स्थानिक आमदार हरीश पिंपळे यांचे भाषण झाले. त्या भाषणात पिंपळे म्हणाले कि, “या निवडणुकीत महायुतीचाच विजय होणार आहे. हा होणारा विजय मतदाता आणि कार्यकर्ता यांना समर्पित राहणार आहे. गत १५ वर्षात माझ्या कुटुंबाला हवे ते सगळे मी पूर्ण केले आहे. आता कार्यकर्ता आणि मतदाता यांचे करिता काम करावयाचे आहे”.वास्तविक आपले कार्यकर्ता आणि मतदाता यांना खुश करणे करिता पिंपळे यांनी हे वक्तव्य केले होते.

पण त्यांच्या ह्या वक्तव्यातून त्यांचा आणि त्यांच्या सहकारी उमेदवारांचा गोपनीय अजेंडाच समोर आला. त्यामुळे हरीश पिंपळे यांनी स्वतःसह मंचावरील सर्वांनाच अडचणीत आणले. ते असे कि, दर निवडणुकीत आपले कार्यकर्ता आणि मतदार यांचे उत्थानाकरिता आपण प्रयत्न करणार असल्याचे उमेदवार सांगत असतात.

परंतु “गेल्या १५ वर्षात माझ्या कुटुंबाला हवे ते मी सारे मिळविले आहे. आता कार्यकर्ता आणि मतदाता यांचेकरिता काम करावयाचे आहे” असे बोलून गेली १५ वर्षे आपण केवळ आपल्या कुटुंबाच्याच विकासात घालविली असल्याचे सत्य हरिष पिंपळे यांनी उपस्थितांसमोर उघड केले. म्हणजे “आधी आपण तूप ओरपायचे आणि नंतर पोट खपाटीस गेलेल्या मतदाता व कार्यकर्ता यांचा विचार करायचा” हा भाजपचा अजेंडाच पिंपळे यांनी लोकांसमोर मांडला.

मजेदार बाब म्हणजे या मंचावर आकोटचे आमदार प्रकाश भारसाखळे सुद्धा उपस्थित होते. हरीश पिंपळे यांच्यासोबत ते आमदार राहिलेले आहेत. त्यामुळे गतकाळात त्यांनीही पिंपळेंचाच अजेंडा राबविल्याची साक्ष आपोआपच मिळते. आधी स्वतःचे भले केले ह्या वक्तव्यानंतर पिंपळे यांनी आता मात्र मतदाता व कार्यकर्ता यांची काळजी घेण्याचे अभिवचन दिले.

परंतु भारसाखळे यांनी मात्र या संदर्भात अगदी मौन बाळगले. याची कारणे ही अनेक आहेत. त्यामुळे आता आपण मतदाता व कार्यकर्ता यांचे करिता काम करणार असल्याचे जर भारसाखळे बोलतात तर त्यांचे अडचणीत प्रचंड वाढ होऊ शकते. ती अशी कि, गत दहा वर्षापासून भारसाखळे आमदार आहेत. त्या काळात आकोट तेल्हारा तालुक्यातील जीवघेणे रस्ते कसे आणि किती काळात पूर्ण झाले? त्यामुळे नागरिक किती हैराण झाले?

कंत्राटदारांना किती आणि कशा सवलती दिल्या गेल्या? त्यांना किती व का लाडवून ठेवले? ह्यासोबतच आकोट अकोला मार्ग अद्यापही पूर्ण का झाला नाही? गांधीग्रामच्या पुलाकरिता चार करोड रुपये आणल्याचा गाजावाजा भारसाखळे यांनी केला होता. तो पूल एका हलक्याशा पावसाने का वाहून गेला? हिवरखेड ग्रामपंचायत नगरपंचायतीत रूपांतरित करणेकरिता कुणी आणि का खोडा घातला? वान धरणाचे पाणी अन्य जिल्ह्यात नेण्याकरिता कुणी संमती दिली?

आकोट शहरातून अंजनगाव कडे जाणाऱ्या मार्गा च्या कंत्राटदाराला कोणी आणि का लाडावून ठेवले? आकोट व तेल्हारा शहरात वारंवार लावलेल्या बॅनर्सचे भरावे लागणारे शुल्क कुणी आणि किती बुडविले? आकोट तालुका सहकारी सूतगिरणीच्या कामगारांना कुणी आणि कसे मूर्ख बनविले? या साऱ्या प्रश्नांची उत्तरे भारसाकळे यांना द्यावी लागणार आहेत.

ह्या उत्तरांमुळे भारसाखळे यांनी मतदात्यांसाठी काय केले हे उघड होऊन ते चांगलेच कैचीत सापडू शकतात. तीच गत कार्यकर्त्यांची. भारसाखळे यांनी कार्यकर्ते नेते नगरसेवक यांच्यावर सातत्याने पाळत ठेवली. या लोकांना कोणतेही श्रेय जाऊ नये याची डोळ्यात तेल घालून काळजी घेतली. एखादा कार्यकर्ता स्वबळावर मुंबईत जाऊन आपले काम करून आला, तर तुझे मुंबईत जाणे मला ठाऊक झाले आहे असा इशारा देत कार्यकर्ता आपल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाल्याची जाणीव भारसाखळे यांनी दर वेळी कार्यकर्त्यांना दिली.

मतदार संघातील अनेक नेत्यांना टोमणे मारणे, टोचून बोलणे, त्यांचा मानभंग होईल अशी वागणूक देणे हे प्रकार भारसाखळे यांनी केलेले आहेत. त्याने भाजपाचे बहुतांश नेते, कार्यकर्ते आतून दुखावलेले आहेत. परिणामी विधानसभा निवडणूक २०२४ ची उमेदवारी मिळणेकरिता भारसाखळे यांना प्रचंड विरोध झाला. ते स्थानिक नाहीत तर पार्सल असल्याचा गदारोळ झाला.

त्यामुळे आकोट येथे स्थानिक उमेदवार देण्याचा मोठा आग्रह झाला‌ तरी कार्यकर्ता व नेते यांची कदर न करता भारसाखळे यांनी तीबार उमेदवारी प्राप्त केली. त्याला विरोध म्हणून डॉ. गजानन महल्ले यांनी आपली उमेदवारी घोषित केली. पक्षश्रेष्ठींनी हस्तक्षेप करून त्यांना माघार घेण्यास लावली. त्यांनी आधी राजीनामा दिल्यावरही त्यांना पक्षातून बडतर्फ केले गेले. त्यावर भारसाखळे चकार बोलले नाहीत.

यावरुन त्यांना कार्यकर्त्यांशी काहीच देणे घेणे नसल्याचे स्पष्ट होते. मतदार संघातील नेते कार्यकर्ते यांचेविषयी कायम आकस आणि दुस्वास असल्यानेच “आता मतदाता व कार्यकर्त्यांकरिता मी काम करणार” ह्या पिंपळे यांच्या वक्तव्यावर भासाखळे यांनी मौन बाळगले आहे.परंतु त्यांच्या या मौनाने त्यांना केवळ सत्तेत राहायचे आहे. त्याकरिता मतदाता व कार्यकर्ता यांचा वापर करायचा आहे. हा त्यांचा सुप्त मानस मतदारांचे ध्यानात आला आहे. सोबतच आकोट मतदार संघात असा कोणता मोतीचूर चा लड्डू आहे ज्याकरिता पार्सल असल्यावरही भारसाखळे इतके धडपडत आहेत, याचा शोधही मतदार घेत आहेत.

Sanjay Athavle
Sanjay Athavlehttp://mahavoicenews.com
नमस्कार, मी संजय आठवले रा. खानापूर वेस आकोट जिल्हा अकोला. मी मागील तीस वर्षांपासून पत्रकारिता करित आहे. समाजातील असामाजिक तत्त्वे, अराजकता, भ्रष्टाचार, अन्याय या विरोधात आवाज उचलण्याचा माझा जन्मताच स्वभाव आहे. त्यातूनच महाविद्यालयीन जीवनात वाचनाशी माझा जवळून संबंध आला. आणि तेव्हा निर्माण झालेली वाचनाची आवड आजतागायत कायम आहे. त्यानेच मराठी भाषेचे बऱ्यापैकी ज्ञान झाल्याने वाणिज्य पदवीधर झाल्यानंतर मी छंद म्हणून पत्रकारिता करू लागलो. त्यातील शोध पत्रकारितेत मला अधिक रुची आहे. अनेक रहस्य उलगडून जगापुढे आणणे मला अत्यंत आवडते. आता मी महा व्हाईस न्यूज चा कार्यकारी संपादक म्हणून कार्यरत आहे. महा व्हाईस न्यूजने पत्रकारितेचा फ्रीहँड दिल्याने विविध स्तरातील, विविध क्षेत्रातील जोखमीची पत्रकारिता मी करू शकत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: