आकोट – संजय आठवले
आपल्या कार्यकर्त्यांचे ऐकून व आपल्याला श्रेय मिळत नसल्याचे पाहून आमदार भारसाखळे यांनी तिरीमिरीत येऊन हिवरखेड नगरपंचायत होण्याचे प्रक्रियेवर स्थगिती मिळविली असली तरी या मुद्द्यावर जनक्षोभाच्या भडक्याने त्यांना आपल्या चुकीची जाणीव झाल्याचे वृत्त असून भाजपच्या वरिष्ठ स्तरावर याची नोंद घेतली गेल्याचे आणि त्यामुळे ही स्थगिती उठविल्यास होणारी नाचक्की व न उठविल्यास मतदारांशी होणारी दुश्मनी हे दोन्हीही टाळून हे प्रकरण निस्तरण्याच्या तोडग्यावर त्यांचे मंथन सुरू असल्याचेही समजते.
वाचकांना स्मरतच असेल की, हिवरखेड ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर करण्याची प्रक्रिया जवळपास पूर्ण झालेली होती. या प्रस्तावावर केवळ मंजुरीचा ठप्पा मारण्याचेच काम व्हायचे होते. अशा अवस्थेत आपल्या निकटस्थांचे जि.प. व पं.स. मतदार संघ खारीज होतात व नगरपंचायतीचे श्रेय अन्य कुणालातरी जाते ह्या कारणांनी अहंकार दुखावलेल्या आमदार भारसाखळे यांनी या प्रक्रियेवर स्थगिती मिळवली. ही स्थगिती आणताना काहीच खळखळ होणार नाही असा त्यांचा होरा होता. त्यांना तसे सांगितलेही गेले होते. त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री स्तरावर अतिशय खोटारडी कारणे सांगून या प्रक्रियेवर स्थगिती मिळवली. परंतु या स्थगितीने लहान थोर हिवरखेडवासी संतापून उठला. त्यामुळे स्थगिती आणल्यावरही हिवरखेडकर शांत बसतील हा भारसाखळे यांचा होरा पार भुईसपाट झाला.
त्यात भारसाखळे यांनी स्वतःचे मोठेपण दर्शविण्याकरिता नगरपालिका देण्याचे गाजर दाखवून आणखी भर टाकली. हाताशी आहे ते गमावून जे दृष्टीपथातच नाही ते देण्याचे भारसाखळे यांचे हे अभिवचन निव्वळ पोचट गप्पा असल्याचे चाणाक्ष हिवरखेडकरांनी तत्क्षणींच ओळखले. त्यामुळे त्यांनी मिळेल त्या साधनाचा उपयोग करण्याचे तंत्र आरंभिले आहे.
महत्त्वाचे म्हणजे भारसाखळे यांचे चार दोन समर्थक वगळता या मुद्द्यावर संपूर्ण हिवरखेडकरांची वज्रमुठ बनलेली आहे. अशा अवस्थेत अमरावती पदवीधर मतदार संघाची निवडणूक होऊ घातली आहे. हा सोनेरी मोका हिवरखेडकरांनी हातोहात उचलला. त्यांनी या निवडणुकीतील भाजप उमेदवार डॉक्टर रणजीत पाटील यांना मदतीचे आवाहन केले आहे.
परंतु डॉक्टर पाटील या मुद्द्यावर हिवरखेडकरांची उघड बाजू घेण्याची सुतराम शक्यता नाही. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे प्रत्येक राजकीय पक्षाचा एक अलिखित नियम आहे. तो म्हणजे आपल्या पक्षातील थेट जनतेतून निवडून आलेल्या आमदाराला दुखवायचे नाही. त्याच्या मतदारसंघात तो म्हणेल ती पूर्व दिशा. अशा धोरणामुळे आणि भारसाखळे दुखावले जातील या भीतीने डॉक्टर पाटील ह्या प्रकरणी “मौनम् सर्वार्थम् साधनम्” अशी भूमिका घेण्याची पूर्ण संभावना आहे. मात्र त्यांच्या या भूमिकेमुळे हिवरखेड परिसरातील पदवीधर मते गमावण्याचीही तितकीच संभावना आहे. त्यामुळे “इकडे आड तिकडे विहीर” अशी अवस्था डॉक्टर पाटील यांची होणार आहे.
हे असले तरी “अंदर की खबर” अशी आहे की, हिवरखेडकरांचा टाहो भाजपच्या वरिष्ठ स्तरावर पोहोचला आहे. त्याची दखल घेऊन त्याबाबत भारसाखळे यांना विचारणाही झाल्याने आणि आपल्या चुकीच्या जाणिवेने भारसाखळे विचलित झाल्याचेही वृत्त आहे. परंतु “झुकेगा नही साला” ही अहंकारी पुष्पावृत्ती अंगी असल्याने भारसाखळे आपली चूक मान्य करण्यास तयार नाहीत. पण ही स्थगिती उठविल्यास आपली नाचक्की होते तर न उठविल्यास हिवरखेडकरांशी दुश्मनी पक्की होते, याची पूर्ण जाण मात्र त्यांना आहे. त्यामुळे ही नाचक्की टाळून कोणता तरी तोडगा काढण्याचे मंथन भारसाखळे करीत असल्याची कुजबूज कानी आली आहे.
ही कुजबुज खरी असो वा नसो, पण “महाव्हाईस” यावर तीन तोडगे सुचवीत आहे. पहिला हा की आमदार भारसाखळे यांनी आपला “अहं” बाजूला ठेवावा. आणि “नागरिकांची इच्छा तीच माझी इच्छा” असे म्हणून स्वतःच ही स्थगिती उठवून आणावी. दुसरा तोडगा हा की, ही स्थगिती फडणवीसांमुळेच मिळालेली आहे. तेच ती उठवूही शकतात. त्यामुळे भारसाखळे आणि डॉक्टर पाटील यांनी मिळून फडणवीस यांना पुढाकार घ्यायला लावावा. आणि “आम्ही ह्या प्रकरणी पूर्ण चौकशी केली आहे.
हिवरखेड ग्रामपंचायत ही नगरपंचायतीचे सारी मानके पूर्ण करीत असल्याचे आढळून आले आहे. सोबतच तमाम हिवरखेडकरांचीही तशी इच्छा आहे” असे कारण दर्शवून ही स्थगिती उठविण्यास फडणवीस यांना बाध्य करावे. परंतु आपणच स्थगिती दिली नंतर जनक्षोभ पाहता आपणच ती मागे घेतली तर आपली नामुष्की होईल, असे फडणवीसांना वाटू शकते. त्याबाबतीत तिसरा तोडगा हा आहे की, थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मार्फत वरील कारण दर्शवून स्थगिती उठवावी.
यापैकी कोणताही तोडगा ही स्थगिती उठू शकतो. परंतु गरज आहे केवळ इच्छाशक्तीची. त्यामुळे आमदार भारसाखळे व डॉक्टर रणजीत पाटील ही इच्छाशक्ती प्रकट करून ही स्थगिती उठवितात की हिवरखेडकरांची इतराजी पसंत करतात याकडे लक्ष लागले आहे.