आकोट – संजय आठवले
आमदार भारसाखळे यांनी स्वपक्षीयांनाच संपविण्याची सुपारी घेतल्याचे त्यांचे वर्तनातून स्पष्ट झाल्याने पक्षविरोधी कारवायांच्या आरोपाखाली भाजपातून निलंबित ठरलेल्या पदाधिकाऱ्यांनी ऐलान ए जंग केले असून या विरोधात मुंबई मुक्कामी आमरण उपोषणाचे माध्यमातून निर्णायक युद्ध लढविण्याचे रणचशिंग त्यांनी फुंकले आहे. याकरिता १०० योद्ध्यांची फौज मुंबईकडे कूच करणार असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे मुंबई रणभूमीत निर्णायक युद्ध होणार की सामंजस्याचा तह होणार याबाबत आकोटकरांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.
वाचकांना स्मरतच असेल कि, अतिशय विपरीत परिस्थितीतही आमदार भारसाखळे हे तिसऱ्यांदा विजयी झाले. त्यांच्या या विजयामध्ये भाजपा कार्यकर्ते, पदाधिकारी यांचे अपार श्रम खुद्द भारसाखळे यांनाही नाकारता येणार नाहीत.
याचे महत्त्वाचे कारण म्हणजे गत पाच वर्षांपासून आमदार भारसाखळे यांचे बाबत जनतेची नाराजी शिगेला पोहोचलेली होती. निवडणूक काळात ती ठाई ठाई अनुभवास येत होती. त्याची जाणीव भारसाखळे यांनाही होती. परंतु भाजप पदाधिकारी कार्यकर्ते यांनी नेट लावल्यानेच भारसाखळे यांना आपली ऐट कायम राखता आली.
त्यामुळे कृतज्ञतेच्या नात्याने भारसाखळे यांनी आपल्या सहकाऱ्यांचे ऋण मान्य करावयास हवे होते. परंतु कृतघ्नतेचे बोट धरूनच जन्मास आल्याने भारसाखळे यांचे दिलदारपणाशी कोणतेच नाते नाही. कुणालाही आपल्या नजरेच्या जरबेत ठेवणे आणि उंच उडणाऱ्यांचे पंख छाटणे हा त्यांचा जन्मजात बाणा आहे.
आकोट मतदार संघात गेली दहा वर्षे ते हाच बाणा कायम ठेवीत आले आहेत. परिणामी अहंकार आणि खुन्नस हे दोन अवगुण त्यांच्या रंध्रा रंध्रामध्ये भिनलेले आहेत. त्यातच त्यांच्या तिबार विजयाने ते अगदी मदोन्मत्त झाले. त्या कैफात त्यांनी आपल्या तिबार विजयाचे श्रेय स्वतः वाचून इतरांना देण्यास साफ इन्कार केला.
आणि आपल्या स्वपक्षीय सहकाऱ्यांचेच शिरकाण करण्याचे कारस्थान रचले. ते विषद करण्यापूर्वी एक कथा आठवली. एका राज्यात मोठे अराजक माजले. चोऱ्या, दरोडे, खून, बलात्कार, भ्रष्टाचार यांच्या बजबजपुरीने राज्यातील रयत त्राहिमाम करू लागली. रोजगारच नसल्याने भिकाऱ्यांची संख्या बेसुमार वाढली.
पण राजा आपल्या चैन विलासात रममाण झालेला होता. अखेर राज्यातील भिकाऱ्यांनी एकजूट होऊन आपला नेता निवडला. त्याचे नेतृत्वात भिकाऱ्यांनी थेट राजमहालावर हल्लाबोल केला. आणि राजाला पायउतार करून आपला नेता सिंहासनारुढ केला.
हा नेता भारसाखळे यांचे सारखाच धूर्त, कावेबाज, अहंकारी आणि खुनशी होता. त्याने राजा बनताच आपल्या सैनिकांना पहिली आज्ञा केली “सर्व भिकाऱ्यांना मारून टाका”. उद्देश हाच की या भिकाऱ्यांनी पुन्हा बंड करू नये. मागील राजाप्रमाणे आपल्याला सुद्धा मारून दुसऱ्याला राजा करू नये.
त्यामुळे “ना रहेगा बांस ना बजेगी बांसुरी” म्हणून त्याने सर्व भिकाऱ्यांना मारून टाकले. हीच गत भारसाखळे यांनी केली. निवडणूक पूर्वकाळात ज्या लोकांनी आमदारकीची उमेदवारी मागितली, नेमक्या त्याच वेचक लोकांची यादी त्यांनी तयार केली.
त्यानंतर भाजपा जिल्हाध्यक्ष किशोर मांगटे यांना हाताशी धरले. आणि आपणच सार्वभौम असल्याचे थाटात स्वपक्षाच्याच संविधानाची ऐशी तैशी केली. आणि असंवैधानिक शब्दप्रयोग करीत आकोट मतदार संघातील ११ जणांना भाजपा बाहेरील वाट दाखवली.
यावरून स्पष्ट होते की, भारसाखळे यांनी अतिशय खडतर निवडणुकीत या सहकाऱ्यांची पूर्ण मदत घेतली. आणि नंतर “गरज सर्व वैद्य मरो” ही भूमिका घेतली. त्यावरच ते थांबले नाहीत, तर या लोकांनी भविष्यात आपल्याला पक्षांतर्गत आव्हान देऊ नये म्हणून त्यांच्याकरिता पक्षाची दारे कायमची बंद करण्याचाही बंदोबस्त केला.
वास्तविक या सहकाऱ्यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याचा एकही पुरावा नाही उलट भारसाखळे हेच आपादमस्तक घाणीने बरबटलेले आहेत. दर्यापूर मतदारसंघात त्यांनी भाजप सह मित्र पक्षाच्याही पाठीत खंजीर खुपसलेला आहे. परंतु त्याबाबत त्यांना ना खंत आहे ना अपराधीपणाची जाणीव आहे.
उलट आपल्या बाजार बुनग्यांच्या माध्यमातून भारसाखळे स्वतःच्या वल्गना करवून घेत आहेत. त्यांच्या पक्ष फितुरीचे अनेक पुरावे निलंबितांकडे आहेत. ती त्यांनी वरपर्यंत पाठवलेली आहेत. परंतु उच्च स्तरावरून त्याकडे कानाडोळा करण्यात आला. त्यामुळे “चोर सोडून सन्याशाला फाशी” देण्याच्या या अघोरी तंत्राने निलंबितांचे पित्त खवळले.
तिरीमिरीतच त्यांनी “शेंडी तुटो की पारंबी तुटो” या भूमिकेतून मुंबई येथील भाजपा प्रदेश कार्यालयात ऊपोषण करण्याचा निर्णय घेतला. पण तत्पूर्वी निलंबन प्रक्रियेत भारसाखळे यांनी अतिशय खुबीने एक तरतूद केली होती. ती अशी की, निलंबित लोकांनी आवाज काढला तर “आमदार साहेबांना भेटा. ते सगळे बरोबर करतील” असा सांगावा निलंबितांना सांगण्याची तजवीज भारसाखळे यांनी केली होती.
पण कट कारस्थानात माहीर असलेले भारसाखळे येथेच गोत्यात आले. त्यांच्या या सांगाव्याने या निलंबनाच्या कटाचे तेच मुख्य सूत्रधार असल्याचे बिंग फुटले. पण वास्तवात ह्या सांगाव्यामागे ह्या लोकांना आपल्या समोर नतमस्तक करून त्यांना अभयदान देण्याचा आणि कायम आपले अंकित ठेवण्याचा भारसाखळे यांचा डाव होता.
पण त्यांच्या कपट कारस्थानाचे बिंग फुटल्याने त्यांच्या मानभावी लबाडीच्या अवतनावर कुणीच भरवसा केला नाही. त्यामुळे या निलंबितांनी बाहेरून आलेल्या भारसाखळे यांचे समक्ष सजदा करण्यास साफ इन्कार केला. आणि त्याऐवजी पक्ष श्रेष्ठींकडे जाण्याचा रितसर मार्ग निवडला
आता या लढ्याचा अंत मुंबई मुक्कामी होणार आहे. त्यावर आकोट मतदार संघातील भाजपाईंचे भविष्य ठरणार आहे. या लढ्यात या कार्यकर्त्यांना अपयश आल्यास भारसाखळे निरंकूश होणार आहेत. त्याने त्यांचा एक छत्री अंमल कायम होवून पुढील कारकीर्दीत त्यांना पक्षांतर्गत कोणतेही आवाहन राहणार नाही.
परिणामी मागील दहा वर्षात भाजप कार्यकर्त्यांना त्यांनी जसे नजरेच्या जरबेत ठेवले तीच परंपरा पुढे सुरू राहणार आहे. परंतु त्यामुळे भाजपच्या पक्षीय संविधानाची ऐशी तैशी होणार आहे. वास्तवात भाजपच्या संविधानाशी भारसाखळे यांचे वर्तनाचा मेळ घातल्यास त्यांच्या अपराधाचे पारडे जड होऊन पार जमिनीत धसलेले तर भाजप संविधानाचे पारडे अवकाशात अधांतरी लोंबकळलेले दिसून येईल.
अशा स्थितीत भारसाखळे यांना मुसके बांधणे आवश्यक झाले आहे. कारण २०२९ मध्ये दर्यापूर मतदार संघाचे आरक्षणाचे बंधन सैल होणार आहे. त्यावेळी भारसाखळे तिथे जाणार आहेत. म्हणून जाता जाता आपल्याला त्रासदायक ठरलेल्यांचा काटा काढून त्यांना कायमचे उद्ध्वस्त करण्याचा भारसाखळे यांचा खुनशी डाव आहे.
सोबतच या कार्यकर्त्यांची कैक दशकांची पक्षीय निष्ठाही त्यांना धुळीस मिळवावयाची आहे. त्याकरिताच त्यांनी पक्षीय संविधानालाही पायदळी तुडविले आहे. त्यांच्या ह्या खुनशी वर्तनाने आकोट मतदार संघातील भाजपाईंना संपविण्याकरिता त्यांनी स्वत:च स्वतःला सुपारी दिल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या प्रकरणाचा अंत कसा होतो याबाबत कुतूहल वाढले आहे.