Tuesday, January 7, 2025
Homeराज्यआमदार भारसाखळे यांना लागले मंत्रिपदाचे डोहाळे…पक्षविरोधी वर्तन, प्रकृती, अन् वयोमान आडवे येण्याची...

आमदार भारसाखळे यांना लागले मंत्रिपदाचे डोहाळे…पक्षविरोधी वर्तन, प्रकृती, अन् वयोमान आडवे येण्याची शक्यता…

आकोट – संजय आठवले

साऱ्यांना अचंबित करीत तिसऱ्यांदा निवडून आलेल्या आमदार भारसाखळे यांना आता मंत्रीपदी विराजमान होण्याचे डोहाळे लागले असून त्याकरिता आपल्या ज्येष्ठत्वाच्या अनुभवाचा वशिला लावण्याचा प्रयास त्यांनी सुरू केला आहे. परंतु दर्यापूर येथे अपक्ष उमेदवाराची पाठराखण करीत केलेले पक्ष विरोधी वर्तन, ढासळते प्रकृती स्वास्थ्य, आणि वाढते वयोमान यांची अडचण निर्माण होऊन मंत्री बनवण्याचे भारसाखळे यांचे स्वप्न धूसरच राहणार की काय? असा प्रश्न संपूर्ण मतदारसंघात विचारला जाऊ लागला आहे.

शकुन अपशकुन यावर अपार निष्ठा असलेल्या महायुतीने कार्तिक अमावस्या टाळून मार्गशीर्ष शु.४ विनायक चतुर्थी अर्थात ५ डिसेंबर ह्या शुभ दिनी मुख्यमंत्री पदाचा शपथविधी संपन्न करण्याचा सुयोग निवडला आहे. याच सुयोगावर मुख्यमंत्री, २ उपमुख्यमंत्री, तथा मोठ्या मानाचे मानकरी असलेले अन्य आमदार यांचे शपथ ग्रहण होणार आहे.

मानाच्या या प्रथम पंक्तीमध्ये आपली ही पत्रावळी मांडली जावी याकरिता आमदार प्रकाश भारसाखळे यांनीही भाजपातील देवगणांना साकडे घालणे सुरू केले आहे. परंतु मागील दहा वर्षातील वर्तन, प्रकृती अस्वास्थ्य आणि वयोमान या संदर्भात आकोट मतदार संघातील असंतुष्ट आत्म्यांनी भाजपातील देवगणनांना आमदार भारसाखळे यांचे बाबत खडा न् खडा माहिती पुरविलेली आहे.

मागील दहा वर्षात आमदार भारसाखळे यांनी आकोट, तेल्हारा येथील कर्मठ, निष्ठावान, आणि जुन्या जाणत्या भाजपाईंशी कायम दुरावा ठेवलेला आहे. आकोट, तेल्हारा येथील नगरपरिषद अध्यक्ष, नगरसेवक यांना कोणतीही श्रेय मिळणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली आहे. यासह अन्य नेते, कार्यकर्ते कुठेच मोठे होणार नाहीत याचीही डोळ्यात तेल घालून निगराणी केली आहे.

आपल्या प्रत्येक भाषणातून त्यांनी या सार्‍यांना या ना त्या कारणाने डिवचण्याचा, अपमानित करण्याचा एकही मोका सोडलेला नाही. एवढेच नाही तर भाजपाची मातृसत्ता असलेल्या संघ परिवारातील कुणालाही तोंडी लावलेले नाही. अगदी पक्षीय कामातही त्यांनी केवळ नावापुरताच सहयोग दिला. त्यामुळे त्यांचे बाबतची पक्षांतर्गत नाराजी दिवसागणिक वाढतच गेली.

त्यातच त्यांच्या वाढत्या वयोमानामुळे त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्याने उचल खाल्ली. अनेक व्याधी त्यांना जडल्या. वास्तविक पाहता प्रकृती अस्वास्थ ही विरोधकांची देण नाही. खानपान, राहणीमान, शारीरिक, मानसिक दगदग, अवेळी अवांछित आहार यातील बदलाने कोणताही माणूस व्याधीग्रस्त होतो.

त्यामुळे व्याधीग्रस्त होणे हे नैसर्गिक मानले जाऊ शकते. पण आमदार म्हणून धावपळीचे, दगदगीचे काम करताना ह्या व्याधी माणसाला कमजोर करतात. वाढत्या वयोमानासोबत ह्या व्याधीही वाढतच जातात. असाच प्रकार भारसाखळे यांचे बाबत घडलेला आहे. त्यामुळे वाढते वयोमान आणि आजारपण या दोन्ही बाबी त्यांच्या कामाच्या तडफेत अडचणीच्या ठरु लागल्या.

अशातच निवडणूक प्रक्रिये दरम्यान भारसाखळे यांनी पक्ष विरोधात फार मोठे पाऊल उचलले. आकोट मतदार संघ भाजपाच्या वाट्याला तर दर्यापूर मतदारसंघ भाजपाचा मित्रपक्ष अर्थात शिंदेसेनेच्या वाट्याला गेला. त्यामुळे युती धर्माचे पालन म्हणून भारसाखळे यांनी शिंदे सेनेच्या उमेदवाराचे काम करणे बंधनकारक होते.

मात्र त्यांनी पक्षादेश धुडकवून लावीत दर्यापूर मतदारसंघात आपला प्यादा असलेल्या रमेश बुंदिले यांना अपक्ष उभे केले. त्यावरच न थांबता त्यांनी युती उमेदवाराचे इमाने ईतबारे काम करण्याच्या दुसऱ्या पक्षादेशालाही ठोकर मारली. आणि बुंदिले यांचीच पाठराखण केली. या साऱ्या घडामोडीतील कहर म्हणजे भाजपचा कमल छाप गमछा गळ्यात घालून चक्क अपक्ष उमेदवार रमेश बुंदिले यांना मतदान करण्याचे आवाहन त्यांनी दर्यापूर येथील मतदारांना केले.

ऐन मतदानाचे आदल्या दिवशीच हे आवाहन करून तो व्हिडिओही त्यांनी वायुगतीने व्हायरल केला. असे करून भारसाखळे यांनी पक्षबिक्ष एका बाजूला आणि आपला अहंकार दुसर्‍या बाजूला असा संदेश भाजप श्रेष्ठींना दिला. अर्थात या साऱ्या करामती ना. गडकरी, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि भाजप प्रांताध्यक्ष बावनकुळे यांना चांगल्याच ठाऊक आहेत.

त्यामुळे त्याबाबतीत बेईमानी करणारे भारसाखळे अत्यंत अटीतटीच्या प्रसंगी पक्षाशी इमान राखतील काय? असा प्रश्न भाजपाच्या या त्रिदेवांनाही पडलेला आहे. आता ह्या बेइमानीची शिक्षा भारसाखळे यांना देण्याची आयती संधी गडकरी, फडणवीस आणि बावनकुळे या त्रिदेवांना आयतीच चालून आलेली आहे. त्यामुळे मागील पापांचे प्रायश्चित ते भारसाखळे यांना देऊ शकतात.

त्यातच फडणवीसांबाबत एक मजेदार किस्सा घडलेला आहे. दक्षिण कराड या मतदारसंघात काँग्रेस कडून पृथ्वीराज बाबा चव्हाण हे उभे होते. त्यांचे वय सत्तरी पार आहे. अशा स्थितीत दक्षिण कराड येथील प्रचारादरम्यान फडणवीस यांनी पृथ्वीराज बाबा यांच्या वयोमानाला टार्गेट करीत आमदाराची व्याख्या सांगितली. मतदारांना फडणवीस म्हणाले कि, उमेदवार हा तरुण, तडफदार, उमदा, लोकांची कामे करणारा, त्यांचे मदतीस अर्ध्या रात्री धावून जाणारा असावा”.

अर्थात उमेदवार असा हवा तर मंत्रीही त्याच पठडीतील असावा हे ओघाने आलेच. अशा स्थितीत उमेदवार म्हणून नापास ठरलेले भारसाखळे मंत्री पदाकरिता ही नापास ठरतात. त्यातच राज्यात निवडून आलेल्या वयोवृद्ध आमदारांच्या टॉप फाईव्ह यादीमध्ये भारसाखळे यांचा समावेश आहे. छगन भुजबळ ७७ वर्षे, दिलीप सोपल ७५ वर्षे, गणेश नाईक ७४ वर्षे, रवीशेठ पाटील ७३ वर्षे, आणि प्रकाश भारसाखळे ७२ वर्षे अशी ही यादी आहे.

अशा स्थितीत भाजपाने मंत्री न बनविले जाणाऱ्या आमदारांना पक्षीय जबाबदारी सोपवण्याचा मनसुबा केला आहे. भारसाखळे यांनी गत दहा वर्षात पक्ष उभारणी करिता एकही काम केलेले नाही. पक्षीय कार्यक्रमात केवळ आपला “मुखडा चांद का तुकडा” दाखविण्यापुरतेच ते गेलेले आहेत. त्यातही त्यांनी आकोट, तेल्हारा येथील पक्ष नेते कार्यकर्ते यांना प्रताडीत करण्याचेच काम केले. अनेकांना पक्षीय कामातून बाद केले.

अन निवडणुकीच्या तोंडावर काहीजणांना पक्ष सोडून जाण्यास बाध्य केले. भारसाखळे यांच्या ह्या कृतीने सुप्रसिद्ध हिंदी चित्रपट अमर प्रेम मधील एक डायलॉग आठवला. चित्रपटाचा नायक राजेश खन्ना यांना नाईका शर्मिला टागोर म्हणतात, “एक चुटकी सिंदूर की कीमत तुम क्या जानो रमेश बाबू”?. नेमका तोच डायलॉग भासाखळे यांना फिट बसतो.

“पक्षनिष्ठा की कीमत तुम क्या जानो प्रकाश बाबू”? अनेक पक्ष बदल करीत भाजपात स्थिरावलेले भारसाखळे सत्तेतच राहत आल्याने त्याना पक्ष कार्यच ठाऊक नाही. त्यामुळे पक्ष वाढीकरिता काय टोले घ्यावे लागतात, हे समजावे म्हणून आता भाजपाने भारसाखळे यांचे मागील वर्तन, पक्षाशी केलेली प्रतारणा, त्यांचे वार्धक्य, त्यांचे आजारपण हे ध्यानात ठेवून त्यांना मंत्रीपदा ऐवजी पक्षीय जबाबदारी सोपवावी असा मतप्रवाह मतदारसंघात वाहू लागला आहे.

Sanjay Athavle
Sanjay Athavlehttp://mahavoicenews.com
नमस्कार, मी संजय आठवले रा. खानापूर वेस आकोट जिल्हा अकोला. मी मागील तीस वर्षांपासून पत्रकारिता करित आहे. समाजातील असामाजिक तत्त्वे, अराजकता, भ्रष्टाचार, अन्याय या विरोधात आवाज उचलण्याचा माझा जन्मताच स्वभाव आहे. त्यातूनच महाविद्यालयीन जीवनात वाचनाशी माझा जवळून संबंध आला. आणि तेव्हा निर्माण झालेली वाचनाची आवड आजतागायत कायम आहे. त्यानेच मराठी भाषेचे बऱ्यापैकी ज्ञान झाल्याने वाणिज्य पदवीधर झाल्यानंतर मी छंद म्हणून पत्रकारिता करू लागलो. त्यातील शोध पत्रकारितेत मला अधिक रुची आहे. अनेक रहस्य उलगडून जगापुढे आणणे मला अत्यंत आवडते. आता मी महा व्हाईस न्यूज चा कार्यकारी संपादक म्हणून कार्यरत आहे. महा व्हाईस न्यूजने पत्रकारितेचा फ्रीहँड दिल्याने विविध स्तरातील, विविध क्षेत्रातील जोखमीची पत्रकारिता मी करू शकत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: