आपल्या दबंग शैलीमुळे राजकीय आणि प्रशासकीय क्षेत्रात वेगळा धाक असलेले अचलपूरचे आमदार तथा प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावणी आहे. या आधीही मागील वर्षी अमरावती न्यायालयाने बच्चू कडू यांना दोन महिन्याची शिक्षा व २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. यावेळी नाशिक महापालिकेचे आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी बच्चू कडू यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाची सुनावणी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात सुरू होती.
आज अखेर न्यायालयाने बच्चू कडू यांनी दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने बच्चू कडू यांनी दमदाटी करणे आणि सरकारी कामांत अडथळा आणणे, या दोन कलमांतर्गत दोषी ठरवलं आहे. बच्चू कडूंना अशा प्रकारे शिक्षा सुनावल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
२०१७ साली अपंग लोकांनी नाशिक महापालिका आयुक्तांविरोधात आंदोलन केलं होतं. अपंगांसाठी असलेला निधी महापालिका आयुक्तांनी खर्च केला नव्हता, असा आरोप त्यांच्यावर होता. त्यामुळे दिव्यांग लोकांनी नाशिक महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्याविरोधात आंदोलन केलं. पण या आंदोलनाची दखल महापालिका आयुक्तांनी घेतली नाही.
त्यामुळे आमदार बच्चू कडू अपंगाच्या समस्या घेऊन महापालिका आयुक्तांच्या दालनात गेले. अपंगाच्या मागण्या मांडत असताना बच्चू कडू आणि महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्यात बाचाबाची झाली. यावेळी बच्चू कडू यांनी आयुक्तांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी २०१७ साली बच्चू कडू यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणावर नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी सुरू होती. अखेर आज न्यायालयाने बच्चू कडू यांनी दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे.