मिस युनिव्हर्स 2022 ची घोषणा झाली आहे. अमेरिकेच्या आर बोनी गॅब्रिएल हिला मिस युनिव्हर्स 2022 चा ताज मिळाला आहे. मिस युनिव्हर्स 2021 हरनाज संधूने तिचा मुकुट गॅब्रिएलला सुपूर्द केला. व्हेनेझुएलाच्या अमांडा डुडामेलला स्पर्धेतील प्रथम उपविजेते म्हणून घोषित करण्यात आले. डोमिनिकन रिपब्लिकची अँड्रिना मार्टिनेझ ही दुसरी उपविजेती ठरली. भारताची दिविता राय उपांत्य फेरीत पोहोचल्यानंतर बाहेर पडली.
71 वी मिस युनिव्हर्स स्पर्धा अमेरिकेच्या लुईझियाना राज्यातील न्यू ऑर्लिन्स शहरात आयोजित करण्यात आली होती. जगभरातील 84 स्पर्धकांना पराभूत करून गॅब्रिएलने मुकुटावर कब्जा केला आहे. व्हेनेझुएला, अमेकिता, पोर्तो रिको, क्र्युरासाओ आणि डोमिनिकन रिपब्लिकमधील स्पर्धक टॉप-5 मध्ये पोहोचले आहेत. संध्याकाळच्या गाऊन फेरीनंतर भारताच्या दिविता रायचा प्रवास संपला आणि तिला टॉप-५ मध्ये स्थान मिळवता आले नाही.
मिस युनिव्हर्स स्पर्धेच्या अंतिम फेरीत, पहिल्या तीन स्पर्धकांना विचारण्यात आले की जर त्यांनी आज मुकुट जिंकला तर या संघटनेला एक मजबूत आणि प्रगतीशील संघटना म्हणून दाखवण्यासाठी ते काय करतील? गॅब्रिएलच्या उत्तरामुळे ती विजेती ठरली. जगभरातील महिलांना प्रोत्साहन देणे हा या सौंदर्य स्पर्धेचा उद्देश आहे. स्पर्धेत विविध देशांतील मुली आपल्या देशाच्या संस्कृतीचे प्रतिनिधित्व करतात.
रिपोर्ट्सनुसार, यावेळी मिस युनिव्हर्सचा मुकुट खूप खास आहे. यावेळी ताजला ‘फोर्स फॉर गुड’ असे नाव देण्यात आले आहे. वृत्तानुसार, या ताजची किंमत सुमारे 49 कोटी रुपये आहे. मिस युनिव्हर्स स्पर्धा 1952 मध्ये सुरु झाली होती. या स्पर्धेचे पहिले विजेतेपद आर्मी कुसेलाने पटकावले. अमेरिकेची मिस युनिव्हर्स ऑर्गनायझेशन या सौंदर्य स्पर्धेचे आयोजन करते. अहवालानुसार, त्याचे वार्षिक बजेट सुमारे $100 दशलक्ष आहे. उल्लेखनीय आहे की, गेल्या वर्षी भारताच्या हरनाज संधूने ही स्पर्धा जिंकून भारताचा गौरव केला होता.