सांगली – ज्योती मोरे.
कर्नाटक राज्याची वाजपेयीश्रीसह अन्य वैद्यकीय योजनांचा लाभ मिरज-सांगली शहरातील अनेक हॉस्पिटलमध्ये उपचार घेणार्या कर्नाटक रूग्णांना मिळत नाही. त्यामुळे रूग्णांची फरफट आणि हॉस्पिटल प्रशासनाची मोठी अडचण होत आहे.
मिरज मेडिकल सक्षम करण्यासाठी कर्नाटक राज्याने सहकार्याची भमिका घेण्याची मागणी मिरज सुधार समितीने कर्नाटकाची मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी माजी राज्यमंत्री आमदार विश्वजीत कदम, आमदार विक्रम सावंत, निपाणीचे माजी आमदार काकासाहेब पाटील, सांगली शहर जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष पृथ्वीराज पाटील उपस्थित होते.
रविवारी कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिध्दरामय्या सांगली जिल्ह्याच्या दौर्यावर आले असता, भारती हॉस्पिटल संकुलमध्ये सांगली शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या पुढाकाराने मिरज सुधार समितीचे अॅड. ए. ए. काझी, अध्यक्ष असिफ निपाणीकर, समन्वयक शंकर परदेशी, कार्यवाह जहीर मुजावर, उपाध्यक्ष संतोष जेडगे, राकेश तामगावे आदी सदस्यांनी मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांची भेट घेतली.
कर्नाटक राज्यातील रूग्णांसाठी वरदान लाभलेल्या वाजपेयीश्री योजनांसह अन्य वैद्यकीय योजना मिरज-सांगली शहरात प्रभावीपणे राबविण्याबाबत कर्नाटक सरकारने योग्य ते उपाय योजना कराव्यात.कर्नाटक सरकारने शक्ती योजनांतर्गत महिलांसाठी मोफत बस सेवा सुरू केली आहे.
मात्र, या योजनेचा लाभ कर्नाटक सिमेपर्यंतच दिला जातो. वैद्यकीय उपचार, शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात कर्नाटकातील नागरिक मिरजेला येतात. म्हणून शक्ती योजना मिरजेपर्यंत वाढवावी, अशी मागणी मिरज सुधार समितीने मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.