आकोट- संजय आठवले
अकोला जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांच्या सभापतींचे आरक्षण घोषित झाल्यावर आता सातही पंचायत समित्यांच्या सभापती, उपसभापतींची निवड १६ ऑक्टोबर रोजी केली जाणार आहे. त्यासाठी आकोट पंचायत समिती मधील वंचित बहुजन आघाडीचे सात सदस्य अज्ञातस्थळी रवाना झाल्याची माहिती आहे. तर उर्वरित सेना, भाजप, काँग्रेस व प्रहार यांचे गोटात विचार विनिमय सुरू असून स्थानिक नेते पक्षश्रेष्ठींचे आदेशाने निर्णय घेणार असल्याचे समजते.
ह्यावेळी आकोट पंचायत समिती सभापती पद हे सर्वसाधारण महिलेकरिता आरक्षित करण्यात आलेले आहे. या पंचायत समितीमध्ये वंचित- ७, शिवसेना- ४, भाजप- ३, काँग्रेस- १ व प्रहार- १ असे पक्षीय बलाबल आहे. वंचित आघाडीच्या ७ सदस्यांमध्ये ६ महिला आहेत. शिवसेनेच्या ४ सदस्यांमध्ये २ महिला आहेत. तर भाजपचे ३ पैकी ३ व काँग्रेस आणि प्रहार चे प्रत्येकी १, १ असे दोन्ही सदस्य पुरुष आहेत. अशा स्थितीत या ठिकाणी फक्त वंचित आघाडी आणि शिवसेना हे दोनच पक्ष उमेदवार लढवू शकतात. परंतु गोम अशी आहे की, दोघांकडेही स्पष्ट बहुमत नाही. स्पष्ट बहुमतासाठी वंचितला २ तर सेनेला तब्बल ५ मतांची निकड आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांना कमी पडलेल्या मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. सेनेने आपले वर्चस्व सिद्ध करण्याकरिता भाजप, काँग्रेस व प्रहार या तिघांनाही सोबत घेतले तरच सेना बहुमत प्राप्त करू शकते. परंतु सद्यस्थितीत राज्यातील राजकीय पक्षांची बैठक पाहू जाता शिवसेना व भाजप चे संबंध अगदी विकोपाला गेलेले आहेत. प्रहार भाजपसोबत आहे.
अशा स्थितीत आकोट पंचायत समितीवर शिवसेना अर्थात उद्धव ठाकरेंचा ध्वज फडकविण्याकरिता जिल्ह्याचे पालकमंत्री दस्तूर खुद्द देवेंद्र फडणवीस असताना, भाजप सेनेला मदत करेल असे म्हणणे अतिशय हास्यास्पद आहे.
मागील वेळी सभापती पदाचा उमेदवार नसल्याने भाजपने उपसभापती पदाकरिता उमेदवार देऊन आपली तीनही मते आपल्याकडेच ठेवली होती. तर सेनेने आपली ४ व काँग्रेस आणि प्रहार चे २ अशी ६ मते प्राप्त केली होती. परंतु आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. उद्धव ठाकरे आणि भाजपचे पूर्णतः फाटले आहे. तशातच प्रहारनेही कुस बदलली आहे. आता प्रहार शिंदे भाजप युती सोबत आहे. त्यामुळे यावेळी मागील घटनाक्रमाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता अधिक आहे. आणि असे झाल्यास प्रहार चे मत भाजपला जाण्याची खात्री आहे. त्यामुळे सेनेचे १ मत कमी होऊन भाजपच्या मतात १ ने वाढ होऊ शकते.
परिणामी आपली ७ मते अभंग ठेवून वंचित आघाडी सभापती, उपसभापती पदाचा डंका वाजवू शकते. अशा स्थितीत वंचितच्या मतांमध्ये वाढ होण्याची ही दाट शक्यता आहे. ती अशी की, मागील समीकरणाची यावेळी ही पुनरावृत्ती होणार असल्याचे ध्यानात आल्यावर सत्ताधारी पक्षाशी जवळीक साधण्याचे हेतूने वंचित बाहेरील एक दोघे वंचितशी समेट करू शकतात. त्यामुळे एकूणच सर्व बाजूंचा साकल्याने विचार करता वंचित आघाडी करिता वातावरण अनुकूल असल्याचे जाणवत आहे. त्यामुळे वंचितच्या मतात वाढ होऊन त्यांचे सभापती उपसभापती निवडून आल्यास आश्चर्य वाटावयास नको.