निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला खरी शिवसेना म्हणून मान्यता दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या गटनेत्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत पुढील वाटचालीवर चर्चा होऊ शकते, असे मानले जात आहे. पक्षाचे नेते, प्रवक्ते यांच्यासह बडे नेते या बैठकीला उपस्थित राहू शकतात. ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी ही बैठक होणार आहे. निवडणूक आयोगाचा हा निर्णय शिवसेनेतील उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे.
निवडणूक आयोगाने शुक्रवारी एकनाथ शिंदे गटाला ‘शिवसेना’ आणि त्याचे निवडणूक चिन्ह ‘धनुष्यबाण’ देण्याचा निर्णय घेतला आहे. 1966 मध्ये बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेल्या शिवसेनेवरील ठाकरे घराण्याचे नियंत्रण संपल्याचे मानले जाते. सहा महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगात याचिका दाखल केली होती. त्यावर आता त्रिसदस्यीय आयोगाने एकनाथ शिंद यांच्या बाजूने निकाल दिला आहे.
शिंदे गटाकडे बहुमत आहे
एकनाथ शिंदे यांना पक्षाच्या 55 पैकी 40 आमदार आणि 18 लोकसभा खासदारांपैकी 13 खासदारांचा पाठिंबा आहे. संख्याबळाच्या आधारावर निवडणूक आयोगाने शिंदे गटालाच खरी शिवसेना मानली आहे. आयोगाने आपल्या निर्णयात म्हटले आहे की, शिंदे गटाला ४० आमदार पाठिंबा देत आहेत, त्यामुळे शिंदे गटाला मिळालेल्या एकूण ४७,८२,४४० मतांपैकी ३६,५७,३२७ मतांचा पाठिंबा आहे, जे एकूण मतांच्या ७६ टक्के आहे. . दुसरीकडे, उद्धव ठाकरे गटाला केवळ 15 आमदारांचा पाठिंबा असून त्यांना केवळ 11,25,113 मते मिळाली आहेत.
आम्ही मातोश्री सोबतच
दरम्यान, शिवसेना नाव आणि चिन्हाचा निर्णय काल निवडणूक आयोगाने दिल्यानंतर मुंबईत आणि महाराष्ट्रात शिवसैनिकांकडुन निषेध केला जातोय. दादरमध्ये लोकशाहीची हत्या.. असा मजकूर लिहिलेले बॅनर्स लागले आहेत.
शिवसेना भवनाखालीही एक बॅनर लागला आहे. त्यावर निर्णय काहीही असो. आम्ही शिवसैनिक कायम मातोश्री आणि ठाकरे परिवारासोबत एकनिष्ठ राहणार आहोत, असं या बॅनरवर लिहिलं आहे. शिवसैनिकांनी बॅनरवरून आपल्या भावना बोलून दाखवल्या आहेत.
उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी निवडणूक आयोगाला देशासाठी धोकादायक ठरवत आयोगाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचे सांगितले. दुसरीकडे, एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगाचा निर्णय हा सत्य आणि जनतेचा विजय असल्याचे सांगितले. एकनाथ शिंदे यांनी गेल्या वर्षी जूनमध्ये महाराष्ट्रात भाजपसोबत सरकार स्थापन केले होते. शनिवारी होणाऱ्या उद्धव ठाकरे गटाच्या बैठकीत सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याबाबत चर्चा होऊ शकते, असे मानले जात आहे.