सेंद्रिय पद्धतीने कापूस लागवडीसह स्थानिक प्रक्रिया उद्योगाची साखळी सर्वदूर कार्यान्वित होणे गरजेचे :- कुलगुरू डॉ. शरद गडाख
नागपुरात कापूस पिकावर देशभरातील कापूस तज्ञाचे मंथन!
अखिल भारतीय समन्वयीत कापूस संशोधन प्रकल्पाच्या वार्षिक आढावा बैठकीचे उदघाटन संपन्न!
डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला व केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूरचा संयुक्त उपक्रम!
अकोला – संतोषकुमार गवई
जागतिक हवामान बदलाच्या कालखंडात खुल्या बाजारपेठेच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेती शाश्वत आणि शेतकरी संपन्न होण्यासाठी कापसासारख्या नगदी पिकाला गंभीरतेने घेणे काळाची गरज असून कपाशीच्या अधिक उत्पादन वाढीसाठी अतिघनता लागवड पद्धतिसह यांत्रिकीकरण गरजेचे असल्याचे प्रतिपादन भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्लीच्या पीक विज्ञान विभागाचे उपमहानिदेशक डॉ. तिलकराज शर्मा यांनी केले.
कापूस पिकासाठी अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्पाच्या दोन दिवसीय वार्षिक आढावा बैठकीचे दिनांक ५-६ एप्रिल २०२४ रोजी ऑरेंज सिटी नागपुर येथे आयोजन करण्यात आली आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला व केंद्रिय कापुस संशोधन संस्था, नागपुर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या बैठकीच्या उदघाटन प्रसंगी देशभरातील 21 अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्पासह निमशासकीय, सहकारी, खाजगी तथा सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी तथा प्रगतीशील शेतकरी प्रतिनिधीसह उपस्थितांना उदघाटनपर प्रमुख अतिथी म्हणून संबोधित करतांना ते बोलत होते.
आपल्या अतिशय अभ्यासपूर्ण आणि अनुभवाधारित मार्गदर्शनात डॉ. शर्मा यांनी अतिशय सुस्पष्ठ आणि परखड मत प्रदर्शित करीत देशांतर्गत सध्याची पीक पद्धती आणि कृषि संशोधकांची भूमिका अधोरेखित केली. काळसुसंगत पीक वाण, सेंद्रिय – एकात्मिक अन्नद्रव्य तथा कीड रोग व्यवस्थापन, बाजारात अधिक स्थान असणाऱ्या तंत्रज्ञानाचे सर्वदूर प्रशिक्षणे आणि प्रात्यक्षिके, उत्पादन तंत्रज्ञानासह सेंद्रिय तथा रंगीत कापुस पिकासाठी विविध पद्धतीवर सविस्तर उहापोह डॉ. शर्मा यांनी आपल्या मार्गदर्शनात करीत या दोन दिवसांच्या संमेलनातून देशांतर्गत शेती व्यवस्थेला सक्षम तंत्रज्ञान आणि शिफारशी देता येतील असा आशावाद व्यक्त केला.
तर सध्याच्या हवामान आणि बाजारपेठांच्या अस्थिर आणि स्पर्धेच्या परिस्थितीत शैक्षणिक, संशोधनात्मक आणि विस्तार कार्य करणाऱ्या संस्थांसह प्रशासकीय विभागांच्या एकात्मिक प्रयत्नांची गरज अधोरेखित करताना डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी काळाची गरज ओळखून सेंद्रिय पद्धतीने कापूस लागवडीचे तंत्रज्ञान सर्वदूर प्रसारित होण्यासाठी सार्वत्रिक प्रयत्नांची मोट बांधण्याचे महत्वपूर्ण आवाहन शेती क्षेत्रातील शास्त्रज्ञांना केले.
शेतकरी बांधवांच्या मागणीनुसार राष्ट्रीय संस्थाच्या सहयोगातून बीटी कापून वाण उपलब्ध करून देण्यात आल्याचे सांगत विदर्भाचा विचार करता कापूस प्रक्रिया उद्योगांचे जाळे अधिक घट्ट करण्याची गरज देखील त्यांनी अधोरेखित केली. जागतिक बाजारपेठेत आता रसायन विरहित सेंद्रिय अथवा नैसर्गिक पद्धतीने उत्पादित शेतमालाला प्रचंड वाव असून आरोग्यदायी आणि फायदेशीर अन्नधान्य, भाजीपाला, फळ पिकांसह नगदी पिकांचे सुद्धा उत्पादन तंत्रज्ञान सहजतेने उपलब्ध झाले असून आत्मनिर्भर ग्रामव्यवस्थेसाठी शेतकरी- संशोधक- शासकीय विभाग आणि राज्यकर्त्यांनी एकात्मिक पद्धतीने कार्य करण्याचे आवाहन देखील डॉ. गडाख यांनी आपल्या अध्यक्षीय संबोधनात केले.
वसंतराव नाईक प्रशिक्षण संस्था (वनामती), नागपुर येथील सभागृहात संपन्न झालेल्या या अतिशय महत्वाकांक्षी बैठकीच्या उदघाटन प्रसंगी भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्लीच्या पीक विज्ञान विभागाचे उप महानिदेशक डॉ. तिलकराज शर्मा, सहाय्यक महनिदेशक (बियाणे) डॉ. डी. के. यादवा, सहाय्यक महनिदेशक (व्यापारी पिके) डॉ. प्रसंता दाश, केंद्रिय कापुस संशोधन संस्था, नागपुरचे निदेशक डॉ. वाय. जी. प्रसाद, कृषि वैज्ञानिक भरती बोर्ड,
नवी दिल्लीचे माजी अध्यक्ष तथा अखिल भारतीय समन्वित कापुस संशोधन प्रकल्पाच्या कार्यक्रम निरीक्षण आणि सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. चारुदत्त मायी, केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्था मुंबईचे निदेशक डॉ. एस. के. शुक्ला, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे,यांचे विशेष उपस्थितीसह केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे शास्त्रज्ञ तथा अखिल भारतीय समन्वित कापूस संशोधन प्रकल्पाचे नोडल अधिकारी डॉ. जी.टी बेहेरे, कृषी महाविद्यालय नागपूरचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रकाश कडू यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.
याप्रसंगी डॉ. डी. के. यादवा, डॉ. प्रसंता दाश, डॉ. चारुदत्त मायी, डॉ. एस. के. शुक्ला, यांनी समायोचित मार्गदर्शन केले.डॉ. डॉ. विलास खर्चे यांनी स्वागतपर भाषण केले तर डॉ. गणेश बेहरे यांनी संशोधन उपलब्धीचे सादरीकरण केले. निदेशक डॉ. वाय. जी. प्रसाद यांनी देखील आपले विचार मांडले. उदघाटन सत्राचे सूत्रसंचालन विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे यांनी केले तर वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ कापूस डॉ. सुरेंद्र देशमुख यांनी उपस्थितांचे आभार मानले.
दोन दिवसीय या बैठकीत एकूण नऊ तांत्रिक सत्रांचे माध्यमातून देशभरातील कापुस पिकाबाबत सरकारी व खाजगी संस्थेद्वारे चालणाऱ्या संशोधनाचा आढावा घेण्यात येणार आहे. या बैठकीत नविन वाण व तंत्रज्ञान प्रसारित करण्यासोबतच कापसाची उत्पादकता वाढविण्यासाठीच्या उपाय योजनांवर सांगोपांग चर्चा होणार आहे.
महाराष्ट्र राज्यात सन 2005 नंतर प्रथमच अश्या प्रकारच्या वार्षिक आढावा बैठकीचे आयोजन होत असून या बैठकीच्या यशस्वी आयोजनाकरिता डॉ. विलास खर्चे, संशोधन संचालक, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला यांच्या मार्गदर्शनात डॉ. प्रकाश कडु, सहयोगी अधिष्ठाता, कृषि महाविद्यालय, नागपुर, डॉ. सुरेंद्र देशमुख,
वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ (कापूस), डॉ. गणेश बेहरे, नोडल अधिकारी, अखिल भारतीय समन्वित कापुस संशोधन प्रकल्प, नागपुर यांच्यासह कृषि महाविद्यालय, नागपुर येथील सर्व प्राध्यापक वर्ग, कापुस संशोधन विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला चे शास्त्रज्ञ अथक परिश्रम करीत आहेत.