आकोट – संजय आठवले
कावड यात्रेच्या निमित्त्याने आकोट शहरात अनेक बाबी लक्षवेधी ठरल्या असून त्यामध्ये प्रशासनाद्वारे कावड मार्गावर अंथरलेल्या चटया, कावड मंडळाना नवनीत राणांच्या भेटी, त्याद्वारे झालेली आमदार भारसाखळे यांची गोची आणि राणाबाईंचे फाडलेले बॅनर या बाबी ठळकपणे द्रुगोच्चर झाल्या असून या घटनांना दोन दिवस उलटून गेल्यावर अद्यापही त्याबाबतच्या चर्चा जनमानसात रंगत आहेत.
आकोट शहरातील कावड मार्गावर येणारा मोठे बारगण ते महात्मा ज्योतीबा फुले चौक या मार्गदरम्यान बांधकाम सुरू आहे. खडीकरणाच्या पुढील टप्प्यात काम आलेले आहे. त्यामुळे संपूर्ण रस्त्यावर खडी, बारीक गिट्टी पसरलेली आहे. खांद्यांवर भल्या मोठ्या अवजड कावडी घेऊन अनवाणी पायांनी या मार्गाने जाणे कावडधारकांना अतिशय खडतर होणार असल्याने प्रशासनाद्वारे या मार्गावर चटया टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार कृती केली गेली. परंतु यापूर्वी कधीच न अनुभवलेला हा प्रकार आकोटकरांना अचंब्यात पाडणारा ठरला.
रस्त्यावर असलेल्या ह्या चटयांवर जनमानसात अनेक तर्कवितर्क लावले जात होते. अनेक चिलमी खबर्यांनी या चटया नवनीत राणाच्या स्वागताकरिता टाकल्याच्या गप्पा पसरविल्या. तर कैकांनी ह्या कावडधारकांकरीता अंथरल्याचे मत मांडले. या चटयांचे शेवटचे टोक असलेल्या मोठे बारगण परिसरातही याबाबत मोठा आक्रोश बघावयास मिळाला. गेल्या तीन महिन्यांपासून हे काम पूर्ण न करता कावडच्या कालावधीतच हा प्रकार का केला गेला? असा अनेकांचा प्रश्न होता. तर मते मिळविण्याकरिता आमदार भारसाकळे हे असे नाटक करीत असल्याचे अनेकांचे मत होते.
पण आता भारसाखळे यांनी कोणतेही नाटक केले तरी त्यांना मते मिळणार नसल्याबाबत मात्र मोठे बारगण परिसर ठाम असल्याचे जाणवले. याच ठिकाणी नवनीत राणा यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. परंतु भारसाखळे यांचे वरील रोषामुळे या सोहळ्याकरिता त्यांना निमंत्रण देण्यात आले नव्हते.
पण राणाबाईंच्या मागे मागे ते आल्यास नाईलाजाने त्यांना मान द्यावा लागेल. अन्यथा त्यांना या भागात एंट्रीच नसल्याचे अनेक जण छातीठोक बोलत होते. कधीकाळी भारसाखळे यांना डोईवर घेऊन भरभरून मते देणाऱ्या या परिसरात आता मात्र त्यांचे बाबत मोठा क्रोध उफाळत असल्याचे दिसले.
एकीकडे मोठे बारगणात हे चित्र दिसत असले तरी कावड यात्रा आरंभबिंदू जवळ वेगळेच नाटक रंगत होते. राणाबाईंच्या एकपात्री प्रयोगात आपल्याला पाहुणा कलाकार म्हणूनही भूमिका नसल्याचे भारसाखळे यांना मनोमन उमगले होते. परंतु ऐनवेळी रंगमंचावर घुसून टाळ्या मिळविण्याचे कसब अंगी असलेल्या भारसाखळे यांनी यावर नामे शक्कल लढवली. ज्या लोकांनी राणाबाईंना आमंत्रित केले होते त्यांना भारसाखळे भेटले आणि विनोदाने बोलत असल्याचा आभास निर्माण करून त्यांनी मनातील खदखद व्यक्त केली. आणि राणाबाई सोबत बारगणात उपस्थित राहण्याचा मार्ग मोकळा करून घेतला.
आयोजकांना भारसाखळे म्हणाले कि, “आता त्या बाईले बलावलं आमच्या छाताडावर. आमाले आमंत्रणच देलं नाई. म्हंजे आमी येऊच नोय तथी असा तुमचा ईचार दिसते”. हे ऐकून आयोजक चांगलेच गांगरले. आणि काहीही न सूचून त्यांनी या सोहळ्यात येण्याचे आमंत्रण भारसाखळे यांनाही दिले.
ते म्हणाले, “नाई नाई भाऊ असं काई नाई. तुमच्याशिवाय कार्यक्रम कसा व्हईन? तुमाले तं याच दागिने. आणि याच क्षणाची वाट बघणाऱ्या भारसाखळे यांनी आमंत्रणाचा चटकन स्वीकार करून कार्यक्रमाची वेळ विचारून घेतली. सोबतच आपण सोहळ्याला न चुकता अगदी वेळेवर येण्याचे मान्य ही केले. कावडच्या निमित्त्याने नवनिर्वाचित खासदार अनुप धोत्रेही आकोटात आलेले होते. त्यांनाही राणाबाईच्या सोहळ्याकरिता आमंत्रित करण्यात आले.
अशाप्रकारे राणाबाईच्या एकपात्री प्रयोगात फ्री पास घेऊन आमदार भारसाकळे यांनी रंगमंचावरील आपली भूमिका ही पक्की करून टाकली. नियोजित वेळेवर राणाबाई आल्या. अर्थात खासदार अनुप धोत्रे आणि आमदार भारसाखळे सोबतीला होतेच. परंतु सत्कार मंचावर येताच एका विदारक दृश्याने साऱ्यांचे लक्ष वेधले. सत्कार मंचाच्या अगदी समोरच रस्त्याच्या कडेला राणाबाईचे बॅनर लावलेले होते. काही युवकांनी राणाबाई समोरच ते बॅनर फाडले.
अशा स्थितीत राणाबाईचा सत्कार करण्यात आला. परंतु त्या फाटक्या बॅनर समोर तिसरेच दृश्य प्रकट झाले होते. तेथील मंचावर चेतन किशोर थोरात हा युवक आपल्या साथिदारांसह कावड मंडळाच्या अध्यक्षांचे सत्कार करीत होता. गेल्या तीन वर्षांपासून तो हा उपक्रम करीत आहे. हे सारे पाहून राणाबाईंनी आपला सत्कार कसाबसा आटोपता घेऊन आणि नंतर अवघ्या दोन मंडळांचा सत्कार करून आपला पसारा आवरता घेतला.
त्यावर तुम्ही नवनीत राणा, खासदार अनुप धोत्रे आणि आमदार भारसाकळे यांचा सत्कार का केला नाही? अशी पृच्छा चेतन किशोर थोरात यांना केली असता “कावड यात्रेच्या धार्मिक प्रयोजनात श्रम करणाऱ्यांचा आम्ही सत्कार करतो. त्यात राजकारण्यांचे काही देणे-घेणे नसल्याने आम्ही नवनीत राणा, खासदार धोत्रे आणि आमदार भारसाखळे यांना महत्त्व दिले नाही” असे उत्तर चेतन किशोर थोरात यांनी दिले.
आता ह्या गमतीजमती आटोपल्या असल्या तरी कावड मार्गावर अंथरलेल्या चटयांचा प्रश्न मात्र जिवंतच आहे. सर्वात मोठा प्रश्न आहे याचे भाडे कोण देणार? पालिका? रस्त्याचा कंत्राटदार? की आमदार भारसाखळे? या ठिकाणी जवळपास दीडशे चटया अंथरल्या होत्या. तीनशे रुपये प्रमाणे हे भाडे होते ४५ हजार रुपये. राजकीय आणि शासकीय परंपरेनुसार असा खर्च कंत्राटदारानेच भागवायचा असतो. त्यामुळे हे भाडेही कंत्राट दारानेच द्यायचे आहे.
महत्त्वाचे म्हणजे शहरातील या रस्ता बांधणीच्या दहा लक्ष रुपये मूल्याच्या प्रत्येक कामाची स्वतंत्र निविदा काढण्याचे शासकीय बंधन आहे. मात्र ही कामे एकत्रित करून एकाच कंत्राटदाराला दिली गेली आहेत. त्याला आमदार भारसाखळे यांची पूर्ण सहमती आहे. त्यामुळे आपापली चिरीमिरी घेऊन पालिका प्रशासनातील अनेक संबंधित घटकांनीही या एकत्रीकरणाला बेकायदेशीर मदत केली आहे.
अर्थात हे काम मिळविताना कंत्रादाराला आधीच बरीच देवघेव करावी लागली आहे. त्यात चटयांच्या भाड्याची ही भर. परंतु कंत्राटदार आपल्या नफ्यात खड्डा न पाडता ही कामे करणार हळू निश्चित आहे.
त्यामुळे ही कामे निकृष्ट होणार यात अजिबात शंका नाही. आणि ह्या कामात आधीच चिरीमिरी घेतल्याने पालिका प्रशासनही या कामातील वैगुण्यावर बोट ठेवणार नाही. त्यामुळे या चटई भाडे प्रकारावर शहरातील जाणकारांनी सजग भूमिका घेण्याची गरज निर्माण झाली आहे.