बांबू क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या ‘त्रिमूर्तीं’चा सत्कार…
बांबू सोसायटी ऑफ इंडिया महाराष्ट्र चॅप्टरचे आयोजन…
नागपूर – शरद नागदेवे
नागपूर – बांबूवर विविध प्रयोग होत आहे. पण मार्केट उपलब्ध होत नाही. बांबूचे ‘मास प्रॉडक्शन’ केले, सामान्यांच्या उपयोगासाठी त्यात संशोधन करून दर्जेदार किफायतशीर उत्पादने तयार केली तर मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल, ग्रामीण व आदिवासींसाठी लाभदायी ठरले व बांबू ‘इकॉनॉमी’ उभी असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
बांबू सोसायटी ऑफ इंडिया, महाराष्ट्र चॅप्टर आणि विदर्भ डेव्हलपमेंट अॅन्ड प्रमोशन कमिटी (व्हीबीडीपीसी) च्यावतीने बांबू क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या नितीन गडकरी यांच्यासह गणेश वर्मा व डॉ. लाल सिंग या त्रिमूर्तींचा सत्कार करण्यात आला.
रविवारी सीएसआयआर नीरीच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला वनराईचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी, महाराष्ट्र बांबू विकास मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्रीनिवास राव, विदर्भ बांबू विकास आणि संवर्धन समिती व बीएसआय एमसीचे अध्यक्ष अजय पाटील व निमंत्रक सुनिल जोशी, महाराष्ट्र चॅप्टरचे डॉ. हेमंत बेडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
बांबू क्रॅश बॅरीयरची निर्मिती करणारे गणेश वर्मा यांच्या कार्याचे नितीन गडकरी यांनी कौतूक केले. रस्ते अपघातांपासून संरक्षण करणारे हे उत्कृष्ट दर्जाचे बांबू क्रॅश बॅरीयर रस्त्यावर लावण्यात अनेक स्तरावर अडचणींचा सामना करावा लागणार आहे. प्रयत्न सुरू असून त्यासाठी नव्याने धोरण तयार करावे लागेल. दर्जात्मक बांबू क्रॅश बॅरीयर तयार करून देणारे कॉन्ट्रॅक्टर तयार करावे लागतील. गणेश वर्मा यांनी त्यासाठीदेखील पुढाकार घ्यावा, असे नितीन गडकरी म्हणाले.
बांबूच्या विविध जातींची लागवड करण्यासाठी ‘बांबू नर्सरी’चे प्रशिक्षण देण्याच्या कार्यशाळा घेणे, त्यासाठी मोठ्या प्रमाणात रोपटे तयार करणे, ते स्वस्तात लोकांना उपलब्ध करून देणे, पडीक जमिनीवर बांबू लावणे यासारखे उपक्रम बांबू सोसायटीने आयोजित केल्यास तयार झालेल्या बांबूला मार्केट उपलब्ध करून देण्याची मी घेईल, असे आश्वासन नितीन गडकरी यांनी यावेळी दिले.
तीन दशकाच्या बांबू क्षेत्रात कार्यरत असून ते माझ्या जीवनाचे मिशन आहे. हे मिशन पुढे नेण्यासाठी युवा पिढीने समोर यावे, नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ बांबू टेक्नॉलॉजीची स्थापना व्हावी, बांबू उत्पादनांना राजाश्रय मिळावा, अशी अपेक्षा करत सुनील जोशी यांनी पुरस्कार विजेत्यांना शुभेच्छा दिल्या. अजय पाटील यांनी प्रास्ताविकातून बांबू सोसायटी ऑफ इंडियाच्या कार्याचा आढावा घेतला.
बांबू हा जीवनाचा आणि आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग असून त्याचा रोजच्या जीवनात उपयोग व्हावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. बांबू हा विषय अभ्यासक्रमात यावा, यासाठी प्रयत्न सुरू असून शासकीय स्तरावर बांबूला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न व्हायला पाहिजे, असे ते म्हणाले. प्रा. उदय गडकरी, आशिष कासवा, महेश मोखा यांनी मानपत्राचे वाचन केले. डॉ. लाल सिंग व गणेश वर्मा यांनी त्यांच्या कार्याची सादरीकरणाच्या माध्यमातून उपस्थितांना माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. कोमल ठाकरे यांनी केले. हेमंत बेडेकर यांनी आभार मानले.
कार्यक्रमाला आशिष नागपूरकर, डॉ. विजय इलोरकर, रमेश डंभारे, मेघा पंचारिया, रवी नाफडे, विजय घुगे, संजय सिंग, राजीव देशपांडे, शुभंकर पाटील, सौरभ मगरे, विवेक सिंग, वंदना टोमे, डॉ. लक्ष्मी कढाव, डॉ. पिनाक दंदे, पराग नागपुरे, शरद नागदेवे, हरविंदर सिंग मुल्ला आदींची उपस्थिती होती.
ग्रीन गोल्ड क्षेत्रातील त्रिमूर्तींचा सत्कार
स्टिलच्या वापराविरूद्ध पर्यावरणपूरक बांबू क्रॅश बॅरीयर वापरण्याच्या आणि अपघात कमी करण्यासाठी भारतीय रस्ते नेटवर्कमध्ये त्यांचा अवलंब करण्याच्या कल्पनेला प्रथम प्रोत्सोहन देणारे नितीन गडकरी यांचा बांबू सोसायटी ऑफ इंडियातर्फे सत्कार करण्यात आला.
सोबतच, बांबूला फ्लाय ऍश डम्पवर वाढण्यास सक्षम करणारे, पडीक जमिनीवर बांबू लागवड करणारे नीरीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. लाल सिंग व औद्योगिक कृषी व्यवसाय, नवोन्मेषक आणि मध्यस्थ दर्शन तत्त्वज्ञानाचे एकनिष्ठ अनुयायी व भव्य सृष्टी उद्योग प्रायव्हेट लिमिटेड, छत्तीसगडचे सीएमडी गणेश वर्मा यांचा नितीन गडकरी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.