बीव्हीजी चे हणमंतराव गायकवाड मार्गदर्शन करणार
सांगली प्रतिनिधी : ज्योती मोरे
मराठा समाज सांगली या संस्थेचे अमृतमहोत्सवी वर्ष व मराठा सेवा संघ प्रणित मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्था महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने बीव्हीजी ग्रूप पुणेचे चेअरमन हणमंतराव गायकवाड यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली सांगली जिल्हा व परिसरातील उद्योजकांचा मेळावा होत आहे.
रविवार दिनांक २५ सप्टेंबर २०२२ रोजी सायंकाळी ४.०० वाजता हा मेळावा मराठा समाज सांस्कृतिक भवन सांगली येथे होत आहे. अशी माहिती मराठा समाज संस्थेचे अध्यक्ष अभिजीत पाटील व मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्था महाराष्ट्र राज्य या संस्थेचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्रसिंह पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मराठा समाज संस्थेच्या अमृत महोत्सवानिमित्त वर्षभर विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. बहुजनांच्या न्यायहक्कांसाठी तसेच प्रबोधनासाठी संस्था नेहमीच अग्रभागी असते. मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्था महाराष्ट्र राज्य ही मराठा सेवा संघ प्रणित संस्था राज्यभरातील मराठा उद्योजकांना एकत्र करून त्यांच्या विकासासाठी कार्यरत आहे. या संस्थेचे कार्य राज्यभर चालते. या संस्थेची वार्षिक सर्व साधारण सभा रविवार दिनांक २५ रोजी होत आहे.
दोन्ही संस्थांच्या वतीने बहुजन समाजातील युवक युवतींनी उद्योग क्षेत्राकडे वळावे यासाठी उद्योजक मेळावा मराठा समाज सांस्कृतिक भवन डॉ आंबेडकर रोड सांगली येथे सायंकाळी ४.०० वाजता आयोजित केला आहे. या मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक बीव्हीजी ग्रूपचे चेअरमन हणमंतराव गायकवाड उपस्थित राहणार आहेत. मराठा व बहुजन समाजातील युवक युवतींनी उद्योगात येण्याची आवश्यकता आहे. पण त्यांना मार्गदर्शन व आर्थिक सहकार्य मिळत नाही. हे मार्गदर्शन मिळण्यासाठी मराठा समाजातील विविध संघटना गेल्या काही वर्षापासून प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत.
मार्गदर्शन शिबीरे व्याख्याने घेतली जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून हा उपक्रम राबविणेत येत आहे. मराठा आरक्षणासाठी आमची लढाई सुरु आहे. परंतु नोकरी मागणारांपेक्षा नोकरी देणारे उद्योजक निर्माण झाले तर समाजाची आर्थिक प्रगती वेगाने होईल आणि समाज सक्षम होईल. त्यासाठी असे उपक्रम घेत आहोत. या उद्योजक मेळाव्यात तरूण, उद्योजक व व्यावसायिक यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन राजेंद्रसिंह पाटील व अभिजित पाटील यांनी केले आहे.