Monday, January 6, 2025
Homeराजकीयमराठा समाजाला मुंबईत यावे लागणे हेच शिंदे-भाजपा सरकारचे मोठे अपयश - नाना...

मराठा समाजाला मुंबईत यावे लागणे हेच शिंदे-भाजपा सरकारचे मोठे अपयश – नाना पटोले…

आरक्षण देण्याच्या केवळ थापा, शिंदे-फडणवीस-पवार सरकार कडून मराठा समाजाची दिशाभूल.

मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करणारे दोन मंत्री आता कुठे लपले ?

एका महिन्यात आरक्षण देण्याची वल्गना करणारे देवेंद्र फडणवीस गप्प का?

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मोठे आंदोलन उभे केले आहे, सरकारने त्यांच्याशी चर्चा केली, राणाभिमदेवी थाटात अनेक घोषणा केल्या. मराठा समाजाला आरक्षण देणारच असे जाहीरपणे सांगितले तरीही अद्याप आरक्षण मात्र दिलेले नाही. सरकार मराठा समाजाची दिशाभूल करत आहे.

मुंबईत येण्याचा इशारा दिल्यानंतरही सरकारने तातडीने पावले उचलली नाहीत. मराठा समाजाला आरक्षणाच्या नावाने केवळ भुलथापा देण्यात आल्या त्यामुळेच मराठा समाजाला मुंबईत यावे लागत आहे, हे शिंदे-भाजपा सरकारचे मोठे अपयश आहे, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

आरक्षण प्रश्नावर शिंदे-भाजपा सरकारचा समाचार घेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, शिंदे-भाजपा सरकारच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांच्याशी सरकारच्या प्रतिनिधींनी अनेकदा चर्चा करुन आश्वासन दिले. सरकारचे दोन मंत्री सातत्याने मनोज जरांगे पाटील यांच्या संपर्कात होते, पण आता हे दोन मंत्री मागील काही दिवसांपासून जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करताना दिसत नाहीत. हे मंत्री आता चर्चा का करत नाहीत?

आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला मुदत दिली होती, ती मुदत संपली, त्यानंतर सरकारने दिलेली तारीखही संपली परंतु अद्याप आरक्षणाचा निर्णय काही झालेला नाही. सरकार मराठा समाजाला केवळ तारीख पे तारीख देत असून हा मराठा समाजाचा घोर अपमान आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, “सत्ता आल्यास एका महिन्यात मराठा समाजाला आरक्षण देतो आणि मराठा समाजाला आरक्षण देण्याची हिम्मत फक्त फडणवीसमध्येच आहे”, अशा वल्गना केली होती, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत कटकारस्थान करून भाजपाने सत्ता मिळवून आज दीड वर्ष झाली तरी देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला नाही. फडणवीस यांची ती राणा भिमदेवी थाटात केलेली गर्जना कुठे गेली?

देवेंद्र फडणवीस व भाजपा मराठा आरक्षणावर आत्ता गप्प का? मराठा आरक्षण देवेंद्र फडणवीस यांनीच दिले होते, असा प्रचार करणारे भाजपाचे पोपटही मराठा आरक्षणावर गप्प आहेत. भारतीय जनता पक्ष हा आरक्षण विरोधी असून ते कोणत्याच समाज घटकाला आरक्षण देणार नाहीत.

आरक्षणाच्या प्रश्नावर भाजपा सरकारने राज्यातील मराठा समाज व ओबीसी समाजात तेढ निर्माण करण्याचे पाप केले आहे. आरक्षणाची ५० टक्के मर्यादा हटवणे व जातनिहाय जनगणना करणे हाच आरक्षणावरील पर्याय असून काँग्रेसने तशी मागणी आहे परंतु भाजपाचा जातनिहाय जनगणना करण्यास विरोध आहे आणि केंद्रातील मोदी सरकार आरक्षणाची ५० टक्के मर्यादा हटवण्याचा निर्णयही घेत नाही, असे पटोले म्हणाले.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: