Wednesday, January 8, 2025
Homeराज्यअण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांतून १ लाख मराठा लाभार्थी उद्योजकांची...

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांतून १ लाख मराठा लाभार्थी उद्योजकांची संकल्पपूर्ती…

अमरावती – दुर्वास रोकडे

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांच्या माध्यमातून 1 लाख मराठा लाभार्थी उद्योजकांची संकल्पपूर्ती झाल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील (मंत्री दर्जा) यांच्या हस्ते सह्याद्री अतिथी गृह, मुंबई येथे सत्कार करण्यात आला.

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांतर्गत आजपर्यत 1 लाख 14 हजार लाभार्थी झाले असून 8 हजार 320 कोटी रुपये बँकांनी व्यावसायिक कर्ज वितरीत केले आहे व त्यापैकी महामंडळाने 832 कोटी रुपये व्याज परतावा केला आहे. आमदार स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांनी मराठा समाजाला आर्थिक निकषावर आरक्षण मिळण्यासाठी बहुमोल योगदान दिले आहे. त्यांचे सुपुत्र नरेंद्र पाटील यांनी महामंडळाच्या अध्यक्षपदी केलेले कार्य अत्यंत कौतुकास्पद व उल्लेखनिय असेच आहे, हे त्यांच्या कार्यप्रणालीवरुन सिध्द होत असल्याचे सांगून मंत्री महोदयांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले.

मराठा समाजाची आर्थिक प्रगती व्हावी यासाठी राज्याचे तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ पुनर्रचित केले. या महामंडळाच्या माध्यमातून जुन्या योजना बंद करुन नवीन सुधारित योजनांची अंमलबजावणी करण्याचे आदेश देवून या महामंडळाच्या अध्यक्षपदी अण्णासाहेब पाटील यांचे सुपुत्र नरेंद्र पाटील यांची नियुक्ती केली.

महामंडळाच्या अध्यक्ष पदाची धुरा हाती घेता नरेंद्र पाटील यांनी राज्यातील विविध जिल्हे व तालुक्यांचा दौरा करुन महामंडळाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी युवकांना उद्योजक होण्यासाठी मार्गदर्शन करुन मराठा समाजातील तरुण-तरुणींना उद्योजकांच्या प्रवाहात सामील केले.

तसेच राष्ट्रीयकृत व सहकारी बँकांमार्फत कर्जपुरवठा होण्यासाठी सर्व संबंधितांच्या बैठका घेवून राज्य सरकारच्या अर्थ विभागाचा व्याज परतावा केला. महामंडळाचे अध्यक्ष श्री. पाटील यांनी मंत्री महोदय तसेच शासनाच्या विविध विभागाचे अधिकारी, राष्ट्रीयकृत व सहकारी बँकांचे प्रमुख, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, अधिकारी-कर्मचारी, लोकप्रतिनिधी, लाभार्थी यांनी तसेच अन्य संबंधितांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: