भाजप उमेदवारांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ होण्याची शक्यता…
मुंबई – राज्यातील ज्या मतदार संघांमध्ये मराठा उमेदवार निवडून येतील, तिथे उमेदवार देण्याचा निर्धार मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रणेते मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.मराठा आंदोलकांच्या या भूमिकेमुळे नवीन सरकार निर्मितीत जरांगे ‘किंगमेकर’ ठरतील, अशी भावना इंडिया अगेन्स्ट करप्शनचे (आयएसी) राष्ट्रीय अध्यक्ष आणि ओबीसी नेते हेमंत पाटील यांनी गुरूवारी (ता.२४) व्यक्त केली.
विशेष म्हणजे जरांगे यांनी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या मतदार संघात मराठा आंदोलनाचे समर्थन करीत आरक्षणाच्या विचाराशी सहमत असलेल्या उमेदवारालाच निवडणूक रिंगणात उतरवून मताधिक्याने निवडून आणण्याचे आदेश दिले आहेत.
जरांगेंच्या या भूमिकेमुळे एससी आणि एसटी बांधवांसह ओबीसींमध्ये देखील ‘जरांगे फॅक्टर’ प्रभावी ठरला असल्याचे पाटील म्हणाले. निवडणुकीत ‘जरांगे फॅक्टर’ १०० टक्के चालणार, असा दावा पाटील यांनी केला.
भाजप ला याचा मोठा फटका बसणार असून विदर्भातील ओबीसी मोठ्या प्रमाणात सत्ताधाऱ्यांविरोधात मतदान करतील.मराठा आणि ओबीसी बांधवांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, मात्र आता निवडणुकीत मतदार समाजभेद्यांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करणार, असा दावा देखील पाटील यांनी केला.
यंदा ची निवडणूक सर्वच अर्थाने वेगळी ठरणार आहे. मतदारांनी आपले मत हे कुणाला द्यायचे, हे अगोदरच ठरवून ठेवल्याने जरांगे यांच्या बाजूने बरेच मतं ‘स्विंग ‘ होतील, असा दावा पाटील यांनी केला.जिल्हा आणि विभागनिहाय उमेदवारांची चाचपणी जरांगे करीत आहेत.येत्या दोन दिवसात योग्य उमेदवारांची घोषणा करीत ते त्यांच्या पुढच्या फळीसही निवडणुकीचा बिगुल फुंकतील,असे पाटील म्हणाले