न्यूज डेस्क : मराठा आरक्षणासाठी गेल्या 17 दिवसांपासून सुरु असलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण अखेर सोडलं आहे. आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंतरवाली सराटीत येऊन जरांगे पटील यांच्याशी 15 मिनिटे चर्चा केली. त्यानंतर जरांगे पाटील यांना ज्यूस पाजला आणि त्यांचं उपोषण सोडलं.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्यावर विश्वास ठेव. मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय मी मागे हटणार नाही, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटील यांना दिलं. त्यामुळे जरांगे पाटील यांनीही जास्त आढेवेढे न घेता उपोषण मागे घेतलं. त्यानंतर जरांगे पाटील यांनी एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्री म्हणून तोंडभरून कौतुक केलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, महसूल मंत्री राधाकृष्ण विखेपाटील, मंत्री गिरीश महाजन, अतूल सावेही होते. तर उपोषण स्थळी मंत्री संदीपान भुमरे आणि माजी आमदार अर्जुन खोतकर आधीच पोहोचले होते.
याआधी रात्री गिरीश महाजन आणि रावसाहेब दानवे यांनी जालन्यात येऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर शेड्यूलमध्ये नसतानाही मुख्यमंत्र्यांनी आज सकाळी जालन्याला जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ते सकाळी पावणे अकराच्या सुमारास जालन्यात पोहोचले. यावेळी त्यांनी मनोज जरांगे यांच्याशी चर्चा केली.