Sunday, December 22, 2024
Homeराज्यविद्युत जनित्रावर डिओ टाकताना अनवधान झाल्याने इसमाचा मृत्यू…

विद्युत जनित्रावर डिओ टाकताना अनवधान झाल्याने इसमाचा मृत्यू…

आकोट – संजय आठवले

पावसाचे वातावरणात विद्युत जनित्राचे खांबांवर चढून त्यावर डीओ टाकताना अनावधान झाल्याने एका इसमाचा मृत्यू ओढवला आहे. त्याचे शरीर स्थूल असून त्याचा एक पाय अधू असल्याने तो विद्युत खांबावर कधीच चढत नसतांनाही यावेळी मात्र पावसाचे वातावरण असुनही त्याने डीओ चढविण्याचा प्रयास केल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

आकोट हिवरखेड मार्गावरील ॲक्सिस बँकेसमोर बागडी परिवार वास्तव्यास आहे. या परिवारात गोपाल बजरंग बागडी हे सुद्धा राहत होते. ह्या परिसरात अनेक तेल गिरण्या, दाळ गिरण्या, कापूस गिरण्या, लहान मोठे कारखाने आहेत. यामध्ये आलेल्या विद्युत बिघाडांसह घरगुती विद्युत बिघाड दुरुस्त करण्याचा त्यांचा व्यवसाय होता. त्यामुळे गोपाल बागडी यांना अनेक ठिकाणी पाचारण होत असे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक २४ ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता चे सुमारास विद्युत काम करणे संदर्भात त्यांना एक फोन आला. त्यानंतर लगेच दोन ईसम त्यांचेकडे आले आणि त्यांना घेऊन गेले.

गोपाल बागडी हे शरीराने स्थूल असून त्यांचा एक पाय अधू होता. त्यामुळे ते विद्युत खांबावर कधीच चढत नसत. परंतु हे काम करताना पावसाचे वातावरण असूनही ते विद्युत जनित्र असलेल्या खांबावर शिडीचे मदतीने चढले. असे करताना त्यांनी वीजप्रवाह बंद न करताच जनित्रावर डिओ चढविला. परंतु ते खाली उतरल्यावर तो डीओ पुन्हा खाली पडला. त्यामुळे गोपाल बागडी पुन्हा वर चढले. हे काम ते ओलेत्या अंगाने करीत असल्याने तेथील बघ्यांनी त्यांना याबाबत टोकले. परंतु त्याकडे दुर्लक्ष करून त्यांनी पुन्हा डिओ चढविण्याचा प्रयास केला.

परंतु यावेळी काळ त्यांची प्रतिक्षाच करीत होता. डिओ चढवितांना गोपाल बागडे यांचे अनावधान झाल्याने त्यांना विद्युतचा झटका लागला आणि ते जनित्रावर कोसळून तेथेच गतप्राण झाले. घटनेची खबर मिळताच आकोट शहर पोलिसांनी घटनास्थळ गाठले. गोपाल बागडी यांचा मृतदेह खाली उतरवून त्याची झडती घेतली गेली आणि पोलिसांनी मृतदेहाचे खिशातील साहित्यासह त्यांचा मोबाईल जप्त केला. या मोबाईलचे माध्यमातून त्यांना कुणी बोलावले? कशाकरिता बोलावले? याचा उलगडा केला जाणार आहे?

गोपाल बागडी यांना एक कन्या, एक पुत्र व पत्नी आहे. त्यांच्या शालीन स्वभावामुळे या परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. परंतु ते खांबावर कधीच चढत नसल्याने ओलेत्या अंगाने यावेळी ते कसे काय चढले? त्यांनी विद्युत प्रवाह खंडित का केला नाही? त्यांनी चढण्याकरिता वापरलेली शिडी त्यांचे मृत्यूनंतर कुठे गेली? असे प्रश्न निर्माण झाले आहेत. महत्त्वाचे म्हणजे हिवरखेड मार्गाने अनेक लहान मोठे कारखाने, तेल, दाल व कापूस गिरण्या आहेत. त्यामुळे या परिसराकडे विद्युत चोरीबाबत नेहमीच संशयाने पाहिले जाते. त्यात हा प्रकार घडल्याने विद्युत विभागाने या परिसराकडे विशेष लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

Sanjay Athavle
Sanjay Athavlehttp://mahavoicenews.com
नमस्कार, मी संजय आठवले रा. खानापूर वेस आकोट जिल्हा अकोला. मी मागील तीस वर्षांपासून पत्रकारिता करित आहे. समाजातील असामाजिक तत्त्वे, अराजकता, भ्रष्टाचार, अन्याय या विरोधात आवाज उचलण्याचा माझा जन्मताच स्वभाव आहे. त्यातूनच महाविद्यालयीन जीवनात वाचनाशी माझा जवळून संबंध आला. आणि तेव्हा निर्माण झालेली वाचनाची आवड आजतागायत कायम आहे. त्यानेच मराठी भाषेचे बऱ्यापैकी ज्ञान झाल्याने वाणिज्य पदवीधर झाल्यानंतर मी छंद म्हणून पत्रकारिता करू लागलो. त्यातील शोध पत्रकारितेत मला अधिक रुची आहे. अनेक रहस्य उलगडून जगापुढे आणणे मला अत्यंत आवडते. आता मी महा व्हाईस न्यूज चा कार्यकारी संपादक म्हणून कार्यरत आहे. महा व्हाईस न्यूजने पत्रकारितेचा फ्रीहँड दिल्याने विविध स्तरातील, विविध क्षेत्रातील जोखमीची पत्रकारिता मी करू शकत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: