अकोला – संतोषकुमार गवई
अकोला जिल्ह्यात आगामी खरीप हंगाम लक्षात घेऊन कृषी निविष्ठा पुरेशा प्रमाणात सर्वदूर उपलब्ध असतील याची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात कृषी निविष्ठा सनियंत्रण समितीची बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते.
अतिरिक्त जि.प. सीईओ विनय ठमके, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे, कृषी विकास अधिकारी मिलींद जंजाळ आदी यावेळी उपस्थित होते. जिल्ह्यामध्ये आवश्यकतेनुसार बियाणे व खताचा पुरवठा व्हावा. रासायनिक खते व बियाण्यामध्ये कोणत्याही प्रकारची भेसळ होणार नाही तसेच कोणत्याही प्रकारची साठेबाजी होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांनी दिल्या. खरीप हंगाम 2024 करिता सोयाबीन बियाणे, कापूस बियाणे मागणीनुसार कंपनीनिहाय उपलब्ध होणारा साठ्याबाबत अहवाल सादर करण्यात आला.
त्यानुसार जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांकडील ग्राम बीज उत्पादन मोहिमेमध्ये एकूण एक लाख 68 हजार 697 क्विंटल कच्चे बियाणे उपलब्ध असून जिल्ह्यासाठी एकूण 61 हजार 687 क्विंटल सोयाबीन बियाण्याची आवश्यकता आहे. सोयाबीन बियाण्याचे प्रस्तावित क्षेत्र दोन लाख 35 हजार हेक्टर आहे.
कापूस पिकाचे प्रस्तावित क्षेत्र एक लाख 35 हजार 500 हेक्टर असून त्याकरता एकूण सहा लाख 77 हजार 500 कापूस बीटी बियाणे पाकिटांची मागणी करण्यात आली आहे. कापूस बियाणे उत्पादक कंपनीकडून पाच लाख 75 हजार पाकिटे पुरवठा करण्याचे नियोजन प्राप्त आहे.
खाजगी कंपनीकडे उपलब्ध असलेल्या सोयाबीन बियाण्याचा पुरवठा करण्याचे एक लाख 5 हजार क्विंटल बियाण्याचे नियोजन आहे. खरीप हंगाम 2024 करिता 91 हजार 687 मे. टन रासायनिक खते पुरवठा करण्याची मागणी केली होती. त्यानुसार कृषी आयुक्तालयाकडून 88 हजार 700 मेट्रिक टन रासायनिक खते पुरवठा करण्याचे आवंटन प्राप्त झाले आहे.
माहे एप्रिल अखेर 4 हजार 355 मे. टन खताचा पुरवठा झालेला असून आज रोजी उपलब्ध साठा बेचाळीस हजार एकशे बावीस मीटर शिल्लक आहे. तसेच जिल्ह्यामध्ये संरक्षित खताचा साठ्यामध्ये युरिया खताचा १ हजार ९५० मे. टन व डीएपी खताचा ७४० मे. टन या दोन रासायनिक खताचा साठा करण्याचे नियोजन आहे. त्यानुसार सध्याच्या स्थितीत २३७ मे टन युरिया खताचा संरक्षित साठा करण्यात आलेला आहे.