Saturday, December 21, 2024
Homeराज्यपहिल्यांदाच महिला वन मजूर भगीनिमार्फत एका महिला वन बल प्रमुखास वनमजूर व...

पहिल्यांदाच महिला वन मजूर भगीनिमार्फत एका महिला वन बल प्रमुखास वनमजूर व वन कामगार यांच्या विविध मागण्यांचे निवेदन सादर…

नागपूर – शरद नागदेवे

नागपूर – वन विभागात होऊ घातलेल्या स्थाई नवीन बारा हजार वन मजुरांचे सरळ सेवा भरतीचे अनुषंगाने वन विभागात अगोदरच बारमाही तसेच हंगामी स्वरुपात भरपूर वर्षांपासून कार्यरत रोजंदारी वन मजुरांच्या विविध मागण्यांचे निवेदन आज दिनांक 05/09/2024 रोजी महारष्ट्र राज्य वनकर्मचारी व वनमजूर संघटनेच्या वतीने संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष डॉ. अजय पाटील यांचे उपस्थितीत श्रीमती शोमिता बिस्वास, प्रधान मुख्य वनसंरक्षक(वन बल प्रमुख) महाराष्ट्र राज्य,

नागपूर यांना देण्यात आले. सर्वात महत्वाचे म्हणजे असे प्रथमच घडले कि, वनविभागातील राज्याच्या प्रमुख पदी विराजमान एका महिलेस आपले विविध अडी अडचणींचे निवेदन देणाऱ्या सुद्धा सामान्य वनमजूर भगिनी होत्या. निवेदनामध्ये समाविष्ट संघटनेच्या सर्व मागण्यांवर डॉ. अजय पाटील यांनी श्रीमती सोमिता बिस्वास यांचे सोबत सविस्तर चर्चा केली.

वन बल प्रमुख यांनी सर्व मागण्याबाबत लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल आणि ज्या मागण्या शासन स्तरावर पूर्ण होणाऱ्या असतील त्याबाबत लवकरच शासन दरबारी प्रस्ताव सादर करून त्याचा पाठपुरावा करण्यात येईल अशी ग्वाही दिली.

संघटने सादर केलेल्या निवेदनामध्ये नवीन वनमजुरांची भरती करण्यापूर्वी शासन निर्णय दिनांक 16/10/2012 च्या निकषांनुसार पात्र सर्व रोजंदारी वन मजुरांना सेवेत कायम करणे, रोजगार हमीच्या नावाखाली सेवेत कायम करण्यापासून वंचित बारमाही वन मजुरांना सेवेत कायम करणे, किमान वेतन दराप्रमाणे तुटक- तुटक स्वरुपात रोजंदारीवर काम करणारे हंगामी वन मजूर, संगणक चालक/ वाहन चालक यांना वार्षिक 150 दिवस सेवेचा निकष लावून सेवेत कायम करणे आणि त्यानंतरच नवीन स्थाई वन मजुरांची भरती करणे इत्यादी मागण्या मांडण्यात आल्या.

नवीन वन मजुरांची भरती करताना स्थानिक उमेदवारांनाच संधी देणे, रोजंदारी बारमाही व हंगामी वन मजुरांना सदर भरतीमध्ये किमान 20 टक्के पदे आरक्षित ठेवणे, कार्यरत रोजंदारी बारमाही व हंगामी वन मजुरांना सदर भरतीमध्ये वयोमर्यादा व शैक्षणिक पात्रतेची अट शिथिल करून शारीरिक अर्हतेत सवलत देणे, स्थाई वन मजूर, बारमाही वन मजूर,

हंगामी वन मजूर, वनरक्षक व वनपाल यांच्या पाल्यांना सदर वन मजूर भरतीमध्ये 20 टक्के पदे आरक्षित ठेवणे, नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जख्मी वन मजूर/वन खबरे तसेच वनरक्षक व वनपाल यांच्या पाल्यांना शैक्षणिक व शारीरिक अर्हतेत सवलत मिळणे, इत्यादी विविध मागण्यांबाबत सविस्तररित्या चर्चा करण्यात आली.

प्रसंगी श्री. अरुण पेंदोरकर, श्री. माधव मानमोडे, श्री. आनंद तिडके तसेच महाराष्ट्र राज्य वनकर्मचारी व वनमजूर संघटनेचे महिला व पुरुष पदाधिकारी कु. श्रीदेवी गेडाम, कु. श्वेता भिवगडे, श्री. प्रकाश सहारे, श्री. अक्षय मारोडकर, श्री. शुभम टेटे, श्री. अविनाश पराते इत्यादी उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: