महायुतीचा स्नेहमीलन सोहळा उत्साहात संपन्न…
बाळापुर – सुधीर कांबेकर
आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये बाळापूर विधानसभा मतदारसंघातून महायुतीचाच उमेदवार निवडून आणायचा आहे. त्यासाठी आपल्या खासदार निधीतून आपण जास्तीत जास्त कामे या मतदारसंघातील बाळापुर व पातुर तालुक्यामध्ये प्रस्तावित केली आहेत. या मतदारसंघात महायुतीचाच आमदार निवडून यावा यासाठी आपण स्वतः व भाजपकडूनही पुरेपूर प्रयत्न केल्या जात आहेत व पुढेही केल्या जातील, असे प्रतिपादन खा. अनुप धोत्रे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलतांना केले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अकोला लोकसभा समन्वयक संदीप पाटील या तिघांचाही वाढदिवसाच्या निमित्ताने शुक्रवार दि. 19 जुलै रोजी स्नेहमिलन सोहळ्याचे आयोजन बाळापुर येथे करण्यात आले होते, या कार्यक्रमात ते बोलत होते.
गेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपा व महायुतीचे उमेदवार खा. अनुप धोत्रे यांना जे मताधिक्य मिळाले त्या मताधिक्यात बाळापुर विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभा समन्वयक संदीप पाटील यांचा महत्त्वाचा वाटा आहे, हे कधीही विसरता येणार नाही. म्हणूनच आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये बाळापुर विधानसभा मतदार संघाची जागा जर राष्ट्रवादी काँग्रेस साठी निश्चित झाली तर या मतदारसंघात महायुतीचे उमेदवार म्हणून संदीप पाटील यांना विजयी करण्यासाठी महायुती मधील सर्व पक्षांनी त्यांच्या पाठीशी ताकदीने उभे राहावे, असे प्रतिपादन आ. अमोल मिटकरी यांनी केले.
पुढे बोलतांना ते म्हणाले की लोकसभा निवडणुकीत महायुती मधील भाजपच्या उमेदवाराला खासदार म्हणून निवडून आणण्यासाठी मनापासून सर्वतोपरी प्रयत्न केले, तसेच प्रयत्न महायुती मधील पक्षांनी त्यांना आमदार बनविण्यासाठी करण्याचे आवाहन आ. अमोल मिटकरी यांनी केले.
या स्नेहमीलन सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे निरीक्षक तुकाराम अंभोरे पाटील, माजी आ. बळीराम सिरस्कार, शिवसेना नेते तुकाराम दुधे, भाजपा जिल्हाध्यक्ष किशोर मांगटे पाटील, शिवसेना जिल्हाध्यक्ष श्रीरंग पिंजरकर, राष्ट्रवादीचे अकोला लोकसभा समन्वयक संदीप पाटील, भाजपा बाळापुर तालुकाध्यक्ष अंबादास घेंगे, पातुर तालुकाध्यक्ष भिकाजी धोत्रे, शिवसंग्राम जिल्हाध्यक्ष दिलीप परनाटे यांच्यासह भाजप शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.