छत्रपती संभाजीनगर – लोकसभा निवडणुकीत रिपाइंमुळे महायुतीच्या अनेक जागा निवडून आल्या आहेत. त्यामुळे आम्हाला दुर्लक्षित करून चालणार नाही. विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या कोट्यातून आम्हाला प्रत्येकी ३-३ जागा द्याव्यात, अशी आमची मागणी आहे, असे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज येथे सांगितले.
रिपाइंच्या स्थानिक कार्यक्रमासाठी ते शनिवारी शहरात आले होते. त्यावेळी पत्रकार परिषदेत आठवले म्हणाले, लोकसभा निवडणुकीत रिपाइंमुळे राज्यामध्ये १७ जागा निवडून आल्या.
पडलेल्या उमेदवारांच्या मतांमध्येही रिपाइंच्या मतांची टक्केवारी जास्त आहे. याचा विचार करून महायुतीच्या नेतृत्वाने रिपाइंला किमान ९ जागा दिल्या पाहिजे. तसे आम्ही १०-१२ जागांचा प्रस्ताव दिला आहे. याशिवाय,’एमएलसी’च्या १२ जागांपैकी १ जागा व २-३ महामंडळांवर आमच्या कार्यकर्त्यांची वर्णी लावली पाहिजे.
बुद्धलेणीला धक्का लागणार नाही
बुद्धलेणीला भेट देऊन भिक्खू संघासोबत चर्चा केली. मराठवाड्यातील बौद्धांचे हे श्रद्धास्थान आहे. यासंदर्भात आपण सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना बोललो तेव्हा त्यांनी या परिसरातील एकाही वास्तुला धक्का लागणार नाही, असे आश्वासन दिले. ही जागा वनविभागाची असून भिक्खू संघाच्या मागण्यांबाबत आपण मुख्यमंत्र्यांना बोलणार आहे.
त्यामुळे बौद्ध अनुयायांनी सोमवारचा महामोर्चा शांततेत काढावा. यावेळी बाबुराव कदम, मिलिंद शेळके, किशोर थोरात, संजय ठोकळ, विजय मगरे, बाळकृष्ण इंगळे, नागराज गायकवाड उपस्थित होते.