मानसोपचार तज्ञ डॉ.मोहना कुलकर्णी आणि सहाय्यक राज्य कर आयुक्त (वस्तू व सेवा कर)डॉ. अर्चना जाधव यांनी साधला संवाद…
अमरावती,दि.१५ मार्च २०२४; ‘सुपरवुमन सिंड्रोम’ मुळे महिला स्वत:ला सिध्द करण्यासाठी मनाच्या अनेक गुंतागुंतीत अडकून जाते,त्यामुळे होणारा त्रास हा आनंदापासून दुर नेणारा आणि अतीशय वेदनादायक असल्याने मनातील गुंतागुंत सोडविणे अत्यंत गरजेचे असल्याचे प्रतिपादन मानसोपचार तज्ञ डॉ.मोहना कुलकर्णी यांनी केले.
तर वर्कींग वुमननी दिलेल्या कामाची जबाबदारी घेत स्वत:ला सिध्द करावे असे प्रतिपादन सहाय्यक राज्य कर आयुक्त अर्चना चव्हाण जाधव यांनी महावितरणच्या महिला कर्मचाऱ्यांशी संवाद साधतांना केले.
महावितरणच्या प्रादेशीक प्रशिक्षण केंद्र अमरावती येथे (दि.१४ मार्च) महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य अभियंता ज्ञानेश कुलकर्णी,तसेच अधीक्षक अभियंते दिपक देवहाते,सुनिल शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना डॉ.मोहना कुलकर्णी म्हणाल्या की, महिलांनी कोणताही विचार करतांना तो वास्तव आहे का?तो उपयोगी आहे का? किंवा आपण ठरविलेले उध्दीष्ठ गाठण्यासाठी आपली पुरेपुर क्षमता वापरतो का ? हे समजून घेतले पाहिजे, नाहीतर आलेल्या अपयशामुळे मनात विचाराची गुंतागुंत तयार होते आणि मनाचे आरोग्य बिघडत असल्याचे त्यांनी सांगीतले.
तर,काळ बदलला आहे,महिलांना पुरूषांची खंबीरपणे साथ मिळते,परंतू महिलांनी रबर स्टँप बनून राहू नये,निर्णय प्रक्रीयेत सामिल व्हावे,त्यासाठी आवश्यक सक्षमता स्वत:मध्ये निर्माण करावी,सारख्या कामासाठी सारखा पगार निश्चितच बरोबर असले तर,त्याप्रमाणे जबाबदारी घेण्याचीही तयारी ठेवावी असे यावेळी डॉ.अर्चना चव्हाण -जाधव यांनी सांगीतले.
यावेळी बोलतांना मुख्य अभियंता ज्ञानेश कुलकर्णी म्हणाले की,नोकरी आणि घर सांभाळतांना महिलांना तारेवरची कसरत करावी लागते.महिलांनी भावनेपेक्षा वास्तविकता समजून घेणे गरजेचे आहे.याशिवाय महिलांना आर्थीक शिक्षीत होणे गरजेचे आहे.
कारण आपात्कालिन परिस्थितीत महिलांना आपल्या कुटूंबांच्या विशेषता आर्थिक व्यवहाराची माहिती असणे गरजेचे आहे.महिलांनी नेहमी जॉंईट अकाऊंट काढण्यासाठी आग्रही रहावे,कार्यालयात काम करतांना खंबीरपणा आणावा,तसेच मुलींनी कर्ता म्हणून समोर येण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले.यावेळी महावितरणच्या महिला अधिकारी ,अभियंता व कर्मचारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाला सहाय्यक महाव्यवस्थापक रूपेश देशमुख,उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मधुसूदन मराठे,उपविधी अधिकारी प्रशांत लहाने,वरीष्ठ व्यवस्थापक विजय पचारे,व्यवस्थापक (मास) कल्पना भुले,व्यवस्थापक (वित्त व लेखा) यज्ञेश क्षीरसागर यांच्यासह महावितरणमध्ये कार्यरत महिला अधिकारी,अभियंते व कर्मचारी उपस्थिती होत्या.कार्यक्रमाचे सुत्रसंचाल प्रतिभा जिवतोडे यांनी केले,प्रास्ताविक दिपाली खोडके यांनी केले,आभार माधुरी भारसाकळे यांनी मानले.