अमरावती – नेपाळची राजधानी काठमांडू येथे नुकताच पार पडलेल्या साऊथ एशियन ऐरोबिक आणि हिप – हॉप चॅंम्पीयनशीप २०२३ या आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या पंच (रेफ्री) म्हणून महावितरणच्या वैशाली अग्नीहोत्री उपस्थित होत्या. त्यांची निवड एशियन फिटनेस एरोबिक्स अँड डान्स फेडरेशन तर्फे करण्यात आली होती.
महावितरणच्या अमरावती परिमंडल कार्यालयाअंतर्गत ग्राहक तक्रार निवारण मंच येथे कनिष्ठ लिपीक म्हणून कार्यरत असणाऱ्या वैशाली उर्फ पल्लवी अग्नीहोत्रीची आंतरराष्ट्रिय पंच म्हणून केलेली कामगीरी ही महावितरणसाठी अभिमानास्पद आहे. याबद्दल मुख्य अभियंता ज्ञानेश कुलकर्णी यांनी वैशाली अग्निहोत्रीचे कौतूक करत अभिनंदन केले.
वैशाली अग्निहोत्री उर्फ पल्लवी नारायण चिखलकर ह्या अमरावती जिल्हा स्पोर्ट्स एरोबिक्स अँड फिटनेस असोसिएशनच्या प्रशिक्षक व सचिव म्हणूनही काम करतात. दिनांक २६ ते २९ डिसेंबर दरम्यान काठमांडू येथे पार पडलेल्या साऊथ एशियन फिटनेस एरोबिक्स अँड हिप- हॉप चॅम्पियनशिप २०२३ स्पर्धेकरीता भारतातर्फे सिनियर कॅटेगरी प्रकारात स्वतःची हिप हॉप व फिटनेस एरोबिक्स करिता टीम घेऊन गेल्या होत्या आणि त्या टिमच्या त्या प्रशिक्षक होत्या.
काठमांडू नेपाळ येथे झालेल्या स्पर्धेमध्ये भारत, बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका व भूतान असे एकूण पाच देश सहभागी झाले होते. तेथे भारतीय टीमला हिप हॉप या क्रीडा प्रकारात गोल्ड मेडल व फिटनेस या क्रीडा प्रकारात सिल्व्हर मेडल प्राप्त झाले. तसेच फर्स्ट विनर ट्रॉफी भारताने जिंकली आहे.