अमरावती,दि.०५ मार्च २०२३; मानवी विकासाला गती देण्याचे काम ऊर्जेने,अर्थात वीजेने केले आहे, हे सर्वमान्य असतांना महावितरणच्या अचलपूर विभागाने आपल्या ग्राहक सेवेची यशस्वी ५० वर्षे पुर्ण केल्याबद्दल अचलपूर विभागाचा सुवर्ण महोत्सव आणि लाईनमन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
विभागीय कार्यालय अचलपूर येथे (काल दि.४ मार्च) रोजी लाईनमन दिन व सुवर्ण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी विभागाच्या विकासात योगदान देणारे तत्कालीन कार्यकारी अभियंते अजय खोब्रागडे,राजेंद्र गीरी,दिपक अघाव,भारतभूषण औघड यांचीही या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलतांना कार्यकारी अभियंता संजय शृंगारे म्हणाले की,१९७३ साली तत्कालीन वीज मंडळात स्थापन झालेल्या अचलपूर विभागाचा विस्तार हा सहा तालुक्यात आहे.विभागाने मेळघाट कुशीत घेतल्याने भौगोलीक परिस्थितीनुसार आलेली आव्हाने सर केलीत.मिश्र ग्राहक संख्या, सर्वाधिक वितरण केंद्रे असलेल्या या विभागाने मेळघाट-जरीदा सारख्या आदिवासी बहुल भागात सेवा देताना सेवेत खंड पडू दिला नाही याचे श्रेय या विभाला योगदान देणाऱ्या सर्व जनमित्रांना जाते.
त्यामुळे विभागाचा सुवर्ण महोत्सव आणि लाईनमन दिन असा दुग्ध शर्करा योग विभागाचा असल्याचे मतही यावेळी त्यांनी व्यक्त केले. काम करतांना सुरक्षेला महत्व देण्याचे आवाहन कार्यकारी अभियंता भारतभूषण औघड यांनी केले. राजेश तीवारी यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. सुवर्णमहोत्सव व लाईनमन दिनानिमित्त जनमित्रांची आरोग्य तपासणी करण्यात आली.यावेळी घेण्यात आलेल्या रक्तदान शिबीराला जनमित्रांचा उत्सफुर्त प्रतिसाद मिळाला.
तसेच अचलपूर विभागातील सर्व जनमित्रांचे यावेळी पुष्प देऊन गौरव करण्यात आला.यावेळी जणमित्र श्री. आठवले, राजेश बूराडे आणि कु.श्वेता विखार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. दोन सत्रात पार पडलेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपकार्यकारी अभियंते चेतन मोहोकारआणि विनय लव्हाळे यांनी केले.सुत्रसंचालन अभिजित सदावर्ती, निलेश मानकर व वंदना भलावी यांनी केले,तर आभार उपकार्यकारी अभियंता जयंत घाटे,सहाय्यक अभियंता राजेश जरोदे यांनी मानले.
या कार्यक्रमाला अतीरिक्त कार्यकारीअभियंता संजय पुरी , उपकार्यकारी अभियंते ज्ञानेश्वर अंबाडकर ,सतिश नंदवंशी,देवेंद्र चौधरी ,मनोज टवलारकर यांच्यासह विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.