पुण्यातील कसबा काँग्रेसचा परंपरागत मतदारसंघ, ६ जण इच्छुक, उद्या मविआची बैठक.
प्रदेश काँग्रेस संसदीय मंडळाच्या बैठकीत कसबा, पिंपरी चिंचवड पोटनिवडणूकीवर चर्चा.
मुंबई – पिंपरी चिंचवड व पुण्यातील कसबा मतदारसंघात विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर झालेली आहे. दोन्ही मतदार संघासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. कसबा हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ असून या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास काँग्रेसकडून ६ उमेदवार इच्छुक आहेत. या दोन्ही जागा महाविकास आघाडी एकत्रित लढणार असून महाविकास आघाडीच्या उदयाच्या बैठकीत यावर निर्णय होईल, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.
प्रदेश काँग्रेस संसदीय मंडळाची बैठक काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे पार पडली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री विश्वजित कदम, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, बस्वराज पाटील, आ. प्रणिती शिंदे, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड, आ. संग्राम थोपटे, प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार, एनएसयुआयचे आमिर शेख आदी उपस्थित होते.
बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, दोन पोटनिवडणुकीसाठी २६ फेब्रुवारीला मतदान होत असून अर्ज भरण्याची शेवटची तारिख ७ फेब्रुवारी आहे. कसबा व पिंपरी चिंचवड या दोन्ही जागांबद्दल आजच्या बैठकीत चर्चा झाली. कसबा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी काँग्रेसकडे ६ इच्छुक उमेदवार आहेत. ही नावे हायकमांडकडे पाठवली जातील व त्याचा निर्णय घेतला जाईल. या दोन्ही जागांसाठी आमची आघाडी असल्याने एकत्रितपणे निवडणूक लढवली जाईल.
एका प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, नाशिक पदवीधर मतदारसंघाबद्दल काँग्रेस पक्षाचे धोरण व निर्णय चुकलेले नाही, योग्य व सविस्तर चर्चा करूनच नाशिकचा निर्णय घेतलेला होता. पक्षाला बदनाम करण्याचे काम कोणी करत असेल तर त्याला उत्तर देऊ. डॉ. सुधीर तांबे यांनाच पुन्हा उमेदवारी देण्यासंदर्भात चर्चा झाली होती व त्याप्रमाणे निर्णय घेतला होता पण डॉ. सुधीर तांबे यांनी शेवटच्याक्षणी काँग्रेस पक्षाशी विश्वासघात केला. भाजपाने दुसऱ्याच्या घरात आग लावण्याचे काम केले त्याला जनतेने धडा शिकवला आहे.