Monday, December 23, 2024
Homeराज्यमहावितरण 'ॲक्शन मोड' वर; वीज चोरटे कारवाईच्या 'रडार' वर..!

महावितरण ‘ॲक्शन मोड’ वर; वीज चोरटे कारवाईच्या ‘रडार’ वर..!

आठ महिन्यात ३१४ कारवाया, एक कोटीचे दंड, ६४ लाख वसूल…

वीज चोरी; शहरात पथकाची दहशत…

अमरावती शहरात महावितरणच्या शहर विभागाने वीज चोरी विरोधात केलेल्या कारवायांत जानेवारी ते ऑगष्ट या आठ महिन्यात ३१४ वीज चोरी प्रकरणात १ कोटीचे दंड आकारण्यात आले असुन २२८ वीज चोरांकडून ६३ लाख ९३ हजार रूपयाचे दंड वसूल करण्यात आले आहे तर, ८६ प्रकरणात कायदेशीर कारवाई करण्याला सुरूवात करण्यात आली आहे.

अमरावती व यवतमाळ जिल्ह्याला वीज चोरीपासून मुक्त करण्यासाठी मुख्य अभियंता ज्ञानेश कुलकर्णी यांनी वीज चोरी विरोधात सतत मोहिम राबविण्याचे निर्देश आहे. त्यानुषंगाने गेल्या काही महिन्यांत अमरावती शहर विभागाकडून कारवायांचा धडाका सुरू असून वीज चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात बहुतांशी यश आले आहे. अद्ययावत तंत्रज्ञानाच्या साथीने पथकातील ‘एक्सपर्ट’ कर्मचारी क्षणात वीज चोरी पकडत असल्याने वीज चोरट्यांचे धाबे दणाणले आहेत.

प्रत्येक घरात उजेड असावा,त्यापासून कोणीही वंचित राहू नये,यासाठी महावितरणकडून घरोघरी विद्युत मीटर लावून अखंडित वीज पुरवठा केला जातो. वीज वापरापोटी दरमहा आकारण्यात येणारे देयक ग्राहकांनी न चुकता अदा करावे असे अपेक्षित आहे.

प्रत्यक्षात मात्र जिल्ह्यातील ग्रामीण भागासह शहरामध्ये विविध ठिकाणी वीज प्रवाहित वाहिनीवर आकोडे टाकून किंवा मीटरशी छेडछाड करून वीज चोरी करण्याचा प्रकार घडत आहे. तो हाणून पाडण्यासाठी अमरावती शहर विभागाच्या पथकाने कंबर कसली असून गोपनिय सूत्राकडून माहिती मिळताच पथक कारवाईसाठी सज्ज होत आहे.

कलम १३५ नुसार कारवाई

वीज चोरी करताना पकडले गेल्यास कायद्यातील तरतुदीस अधीन राहून कलम १३५ नुसार कारवाई केली जाते. पहिल्यांदा तडजोडपोटी आर्थिक स्वरूपातील दंड आकारला जातो; तर दुसऱ्यांदा कारवाई झाल्यास फौजदारी गुन्हा दाखल होऊन वेळप्रसंगी कारावास देखील भोगावा लागू शकतो.

६३ लाख ९३ हजाराचा दंड वसूल

जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांच्या काळात अमरावती शहर विभागाच्या पथकाने वीज चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात कुठलीच कसर सोडलेली नाही. या कालावधीत ३१४ केसेस करून १ कोटी १ लाख ६१हजार १६ रुपये वीज चोरी प्रकरणी दंड आकारण्यात आला आहे,तर २२८ केसेस मध्ये ६३ लाख ९३ हजार इतका दंड वसूल करण्यात आला आहे.

१३ जणांवर एफआयआर

अमरावती शहरातील सर्वच भागामध्ये भरारी पथकाने कारवायांची व्याप्ती तुलनेने वाढविली आहे. याअंतर्गत वीज चोरी करताना आढळलेल्या १३ जणांवर पोलिस ठाण्यांमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: