आकोट – संजय आठवले
आकोट मतदार संघात स्थानिक नसल्याने प्रकाश भारसाखळे यांचे उमेदवारीस मतदार संघातील निष्ठावान भाजप नेते, कार्यकर्ते यांनी कडाडून विरोध केल्यावर त्या साऱ्यांना उमेदवारी करिता अपात्र ठरवून देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवारीची माळ भारसाखळे यांचे गळ्यात घातली. या अपमानाने मनोमन अत्यंतिक दुखावलेल्या नेते कार्यकर्ते यांना जराही महत्व न देता भारसाखळे यांनी त्यातील एकालाही जवळ करण्याचा प्रयत्न केलेला नसल्याने महाराष्ट्र प्रदेश भाजपा उपाध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती झालेले अनिल गावंडे हे पार्सल असलेल्या भारसाखळे यांचे करिता आपली पुण्याई खर्च करतात कि त्यांचे विरोधकांची पाठराखण करतात असे कुतूहल निर्माण झाले असून पेल्यातील हे वादळ अनिल गावंडे यांची सत्वपरीक्षा घेणार असल्याचे दिसत आहे.
आकोट मतदार संघाचा आमदार होण्याचे स्वप्न उराशी बाळगून सन २०१९ मध्ये अनिल गावंडे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली. त्यावेळी ते १५.४१% अर्थात २८ हजार १८३ मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर राहिले. त्यानंतर त्यांनी बच्चू कडू यांचे प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश घेऊन या पक्षाचे महाराष्ट्र राज्याध्यक्ष पद काबीज केले. परंतु पक्षांतर्गत विरोधामुळे आपल्या मर्जीने काम करणे त्यांना अवघड जाऊ लागल्याने त्यांचे मन तेथे फार काळ रमले नाही. त्यामुळे भाजपकडून उमेदवारी मिळविणेकरिता त्यांनी भाजपात प्रवेश केला. परंतु उमेदवारी ऐवजी प्रदेश उपाध्यक्ष पद देऊन भाजपाने त्यांना पक्षात स्थिर केले. हेतू हा कि त्यांची मते भाजपा उमेदवार प्रकाश भारसाखळे यांना मिळावित.
इतिहासाची पाने चाळली असता ध्यानात येते कि, सन २०१९ मध्ये अनिल गावंडे यांनी प्रकाश भारसाखळे यांचेशी स्पर्धा केली होती. सध्या मोठ्या प्रमाणात चर्चिला जाणारा प्रकाश भारसाखळे हे पार्सल असल्याचा मुद्दा त्यावेळी अनिल गावंडे यांनीही उचलून धरला होता. पार्सल असल्याने प्रकाश भारसाखळे यांना दर्यापूर येथे परत पाठविणेकरिता त्यांनी आकाश पाताळ एक केले होते. आताही त्याच मुद्द्यावर प्रकाश भारसाखळे यांना पक्षांतर्गतच जबर विरोध आहे. आताही विरोधक त्या मुद्द्यावर ठाम आहेत. परंतु अनिल गावंडे मागील वेळी अपक्ष होते. आज ते राज्याचे भाजपा उपाध्यक्ष आहेत. त्यांचेकडे राज्याची मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे प्रकाश भारसाखळे यांच्या पार्सल असल्याच्या मुद्द्यावर त्यांना भूमिका घेणे अवघड होणार आहे.
परंतु पार्सल मुद्द्यावर स्थानिक भाजपाई संतप्त आहेत. आगामी काळात अनिल गावंडे यांना आकोट विधानसभा लढवायची आहे. त्यावेळी त्यांना स्थानिक भाजपाचे सहकार्य लागणार आहे. त्यामुळे त्यांना आता दुखावणेही गावंडे यांना महागात पडणार आहे. अशा स्थितीत सामान्य मतदारही भारसाखळे यांच्या पार्सल मुद्द्यावर दात ओठ खाऊन बोलत आहेत. त्यामुळे भाजपा यांच्या नाराजी सोबतच सामान्य जनता ही भारसाखळे यांच्या पार्सल मुद्द्यावर एकवटलेली दिसत आहे. अशावेळी भारसाखळे यांची पाठराखण करणे म्हणजे एक दिव्यच ठरणार आहे. कारण पुढील २०२९ चे निवडणुकी वेळी दर्यापूर मतदार संघ खुला होणार आहे. त्यावेळी भारसाखळे तिथे परत जातील यात तीळ मात्र ही शंका नाही. त्याची तयारी त्यांनी आतापासूनच केली आहे.
दर्यापुरात आपली पकड कायम राहावी म्हणून त्यांनी स्वपक्षाच्या ऊमेदवाराचे विरोधात आपला पित्तू असलेले बुंदिले यांना रवि राणाच्या पाना चिन्हावर उभे केलेले आहे. त्यांचे बॅनर्स आणि दौऱ्यांच्या पोस्टर्स वर भारसाखळे यांचे छायाचित्र झळकत आहे. अंदर की बात ही आहे कि, स्वतःसह बुंदिले यांनाही निवडून आणण्याचे अटीवरच भारसाखळे यांना आकोटची उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे पक्षादेश म्हणून त्यांनी बुंदिले यांना सहकार्य करण्यास वरवर जरी नकार दिला तरी ते वास्तवात या आदेशाचे पालन करणारच नाहीत ही काळ्या दगडावरील पांढरी रेषा आहे. म्हणजे आकोटात स्वतः पार्सल असूनही दर्यापूर येथील स्वपक्षाच्या उमेदवारास पार्सल ठरवून त्याचे विरोधात काम करण्याची भारसाखळे यांची खेळी आहे. त्यामुळे दर्यापूर येथे परत जाईपर्यंत दर्यापूर आपल्याच कब्जात राहणेकरिता त्यांची धडपड सुरु असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
विशेष म्हणजे बुदिले निवडून आल्यास ते भाजपासोबतच राहणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करणेकरिता त्यांची मोलाची मदत होणार आहे. त्यामुळे साहजिकच फडणवीसांचे नजरेत भारसाखळे यांचे महत्त्व वाढणार आहे. त्याच जोरावर भारसाखळे मंत्रीपद मागणार आहेत. त्यामुळे भारसाखळे यांना आतापासूनच दर्यापूरचे वेध लागल्याचे दिसत आहे. म्हणूनच त्यांनी आकोट मतदार संघातील नाराज भाजपाईंना महत्त्व दिलेले नाही. पुढील वेळी आकोट सोडायचेच आहेत तर गेली दहा वर्षे ज्यांच्याशी फटकून राहिलो त्यांचेपुढे आता काय म्हणून नाक घासावे? असा सरळ हिशेब भारसाखळे यांचा आहे. परंतु अनिल गावंडे यांना असे करून भागणार नाही. उलट त्यांना हे नाराज भाजपाई व जनता यांचेशी सांगड घालावीच लागणार आहे.
विशेष म्हणजे अनिल गावंडे हे अहंकार विरहित मनमोकळे व्यक्तिमत्त्व आहे. खिलाडू वृत्ती त्यांची मध्ये ओतप्रोत भिनलेली आहे. जनसेवा हा त्यांचा स्थायीभाव आहे. आकस, सूड हे शब्द त्यांचे शब्दकोशात दिसत नाहीत. कुणालाही पाहून त्यांचे चेहऱ्यावर कधी आठ्या पडल्या किंवा त्यांचा चेहरा आक्रसला असे कधीही आढळलेले नाही. परंतु भारसाखळे यांचे गणित मात्र अगदी उलट आहे. त्यामुळे अनिल गावंडे यांचे सहकार्याने भारसाकळे निवडून आले तरी ते गावंडे यांचे सारखे वर्तन अजिबात करू शकत नाहीत. त्यामुळे अनिल गावंडे यांचे विनंतीवरून भारसाखळे यांना मत देणाऱ्यांची मोठी फसवणूक होणार आहे. म्हणजे पुढील पाच वर्षे ही मंडळी गावंडे यांनाच जात्यापात्यात घालणार हे निश्चित आहे. त्यातच भारसाखळे हे अतिशय अहंकारी आहेत. कुणालाही कोणतेच श्रेय देण्याचा त्यांचा स्वभाव नाही. सहकारी नेतेही कार्यकर्ते यांना कायम जरबेत ठेवणे हा त्यांचा मनपसंत डाव आहे.
अशातच भारसाखळे तिसऱ्यांदा निवडून आले तर त्यांचा अहंकार थेट सातव्या असमानात जाणार आहे .त्यामुळे ते गेली दहा वर्षे वागले त्यापेक्षाही निर्दयपणे वागणार आहेत. त्या वर्तनाचा मनमिळावू आणि लाघवी स्वभावाच्या अनिल गावंडे यांना मोठा त्रास होणार आहे. परिणामी या दोघांचे आपसात खटकेही उडणार आहेत. अर्थात हे सारे अनिल गावंडे यांना कळत नाही असा भाग मुळीच नाही. परंतु पक्षादेश म्हणून त्यांना आपली पुण्याई भारसाखळे यांच्या पारड्यात टाकावी लागणार आहे. परंतु निसत्व माणसाकरिता त्यांनी आपले सत्व वाया घालविणे हे आकोट मतदार संघातील जनता जनार्दनास ग्राह्य होणार नाही हे निश्चित. कारण शेवटी कोणतेही दान हे सत्पात्री घातल्यानेच पुण्यकर ठरते. अपात्री दान घातल्याने त्या दानाचे पुण्य लाभत नाही. हे चिरंतन सत्य साऱ्यांच्याच पूर्वजांनी सांगून ठेवलेले आहे. त्यामुळे पार्सल घ्या मुद्यावर अनिल गावंडे काय भूमिका घेतात हे पाहणे रंजक ठरणार आहे.