सांगली – ज्योती मोरे
सेवाभावी वृत्ती आणि कुशल संघटन याचा वारसा आणि दूरदृष्टी लाभलेलं नेतृत्व म्हणून राज्याचे कामगार तथा सांगली जिह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश (भाऊ) खाडे यांचा नामोल्लेख करावा लागेल. शासन भाजपाचे असो किंवा महाआघाडीचे, मिरज विधानसभा मतदार संघाच्या सर्वांगिण विकासासाठी ते नेहमीच कटीबध्द राहिले आहेत.
या नेतृत्वाने कोरोनातही रुग्णांना लक्षवेधी साथ दिली. मतदार संघातील समस्यांवरही लक्ष केंद्रीत करीत असताना गरजूंना दातृत्वाचाही हात दिला. सध्या तर त्यांनी मंत्री पदाची जबाबदारी स्विकारल्यानंतर कामगारांच्या कल्याणाचा विडा उचलला आहेच, शिवाय सांगली जिह्याचे पालकमंत्री म्हणून जिह्याच्या विकासाचा ध्यास घेऊन कार्यरत झाले आहेत.
मिरज विधानसभा मतदार संघ समस्यामुक्त करण्यात बाजी मारुन आता त्यांनी जिह्याच्या विकासाला चालना देण्याचा निश्चय केला आहे. आज अशाच या लढवय्या नेतृत्वाचा वाढदिवस. त्यानिमित्ताने…..!
मिरज विधानसभा मतदार संघाला आत्तापर्यंत अनेक आमदार लाभले. पण, तळागाळातील जनतेच्या भावना विचारात घेऊन त्यांच्या समस्यांचा निपटारा करण्यात पालकमंत्री डॉ. सुरेश (भाऊ) खाडे यांनी नेहमीच बाजी मारली आहे. सर्वसामान्यांना भेडसाविणाऱया रस्ते, शेती आणि पिण्याचे पाणी, ड्रेनेज, आरोग्य सुविधांना त्यांनी नेहमीच प्रथम प्राधान्य दिले केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांतून गेल्या काही वर्षात कोटय़ावधीचा निधी खेचून आणण्यात ते यशस्वी ठरले आहेत.
म्हैसाळ योजना बारमाही कार्यान्वित व्हावी, यासाठीही त्यांनी सतत पाठपुरावा सुरू ठेवला. अनेकवेळा त्यांच्या या प्रयत्नांना यश आल्याने आज मतदार संघातील ग्रामीण भाग सुजलाम सुफलामतेच्या मार्गावरप्रा. आहे. हे त्यांच्याच यशाचे गमक आहे.
पालकमंत्री डॉ. सुरेश (भाऊ) खाडे यांनी केवळ विकास कामावर भर न देता पक्षीय पातळीवरही भरीव कामगिरी करुन दाखवत राज्यातील भाजपाच्या नेत्यांचे लक्ष वेधून घेतले होते.
मिरज विधानसभा मतदार संघावर आपले वर्चस्व सिध्द करतानाच त्यांनी जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये भाजपाचे कमळ फुलवून या दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्था यशस्वीपणे चालवून दाखविल्या. या संस्थांमध्ये आजही भाजपाचे प्राबल्य असण्यात डॉ. सुरेश (भाऊ) खाडे याचा सिंहाचा वाटा आहे.
त्यांच्या रुपाने एक अभ्यासू, समर्थ आणि सक्षम नेतृत्व जिह्यात भाजपाला मिळाले आहे. प्रलंबित प्रश्नासाठी त्यांच्यासारख्या धडपडय़ा आणि अभ्यासू लोकप्रतिनिधीची गरज होती. डॉ. सुरेश (भाऊ) खाडेनी ती निश्चितच पूर्ण केली आहे. राज्यात पक्षाची सत्ता असो वा नसो त्यांनी मतदार संघाच्या विकासासाठी अव्याहत पाठपुरावा केला.
पालकमंत्री डॉ. सुरेश (भाऊ) खाडे यांच्या अशा अनेक कामांची भाजपा नेत्यांनी दखल घेऊन सध्या त्यांच्यावर राज्याच्या कामगारमंत्री पदाची आणि जिह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी दिली आहे. मिरज विधानसभा मतदार संघाचा कायापालट करण्यात यशस्वी ठरलेले हे नेतृत्व आता जिह्याच्या विकासाचा ध्यास घेऊन कार्यरत झाले आहेत. एक कामगार असलेले डॉ. सुरेश (भाऊ) खाडे आज राज्याचे कामगारमंत्री झाले आहेत.
त्यामुळे कामगारांच्या समस्यांची त्यांना जाणीव असल्याने त्यादृष्टीने त्यांची विकास कामांची व्यूहरचना सुरू आहे. प्रत्येक जिह्यात कामगार भवन आणि कामगारांसाठी रुग्णालय उभारण्याचा त्यांचा मानस आहे. त्या दृष्टीने निधीही उपलब्ध करुन दिला जात आहे.
कामगारमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडत असताना त्यांच्यावर जिह्याच्या पालकमंत्र्यांचीही जबाबदारी आली आहे. गेल्या काही महिन्यात हे धनुष्यबाण त्यांनी यशस्वीपणे पेलल्याचे दिसते. मतदार संघाबरोबर जिह्याचा कायापालट करण्याच्या दृष्टीने उपलब्ध निधीचा योग्य वापर सुरु झाला आहे. निश्चितच याचे फलित जिह्याला अनुभवास येईल, यात तिळमात्र शंका नाही.
कोरोनाच्या कालावधीत तर डॉ. सुरेश (भाऊ) खाडे यांनी शहरातील शासकीय रुग्णालयाला अत्याधुनिक यंत्रसामुग्रीसह आवश्यक बेड उपलब्ध करुन दिले होते. कोरोनाचा उद्रेक विचारात घेऊन त्यांनी रुग्णालय प्रशासनाशी चर्चा करुन आवश्यक असणाऱया गोष्टींची पूर्तता करण्यास प्रथम प्राधान्य दिले होते. मिरज शहरातील रस्त्यांचा प्रश्न गंभीर बनला होता.
महापालिकेतील सत्ताधाऱयांना विश्वासात घेऊन या रस्त्यांसाठी त्यांनी कोटय़ावधी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला. त्यामुळे आज शहरातील प्रमुख रस्त्यांसह गल्ली-बोळातील रस्ते डांबरीकरण झाले आहेत. भविष्यात शहरातील रस्त्यांना कधीही निधी कमी पडणार नाही, अशी हमीच त्यांनी मतदारांना दिली आहे.
शहरातील प्रमुख छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याचा प्रश्नही त्यांनी आवश्यक निधी उपलब्ध करुन देऊन मार्गी लावला आहे. सध्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या आणि शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतलेल्या याच रस्त्याचे काम पालकमंत्र्यांच्या प्रयत्नामुळे प्रगतीपथावर असल्याचे दिसते.
शहरातील रस्त्यांबरोबर भाजी मंडई, तालुका क्रीडा संकुल, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, वारकरी भवन, लक्ष्मी मार्केट इमारत डागडुजी अशा अनेक समस्यांवर आवश्यक निधी उपलब्ध करुन देऊन मात करण्यात पालकमंत्री डॉ. सुरेश (भाऊ) खाडे यशस्वी ठरले आहेत.
महापालिकेच्या अस्तित्वापासून अनेकांनी शहरातील याच प्रश्नावर राजकारण केले. पण प्रत्यक्षात कामे मार्गी लावण्याची किमया पालकमंत्र्यांनी साध्य करुन दाखविली आहे. यापैकी बहुतांशी कामे सध्या पूर्ण झाली असून, काही पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. भाजी मंडईच्या उभारणीने शहरातील रस्त्यावरचा भाजी बाजाराला मोठा आधार मिळणार आहे.
केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनातून सर्वाधिक निधी मिरज मतदार संघाला मिळवून देण्यामध्ये पालकमंत्री डॉ. सुरेश (भाऊ) खाडे यशस्वी ठरले आहेत. त्यामध्ये दलित वस्ती, रस्ते, गटारी, अंगणवाडय़ा, पाणी पुरवठा योजना अशा एक ना अनेक कामांचा समावेश आहे. याशिवाय प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजना,
आरगेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्थिस्मारक, मिरासाहेब दर्गा व कृष्णाघाट मार्कंडेश्वर मंदिराचा विकास, बोलवाड येथील कै. उत्तमराव पाटील जैवविविधता उद्यान, राज्य वन पर्यटन मधून दंडोबा विकास, आरग प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी इमारत, वैद्यकीय सहाय्यता निधी, अपघात मृत्यू निधी, राजीव गांधी विद्यार्थी अपघात अनुदान,
शिपूर गावातील पुल, शासकीय तंत्रनिकेतन कार्यशाळा, व मुलींचे वसतीगृह, शासकीय महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे वसतीगृह, शहरातील सुधारीत ड्रेनेज योजना अशा अनेक कामांसाठी कोटय़ावधी रुपयांचा निधी मतदार संघात आणण्यात पालकमंत्री डॉ. सुरेश (भाऊ) खाडेना यश आले आहे.
मिरजेसारख्या काँग्रेस, समाजवादी आणि डाव्या विचारसरणीचा प्रभाव असलेल्या बालेकिल्ल्यात भाजपाचे ‘कमळ’ फुलेल, असे कधी वाटले नव्हते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनसंघ, शिवसेना या आणि अशा हिंदूत्वादी विचारसरणीच्या अनेक कार्यकर्त्यांच्या पिढय़ा मिरजेत आपल्या विचारांचा आमदार निवडून यावा, असे स्वप्न बघत काळाच्या पडद्याआड गेल्या.
मात्र पाहिलेले स्वप्न सत्यात उतरविण्याची किमया डॉ. सुरेश (भाऊ) खाडे यांनी तीनवेळा प्रचंड मताधिक्याने विजयी होऊन साधली. केवळ आपल्या विजयावर ते कधीच समाधानी राहिले नाहीत. त्यांनी लोकसभेबरोबरच चार विधानसभाही भाजपाच्या ताब्यात येण्यासाठी मोलाचे योगदान दिले.
याशिवाय त्यांनी केलेल्या कामामुळेच मिरज तालुक्यातून जिल्हा परिषदेसाठी घवघवीत यश मिळण्याबरोबर मिरज पंचायत समितीही भाजपाच्या ताब्यात येण्यास डॉ. सुरेश (भाऊ) खाडेचा सिंहाचा वाटा होता.डॉ. सुरेश (भाऊ) खाडेचे मिरज येथील संपर्क कार्यालय नेहमीच कार्यकर्त्यांच्या व सर्वसामान्य जनतेच्या वर्दळीने गजबलेले असते. येथे आलेल्या गोरगरीब आणि गरजू नागरिकांना हाच माणूस आपली समस्या दूर करेल,
असा विश्वास वाटतो. आपल्याकडे आलेला गरजू, मग तो कोणत्याही जातीचा, धर्माचा असो वा कोणत्याही राजकीय पक्षाचा, पालकमंत्री डॉ. सुरेश (भाऊ) खाडे त्यांची समस्या स्वत लक्षपूर्वक ऐकूण, जाणून घेवून मार्गी लावताना दिसतात. त्यामुळे मतदार संघातील प्रत्येक व्यक्ती भाऊंकडून काम पूर्ण होणारच,
या निश्चियाने कार्यालयात येताना दिसतो. सर्वसामान्यांच्या हाकेला ओ देणारा, धावून जाणारा असा मुत्सूद्दी आणि अभ्यासू लोकप्रतिनिधी सुरेशभाऊंच्या रुपाने मिरजेबरोबर आता जिह्याला लाभला आहे. हे जनतेचे भाग्य आहे. अशा या लोकप्रिय कामगार तथा पालकमंत्र्यांना वाढदिवसाच्या लाख-लाख शुभेच्छा….