Saturday, November 23, 2024
HomeMarathi News Todayमहापुरुषांच्या अवमानाविरोधात महाविकास आघाडीचा मुंबईत अतिप्रचंड महामोर्चा...आघाडीच्या 'या' नेत्यांनी भाजपवर केला हल्लाबोल...

महापुरुषांच्या अवमानाविरोधात महाविकास आघाडीचा मुंबईत अतिप्रचंड महामोर्चा…आघाडीच्या ‘या’ नेत्यांनी भाजपवर केला हल्लाबोल…

मुंबई, दि. १७ डिसेंबर

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून सीमावादाचा प्रश्नाने डोके वर काढले असून सीमेवरची गावं शेजारच्या राज्यात जाण्याची मागणी करत आहेत. महापुरुषांचा अपमान, सीमावाद या प्रश्नावर महाराष्ट्रद्र्योह्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचा हा मोर्चा आहे. स्व. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्र स्थापनेचा मंगल कलश आणला तेव्हापासून महाराष्ट्र एकसंध रहावा यासाठी प्रयत्न करण्यात आले पण ईडी सरकार मात्र महाराष्ट्राचे तुकडे करू पहात असून आम्ही ते कदापी होऊ देणार नाही, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे.

महाविकास आघाडीने रिचर्डसन अँड कृडास कंपनी, नागपाडापासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत हल्लाबोल मोर्चा काढला. या मोर्चात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आ. भाई जगताप, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, माजी मंत्री वर्षा गायकवाड, माजी मंत्री अस्लम शेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ, समाजवादी पक्षाचे अबु आझमी, शेकापचे जयंत पाटील प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांच्यासह मविआचे सर्व घटक पक्ष व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनीही मोर्चाला संबोधित केले.

नाना पटोले पुढे म्हणाले की, महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान करण्याचे काम राज भवनातून भगतसिंह कोश्यारी यांच्यापासून सुरु झाले आणि नंतर भाजपाच्या नेत्यांनी सातत्याने तेच काम सुरु ठेवले. भाजपा नेते सातत्याने महापुरुषांचा अपमान करत आहेत यावर जनतेत प्रचंड चीड आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तर कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतीबा फुले यांनी शिक्षण संस्थांसाठी भीक मागितली असे उद्गार काढून महापुरुषांच्या अपमानाचा कळसच गाठला.

मोर्चाला संबोधित करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार म्हणाले की, संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्नावर मुंबईत असे मोर्चे निघत होते आज तशाच पद्धतीचा मोठा मोर्चा निघाला आहे. महाराष्ट्र स्वतंत्र झाला पण काही गावं अजून महाराष्ट्रात आलेली नाहीत त्यासाठी आजही संघर्ष सुरु आहे. आजच्या मोर्चात महाराष्ट्राच्या सन्मानासाठी आपण सर्वजण एकत्र आलो आहोत. सत्तेत असलेले लोक छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करत आहेत ते आम्ही कदापी सहन करणार नाही. काही मंडळींनी महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांचा अपमान केला. शिक्षणाची व्यवस्था नसताना शिक्षणाचे दालन या लोकांनी सर्वसामान्य घरातील मुलांसाठी उघडे केले. त्यांनी भीक मागतिली असे एक मंत्री म्हणतात. हे सरकार आल्यापासून महापुरुषांच्या बदनामीची स्पर्धा सुरु झाली आहे. पण महाराष्ट्रातील जनता अशा लोकांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.

माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले की, बऱ्याच वर्षानंतर देशाने एवढा प्रचंड मोर्चा पाहिला असेल. या मोर्चात मी एकटाच चाललो नाही तर माझ्याबरोबर हजारो लोक महाराष्ट्राद्रोह्यांच्या छाताडावर चालले. आज महाराष्ट्रद्रोही सोडून सर्व पक्ष एकवटले आहेत राज्यपाल हे राष्ट्रपतींचे दूत असतात पण त्या पदावर बसून कोणालाही टपल्या मारायच्या नसतात. कोश्यारी यांना तर मी राज्यपाल मानतच नाही. आग्र्यावरून सुटल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले आणि त्याची तुलना बंडखोरांशी केली जाते, छत्रपतींचे नाव घेण्याचा अधिकारही या लफंग्यांना नाही. महापुरुषांनी भीक मागितली असे म्हणाऱ्यांचे हे वैचारिक दारिद्र्य आहे. आजचा मोर्चा ही सुरुवात आहे आणि महाराष्ट्रद्रोह्यांना गाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही.

विधानसभेतील विरोधी पक्ष नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार म्हणाले की, महाराष्ट्राचा अभिमान कायम ठेवण्यासाठी मविआचा हल्लाबोल मोर्चा आहे. महापुरुषांविरोधात गरळ ओकण्याचे काम भाजपा नेते करत आहेत, याच्या मागचा मास्टर माईंड कोण आहे, हे समोर आले पाहिजे. चुकून बोलले तर माफी मागितली जाते पण भाजपा मात्र जाणीवपूर्वक वक्तव्य करत आहे. यावेळी अजित पवार यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्यावरही निशाणा साधत राज्यपालांना हटवले पाहिजे अशी मागणी केली.
शिवसेनेचे खा. संजय राऊत, समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी, आमदार कपील पाटील, माकपचे नेते यांचीही भाषणे झाली.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: