५ लाख नुकसान भरपाईसह कायम बंदोबस्त करून देण्याची शेतकऱ्याची मागणी…
जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात चंद्रकांत गणोरकर यांची तक्रार..
मुर्तिजापूर – नरेंद्र खवले
मुर्तिजापुर तालुक्यातील ग्राम मधापुरी ग्रामपंचायतीने ईचीनागी या गावाकडे जाणारा पांदण रस्ता सन २०२१ मध्ये तयार केला. यासाठी दोन्हीही बाजूने नाली खोदकाम केल्याने आजूबाजूच्या शेतातील पुराचे पाणी गट क्र १८९ या ३ एक्कर शेतात जात असल्याने पाझर फुटून सिताफळाची बाग व ईतर वाहीत जमिनीचे नुकसान होवून ५ लाख रुपयांच्यावर नुकसान झाल्या बाबतची तक्रार जिल्हाधिकाऱ्यां च्या दालनात करण्यात आली असून झालेल्या नुकसानाची भरपाई मिळवून कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी चंद्रकांत गणोरकर यांनी केली आहे.
शेत गट क्रमांक १८९ हे मौजे मधापुरी मध्ये असून नुकसानीचे शेत ३ एकर आहे. ११ जुलै २०२१ रोजी सकाळी सुमारे ४ वाजता झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतातील पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे ग्रामपंचायत कार्यालय मधापुरी यांनी सन २०२१ मध्ये तक्रार कर्त्याला विश्वासात न घेता शेताच्या धुऱ्याला लागून लोकसहभागातून पानंद रस्ता तयार करताना नाली खोदली.
शेत रस्त्याच्या उंचीपासून ६-७ फुट खोल आहे. आजूबाजूच्या शेतातील सर्व पाणी त्या ठिकाणी जमा होत असल्यामुळे मागील वर्षी , यावर्षी सुद्धा शेताला पाण्याचा पाझर फुटला आहे. तसेच त्या शेताच्या बांधावर वडिलोपार्जित मोठमोठी झाडे आहेत. या नाली मुळे पाणी मुरून झाडे कोलमडून पडून जीवित हानी होऊ शकते .पावसाळ्याच्या कालावधीत शेतात नेहमी पाणी राहत असल्यामुळे पिकांची मशागत करता आली नाही. त्यामुळे खूप नुकसान झालेले आहे. ही नाली कायमस्वरुपी राहील्यास शेत निकस होईल.
या शेतात दीड एकरात सीताफळाची फळबाग आहे व कपाशी आहे. या फळबागेला व कपाशीला स्प्रे करणे, खते देणे, डवरणी करणे , इत्यादी मशागतीची कामे करता आली नाही. काही झाडे पाणी अतिप्रमाणात साचल्यामुळे मरून पडली.याचा कायम स्वरूपी बंदोबस्त न झाल्यास भविष्यात संपूर्ण बाग निकामी होईल.
आज रोजी सीताफळाचा संपूर्ण फुलांचा बहर गळून पडल्यामुळे माझे फक्त सीताफळाच्या बागेचे २ लाखाचे नुकसान झालेले आहे. बागेचे आयुष्य ४ वर्ष आहे. याच बरोबर कपाशीचे सुद्धा नुकसान झालेले आहे. हे सर्व शेतीचे नुकसान पानंद रस्ता केल्यामुळे झालेले आहे. या अगोदर माझ्या शेतीचे कधीच नुकसान झालेले नाही.
संपूर्ण उदरनिर्वाह शेतीचे भरवश्यावर आहे. कुटुंबात ५ व्यक्ती आहे. आर्थिक परिस्थिती खूप खूप हलाकीची आहे . अगोदरच कर्जबाजारी आहे. शेतकरी व त्यांचा मुलगा २०२० मध्ये आजारी असल्यामुळे हातून जवळचा पैसा निघून गेला . सध्या आईचे पायाचे हाड मोडल्यामुळे तिच्या उपचाराकरिता पैसा नाही. तहसीलदार यांनी मंडळ अधिकाऱ्यांना तब्बल १ वर्षानंतर चौकशीचे आदेश यावर्षी १६ सप्टेंबर २०२२ ला दिले आहे. मंडळ अधिकारी यांनी शेताची प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल सादर केला.
मात्र त्याची कोणतीही अंमलबजावणी झाली नाही . म्हणून परिस्थिती जैसे थे आहे. मी वारंवार ग्रामपंचायत सरपंच यांना त्या ठीकाणी नाली खोदल्यास होणाऱ्या परिणामाची जाणीव करून दिली होती. परंतु त्यांनी काहीही ऐकले नाही. वरील सर्व प्रकाराने ५ लाखाचे नुकसान झालेले आहे. आज रोजी नापिकीमुळे झालेल्या व होत असलेल्या नुकसानीमुळे मानसिक खच्चीकरण झाले आहे. कुटुंब दडपणाखाली आले असून भविष्यात माझ्या समोर आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही.
तसे झाल्यास त्या बाबीस प्रशासन जबाबदार राहील . निवेदनावर योग्य ती कार्यवाही करून न्याय देण्यात यावा. तसेच या समस्येचा ताबडतोब कायम स्वरूपी बंदोबस्त करून २ वर्षाची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे चंद्रकांत गणोरकर यांनी जिल्हाधिकारी यांना केली आहे .