1972 प्रमाणे गंभीर स्थिती यंदा जिल्ह्यात होत आहे. धरणे कोरडी होण्याच्या मार्गावर आहे. झालेल्या पावसाने सरासरी अजून गाठली नाही. त्यात भर पावसाळ्याचे तीन महिने निघून गेले आहे.
बुलढाणा जिल्हा आत्महत्याग्रस्त जिल्हा असल्याने जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा तसेच शेतकऱ्यांना दिवसाची अखंडित वीज द्यावी अशी मागणी किसान सेना जिल्हाप्रमुख संदीप गायकवाड यांनी केली आहे.
त्यांनी आज जिल्हाधिकाऱी यांना निवेदन दिले असून. निवेदनात म्हटले आहे की, बुलढाणा जिल्हा मागासलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो. येथील लोकांचे जीवनमान बहुतांशपणे शेतीवर अवलंबून आहे. सध्या स्थितीत पावसाचे प्रमाण खूपच कमी आहे. जिल्ह्यातील महत्त्वाचे पीक सोयाबीन कुठे फुलावर तर कुठे शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे.
अशातच गेल्या वीस दिवसापासून पाऊस गेल्यात जमा झाला आहे. याचा गंभीर परिणाम पिकांवर होणार आहे. जी पिके फुलावर आहेत ती फुलगळ निश्चित आहे. तर ज्या ठिकाणी शेंगा लागत आहे अशा ठिकाणी दाणे भरणे शक्य नाही. तसेच अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे.पिकांनी माना टाकल्या आहेत.
बळीराजा पुढचे हे भीषण संकट आताच स्पष्ठ दिसत आहे. शिवाय जवळ जवळपास धरणात ,विहीरीत, जलसाठा अतिशय कमी झाला आहे. त्यामुळे उन्हाळा देखील अतिशय तीव्र जाण्याचे संकेत आहे. उन्हाळी पिण्याच्या पाण्याची व गुराढोरांच्या चाऱ्याचे नियोजन आत्ताच करावे लागेल ते करावे तसेच लोडशेडिंग बंद करून शेतकऱ्यांना दिवसाची लाईन द्यावी व शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तात्काळ कोरडा दुष्काळजाहीर करावा अशी मागणी किसान सेना जिल्हाप्रमुख संदीप गायकवाड यांनी केली आहे.
निवेदन देतेवेळी किसान सेना उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब उबरहंडे, तालुका प्रमुख संजय काळवाघे,विभाग प्रमुख हरिभाऊ जगताप, प्रा.सुनील बरडे, अरुण ढोरे, अनील गावंडे, विजय शेजोळ, अनील राजपूत, जितेंद्र राजपूत, प्रलाद मोरे,गणेश तायडे, समाधान उबरहंडे,विष्णु ढेमरे,कृष्णा बिडवे, संदीप पवार , सुधाकर भोसले,रमेश गवते, आदी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.