रामटेक – राजु कापसे
नगरधन व रामटेक ला जोडणाऱ्या तालुक्यातील नगरधन ते मानापुर रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने ‘रस्ता का मृत्यूचा’ सापळा अशी परिस्थिती तयार झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याने ग्रामस्थांसह प्रवाशीवर्गाने नाराजी व्यक्त केली आहे.
सुमारे पाच किलोमीटरचा रस्ता हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत येत आहे. या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. नगरधन ते मानापुर रस्त्याची अक्षरश: चाळण झाली असून, प्रवाशी व वाहनचालकांना हा रस्ता डोकेदुखी ठरत आहे. जागोजागी रस्त्यावर खड्डे असल्याने वाहन चालविताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
खड्ड्यांची संख्या मोठी असल्याने खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेकवेळा दुचाकीस्वारांना खड्डे वाचविताना अपघाताला सामोरे जावे लागले आहेत. या रस्त्याने नगरधन व रामटेक हा फक्त पाच किलोमीटर असल्यामुळे वेळेची बचत होते व नागरिकांना लागणाऱ्या गाडीचा इंधनाची बचत होते.
त्यामुळे या रस्त्यावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. नगरधन ते रामटेक येथे जाण्यासाठी हा मार्ग जवळचा व सोयीचा असून, रस्त्याच्या दुरवस्थेमुळे पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच या मार्गाने अवजड वाहनाची वर्दळ मोठी असल्याने डांबरीकरण नेहमीच उखडले जात आहे.
परिसरात मोठी बाजारपेठ असल्याने या ठिकाणी व्यापारी, दुकानदार, शेतकरी, शालेय विद्याथी आदींसह चाकरमनांना याच रस्त्यावरून जीवघेणा प्रवास करावा लागतो. तात्पुरत्या स्वरूपात मलमपट्टीगेल्या दोन ते तीन वर्षांच्या काळात या रस्त्याच्या डागडुजीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने लाखो रुपये खर्च केले आहेत.
मात्र रस्त्याची परिस्थिती जैसे-थे आहे. नागरिकांचा आक्रोश लक्षात घेता कधी-कधी रस्त्याची मलमपट्टी केली जाते. काही दिवसांनंतर पुन्हा खड्डे निर्माण होतात. त्यामुळे या रस्त्याचे नव्याने डांबरीकरण होणे गरजेचे आहे. खड्डे चुकविण्याच्या नादात अपघात घडत आहेत. महिला, प्रवाशी, रुग्ण यांना या रस्त्यावरून प्रवास करणे जिकिरीचे ठरत आहे.
डांबर उखडले गेल्याने माती व धुळीचा सामना करावा लागत आहे. रस्ता कधी दुरुस्त होणार, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहने नादुरुस्त होत आहेत. त्यामुळे प्रवाशांना तसे वाहनधारकांनाही मानसिक, आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे.