Sunday, December 22, 2024
Homeराज्यगणेशोत्सव मंडळांना २०२६ पर्यंत परवाने वैध राहणार; गणेशोत्सव, दहीहंडी उत्सव शांततेत आणि...

गणेशोत्सव मंडळांना २०२६ पर्यंत परवाने वैध राहणार; गणेशोत्सव, दहीहंडी उत्सव शांततेत आणि उत्साहात साजरा करा…विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

गौरी विसर्जनाच्या दिवशी रात्री उशीरापर्यंत विसर्जनाची सवलत.

धीरज घोलप

गणेशोत्सव मंडळांना मागील वर्षी देण्यात आलेले परवाने सन २०२६ पर्यंत वैध असणार आहेत, त्यामुळे त्यांनी यावर्षी नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही. ज्या गणेशोत्सव मंडळांना यापूर्वी परवानगी घेतलेली नाही अशांनी नव्याने अर्ज करावे. तसेच गणेशोत्सव, दहीहंडी तसेच अन्य आगामी सण उत्सव शांततेत आणि उत्साहात साजरा करावा, त्यादृष्टीने सर्वं संबंधित यंत्रणा आणि मंडळांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले. विभागीय आयुक्त कार्यालय येथे आगामी काळात साजरा करण्यात येणाऱ्या गणेशोत्सव, दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्यावतीने तयार करण्यात येणाऱ्या नियमावलीबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी पुणे मनपा आयुक्त श्री. विक्रम कुमार, पुणे शहर पोलीस आयुक्त श्री. रितेश कुमार, जिल्हाधिकारी श्री. डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रमेश चव्हाण, अतिरिक्त पोलीस आयुक्त श्री. प्रवीण पाटील, उपआयुक्त श्री. संदीप गिल व श्री. आर राजा, जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. अंकित गोयल, वाहतूक शाखेचे उपायुक्त श्री. विजयकुमार मगर, विभागीय उपायुक्त श्रीमती. वर्षा उंटवाल, जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. महादेव कासगावडे आदी उपस्थित होते.

यावेळी डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या सुचनेनुसार गणेशोत्सव कालावधीदरम्यान २३, २४, २६, २७ आणि २८ सप्टेंबर या ५ दिवशी रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनीक्षेपकाच्या वापरासाठी सवलत दिली आहे. गौरी विसर्जनाच्या दिवशी रात्री उशीरापर्यंत विसर्जनाची सवलत दिली आहे. नागरिकांनी आपल्या सूचना जिल्हाधिकारी, पुणे मनपा आणि पोलीस आयुक्त कार्यालय यांच्याकडे सादर कराव्यात. प्राप्त सूचनांवर प्रशासनाच्यावतीने सकारात्मक दखल घेऊन त्याचे निराकरण करण्यात येईल.

दहीहंडी या सणाला साहसी खेळ म्हणून मान्यता देण्यात आली आहे. या अनुषंगाने मुंबईच्या धर्तीवर सुरक्षितेतच्यादृष्टीने मंडळाला मार्गदर्शनपर जनजागृतीपर प्रात्यक्षिके घेण्याचे निर्देश देण्यात दिले आहेत. सणाच्या काळात शहरातील कायदा व सुव्यवस्था उत्तम राहील यादृष्टीने पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने नियोजन करावे. शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वाहतूकीचे योग्य व्यवस्थापन करावे, त्यादृष्टीने वाहतूक कोंडीच्या जागेची पाहणी करावी. वाहतुकीतील बदलाबाबत नागरिकांना अवगत करावे. भाविकांना गणेशोत्सव व दहीहंडी बघता यावे यासाठी रस्त्याचा दोन्ही बाजू खुल्या ठेवाव्यात, असे निर्देशही त्यांनी दिले.

पुणे मनपाच्यावतीने बाहेरून येणाऱ्या भाविकासाठी भोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहे, असेही त्या म्हणाल्या. यावेळी प्रशासनाच्यावतीने उत्सव कालावधीत करण्यात येणाऱ्या पूर्वतयारीबाबत पूणे मनपा आयुक्त, जिल्हाधिकारी आदींनी माहिती दिली. गणेशोत्सव मंडळांच्या सूचनांचा प्रशासनाने सकारत्मक निर्णय घ्यावा.

यादरम्यान डॉ. गोऱ्हे यांनी पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसोबत बैठक घेऊन त्यांचे प्रश्न समजून घेतले. पुणे शहरातील सार्वजनिक मंडळाच्या प्रतिनिधींनी केलेल्या सूचनांच्या बाबतीत प्रशासनाच्यावतीने सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. गणेशोत्सव हा दरवर्षी सामाजिक भावनेतून साजरा केला जातो.

प्रशासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या सुचनांचे नागरिकांनी पालन करत सहकार्य करावे, असे आवाहनही उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले. याप्रसंगी पुणे शहरप्रमुख श्री. प्रमोद नाना भानगिरे, सहसंपर्क प्रमुख श्री. अजय बाप्पू भोसले,युवासेना सचिव श्री. किरण साळी, श्री.युवासेना शहरप्रमुख श्री. निलेश गिरमे, श्री. श्रीकांत पुजारी, शिवसेना महिला पदाधिकारी, गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: