पातूर – निशांत गवई
तंबाखू सेवनामुळे होणा-या हानीकारक परिणामांबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने आलेगावातील श्रीमती पद्माबाई जैन इंग्लिश प्रायमरी स्कूलच्या वतीने तंबाखूमुक्त भारत कार्यक्रम राबविण्यात आला. यानिमित्त शनिवारी (दि. 24) रॅली काढून जनजागृती करण्यात आली.
रॅलीमध्ये तंबाखू विरोधी घोषणा असलेले फलक आणि बॅनर घेऊन विद्यार्थ्यांचा उत्साहपूर्ण सहभाग दिसला. ‘तंबाखू सोडूया, नंदनवन फुलवूया’ असा संदेश विद्यार्थ्यांनी रॅलीद्वारे नागरिकांना दिला. श्रीमती पदमाबाई जैन इंग्लिश प्रायमरी स्कूलद्वारे विद्यार्थ्यांसोबतच नागरिकांमध्ये विविध विषयांवर जनजागृती करण्यात येत आहे. तंबाखूमुक्त भारत कार्यक्रमात विद्यार्थ्यांना तंबाखू सेवनापासून होणा-या विविध समस्यांविषयी माहिती देण्यात आली. तंबाखू सेवन हे बरेच आजारासोबतच मृत्यूला निमंत्रण देणारे आहे.
जगामधील दरवर्षी 60 लाख लोकांचा मृत्यू तंबाखू सेवनाने होतो. शाळेतील शिक्षक, शिक्षिका यांनी विद्यार्थ्यांना तंबाखूमुळे होणारे दुष्परिणाम याविषयी सविस्तर माहिती दिली. या रॅलीमध्ये इतर व्यसनांविषयी सुद्धा जनजागृती करण्यात आली. हा कार्यक्रम शाळेचे अध्यक्ष अनिल जैन, मुख्याध्यापक अनंता धाईत, शिक्षक संघपाल कांबळे, नितेश तेलगोटे, फिरोज शेख, ज्ञानेश्वर भाकरे, शिक्षिका सुवर्णा काळपांडे, कविता गिल्ले, मनीषा धाईत, रजनी राऊत, श्रद्धा पस्तापुरे, प्रतिभा महल्ले, कल्पना राऊत, कल्याणी बंड, प्रीती भाकरे, वैष्णवी पोरे, अर्चना वानखडे आदींनीप पुढाकार घेतला.
विद्यार्थ्यांनी घेतली शपथ
‘तंबाखूचे सेवन शरीरासाठी हानीकारक आहे. यापासून वेगवेगळे आजार होतात. आदी माहिती देऊन विद्यार्थ्यांकडून तंबाखूमुक्त भारत शपथ घेण्यात आली. यामध्ये विद्यार्थी आणि शिक्षक, कर्मचारी यांनी मिळून शपथ विधी पार पडला. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी तंबाखूमुक्त भारत होण्यासाठी विविध प्रकारची फलके, बॅनर, घोषवाक्य, बनवून रॅली काढण्यात आली.
अशी दिली शपथ
‘तंबाखू, खर्रा,(जर्दा) धुम्रपान यांच्या दुष्परिणामाची मला जाणीव आहे. म्हणून मी जन्मभर, या व्यसनापासून दूर राहण्याचा संकल्प करीत आहे. माझे घर आणि माझा आजुबाजुचा परीसर तंबाखूमुक्त राहावा. इतरांनी तंबाखूजन्य पदार्थांचा परीत्याग करावा यासाठी मी प्रयत्न करीन. माझे घर, माझे गाव (शहर) आणि माझा महाराष्ट्र तंबाखूमुक्त बनवेल.
तंबाखूविषयी गावात जनजागृती
शहरासोबतच दिवसेंदिवस गावातही तंबाखू, गुटखा, धुम्रपान आदींचे व्यसन मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ते प्रत्येकाच्या आरोग्यासाठी घातक आहे. त्यामुळे आम्ही विद्यार्थ्यांनी रॅलीच्या माध्यमातून गावात जनजागृतीचा प्रयत्न केला. – गौरांक राठोड, विद्यार्थी.
तंबाखूमुक्त गावासाठी प्रयत्न
आमच्या गावातील तंबाखू, धुम्रपान, गुटखा आदींचे व्यसन पूर्णत: नष्ट होऊन आमचे गाव तंबाखूमुक्त म्हणून जिल्ह्यात नावारुपास यावे, अशी आमच्या शाळेची, आमची इच्छा आहे. त्याकरीताच आम्ही आमच्या पातळीवर हा छोटासा प्रयत्न केला आहे. – धनश्री कैलास पस्तापुरे, विद्यार्थीनी