कृषि विद्यापीठात ” नेतृत्व विकास आणि संघ बांधणी उत्कृष्टता : विस्तारकर्त्यांचे सक्ष्ममीकरण ” विषयावर तीन दिवशीय प्रशिक्षण वर्गाचे आयोजन!
अकोला – संतोषकुमार गवई
विस्तार शिक्षण संचालनालय, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला व विस्तार शिक्षण संस्था, आनंद कृषी विद्यापीठ (आनंद) गुजरात यांचा संयुक्त उपक्रम! शाश्वत ग्रामविकासानेच देशाचा सर्वांगीण विकास साध्य होणार असून सर्वांगीण ग्रामविकासा साठी विशेषतः ग्रामीण भागात सेवा देणाऱ्या विस्तारकर्त्यांचा नेतृत्व विकास ही काळाची गरज असल्याचे वास्तविक प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. धनराज उंदीरवाडे यांनी प्रतिपादित केली.
विस्तार शिक्षण संचालनालय, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला व विस्तार शिक्षण संस्था, आनंद कृषी विद्यापीठ (आनंद) गुजरात यांच्या संयुक्त उपक्रमातुन कृषी विज्ञान केंद्रातील विषय तज्ञ व इतर अधिकारी वर्गासाठी ” नेतृत्व विकास आणि संघ बांधणी उत्कृष्टता : विस्तारकर्त्यांचे सक्ष्ममीकरण ” या अतिशय काल सुसंगत विषयावरील तीन दिवशीय प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन प्रसंगी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
जागतिक हवामान बदलाच्या या कालखंडात देशांतर्गत शेती क्षेत्राला आणि एकंदरीतच ग्रामीण भारताला अनेक अनामिक समस्यांचा सामना करावा लागत असतानाच कृषी शास्त्रज्ञांच्या अविरत मेहनतीतून उत्पादित पिकवाणं तथा उत्पादन तंत्रज्ञान आणि यंत्र अवजारांच्या साथीने शेती क्षेत्राला नवसंजीवनीच प्राप्त झाली असल्याचे सांगताना डॉ. धनराज उंदीरवाडे यांनी शाश्वत ग्रामविकासासाठी डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाद्वारे राबविण्यात येत असलेल्या विविधांगी उपक्रमांना उजाळा देत विद्यापीठाचे कार्य अधोरेखित केले तथा तंत्रज्ञान प्रसारासाठी विभाग तथा गाव स्तरावर सेवारत अधिकारी कर्मचारी विस्तारकर्त्यांच्या सकारात्मक मानसिकतेवर गावांचा विकास मोठ्या प्रमाणात अवलंबून असल्याचे आपल्या मार्गदर्शनात सांगतानाच कुलगुरू डॉ. शरद गडाख यांचे अनुभवी, कृतिशील आणि ग्रामविकासाचा ध्यास असलेल्या नेतृत्वात कृषि विद्यापीठाने एकात्मिक प्रयत्नातून शाश्वत ग्रामविकासाचे उपक्रम हाती घेत आदर्श गांव संकल्पना विदर्भात रुजविल्याचे देखील डॉ. उंदीरवाडे यांनी विषद केले व याकरीता सर्वांच्याच सहकार्यांची व सहयोगाची अपेक्षा व्यक्त केली.
शेतकरी सदनातील “कृषी जागर सभागृहात” आयोजित तीन दिवसीय प्रशिक्षण वर्गाचे उदघाटन प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष संचालक विस्तार शिक्षण डॉ. धनराज उंदीरवाडे यांचे सह विषय तज्ञ डॉ. केयूर गर्धारिया, डॉ. रविकुमार चौधरी, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. उमेश चिंचमालातपूरे यांची विचार मंचावर प्रमुख उपस्थिती होती तर प्रा.डॉ. सुहास मोरे, विस्तार कृषि विद्यावेत्ता प्रा. प्रकाश घाटोळ, विद्यापीठ जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे यांचे सह विदर्भातील सर्वच कृषी विज्ञान केंद्रांमधून सहभागी प्रशिक्षणार्थी विषयतज्ञाची सभागृहात उपस्थिती होती.
कृषी विज्ञान केंद्र संबंधित जिल्ह्यासाठी प्रति कृषी विद्यापीठ म्हणून शेतकरी सेवेसाठी कार्य करीत असून विषय तज्ञांच्या नेतृत्व विकास प्रशिक्षणाने कृषी विद्यापीठाला अपेक्षित शेती व शेतकरी हिताचे कार्य करण्यासाठी अधिकारी-कर्मचारी वर्गाला प्रोत्साहन व उमेद मिळणार असून विद्यापीठाचा लौकिक वाढविण्यास मदतच होणार असल्याचे प्रतिपादन मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. उमेश चिंचमलातपूरे यांनी आपल्या प्रास्ताविकात केले.
तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात उपस्थितांना नेतृत्वाची संकल्पना आणि महत्त्व, प्रभावी नेतृत्वासाठी संवाद कौशल्य, मतभेद हाताळणी, सार्वजनिक बोलण्याच्या कौशल्याचे महत्त्व, संस्थेत सकारात्मक वृत्ती कशी निर्माण करावी, प्रभावी शिक्षण आणि विस्तारासाठी संघ बांधणी, संघ व्यवस्थापन, ताणतणावाचे व्यवस्थापन, कामाच्या ठिकाणी नैतिकता जोपासणे, नेतृत्वासाठी प्रेरणा शिकवण्याची आवश्यकता, तथा कार्य जीवनाचे संतुलन व्यवस्थापन यासह सकारात्मक दृष्टिकोनावर गुजरात येथून आलेली तज्ञ चमू कृतीयुक्त प्रशिक्षणाचे माध्यमातून व्यक्तिमत्व विकास साधणार आहेत. उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन मुख्य संपादक प्रा.संजीवकुमार सलामे यांनी केले तर मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ उमेश चिंचमलातपुरे यांनी उपस्थितांचे ऋणनिर्देश केले. प्रशिक्षणाचे यशस्वी आयोजनासाठी विस्तार शिक्षण संचालनालयातील प्रा. कृतिका गांगडे यांचे सह सर्वं अधिकारी कर्मचारी वर्ग अथक परिश्रम घेत आहेत.