केवळ खाना पुर्ती करण्यासाठी दौऱ्याचा घाट कशाला ? आपदाग्रस्तांचा सवाल.
खामगांव – रविवार दि.9 एप्रिल 2023 रोजी खामगांव मतदार संघातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह काही भागात गारपिट झाली त्यानंतर लगेच दुसऱ्या दि.10/04/2023 रोजीचे राज्याचे कृषी मंत्री मा.अब्दुलजी सत्तार हे आपदाग्रस्त़ भागाच्या पाहणीसाठी आले होते. या दौऱ्यात त्यांच्या सोबत मा.खासदार प्रतापराव जाधव व मी स्व़त: देखील होते.
या दौऱ्यात मा.कृषी मंत्र्यांनी वस्तुनिष्ठ़ पंचनामे करण्याचे आदेश दिले व आज पावेतो जवळपास सर्वच गावांचे पंचनामे देखील झाले असे असतांना आज दि.15 एप्रिल 2023 रोजी विरोधीपक्ष नेता अंबादासजी दानवे हे पाहणी साठी आले हे म्हणजे वराती मागून घोडे या म्हणी प्रमाणे आहे अशी तिखट प्रतिक्रीया खामगांव विधानसभा मतदार संघाचे आमदार ॲड आकाश फुंडकर यांनी दिली आहे.
राज्यात मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपा शिवसेनेचे सरकार आल्यापासून उबाठा सेनेच्या नेत्यांना शेतकऱ्यांचा खुपच कळवळा आलेला दिसतो आहे. स्व़त: सत्तेत असतांना शेतकऱ्यांना ना पिक विम्याचा मोबदला मिळाला ना अतिवृष्टीची मदत, न गारपिटीची मदत.
परंतु आता यांचे पुतना मावशीचे प्रेम जागृत झाले असून अतिवृष्टी, वादळ व गारपिट होऊन आज जवळपास 8 दिवस उलटल्यानंतर विरोधी पक्ष नेते दानवे हे आपदाग्रस्त़ भागात कशाची पाहणी करायला गेले असा सवाल खामगांव विधानसभा मतदार संघाचे आमदार ॲड आकाश फुंडकर यांनी विचारला आहे.
राज्यात भाजपा शिवसेनेची सरकार आल्यावर केंद्र सरकारप्रमाणे राज्य़ सरकारने देखील शेतकऱ्यांना दर वर्षाला 6000 रु निधी देण्याची घोषणा केली. परंतु राज्यात अडीच वर्ष उध्दव़ ठाकरे यांच्या नेतृत्वात आघाडी सरकार असतांना यांना शेतकऱ्यांच्या हिताशी काही देणे घेणे नव्हते. शेतकऱ्याना कोणतीही मदत तत्कालीन सरकारने केली नाही. ते केवळ सत्तेसाठी खुर्चीला चिकटून बसले होते.
त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान ज्यांनी केले शेतकऱ्यांना ज्यांनी वाऱ्यावर सोडले ते आज मात्र शेतकऱ्यांसाठी धावून आल्याचा दिखावा करीत आहेत ते ही जेव्हा आज जवळपास सर्वच गावातील पंचनामे पुर्ण झालेले आहेत व लवकरच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात मदत देखील पोहचले. असे असतांना विरोधी पक्ष नेत्यांचा दौरा म्हणजे वराती मागून घोडे असा प्रकार आहे अशीही टिका आमदार ॲड आकाश फुंडकर भाजपा जिल्हाध्यक्ष यांनी केली