स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व त्यानिमित्त हर घर तिरंगा अभियान संपूर्ण देशात उत्साहात साजरा होत असताना, आकोट महसूल प्रशासनातर्फे आकोट तालुक्यातील पारधी व आदिवासी समाजाची वस्ती असलेल्या महागाव येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्हाधिकारी अकोला, उपविभागीय अधिकारी व तहसीलदार, आकोट यांचे मार्गदर्शनाखाली आकोट तहसीलच्या महसूल विभागाचे मंडळ अधिकारी व तलाठी यांचे संकल्पनेतून निघालेला हा कार्यक्रम दिनांक 14 ऑगस्ट रोजी अनोख्या पद्धतीने पार पाडण्यात आला. त्या अंतर्गतया कार्यक्रमात गावातील शाळेत शिकणाऱ्या ६० आदीवासी मुलांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले.
ह्यासोबतच गावातील पारधी व आदिवासी समाजाच्या १०० महिलांना साडीचोळी व तिरंगा देऊन त्यांचा सन्मान व सत्कार करण्यात आला. कार्यक्रमानंतर सर्व शाळकरी विद्यार्थी व गावकरी यांची गावात रॅली देखील काढण्यात आली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळ अधिकारी राजेश बोडखे,प्रशांत सायरे, तलाठी शैलेश मेतकर,किशोर सोलकर,तहसील आकोटचे कर्मचारी सिद्धांत वानखडे व जिनेश फुरसुले यांनी विशेष परिश्रम घेतले.
सदर कार्यक्रमाकरिता, नायब तहसीलदार अविनाश पोटदुखे तसेच गावातील पोलीस पाटील, सरपंच, स्वस्त धान्य दुकानदार आणि इतर नागरिक मोठ्या संख्येने हजर होते. या कार्यक्रमानंतर संपूर्ण गाव व गावातील प्रत्येक घर हे तिरंगामय झाले असून संपूर्ण गावामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.