Monday, December 23, 2024
Homeराज्यछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा बट्ट्याबोळ…सहा वर्षांपासून राज्यातील लाखो शेतकरी कर्जमाफीपासून...

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा बट्ट्याबोळ…सहा वर्षांपासून राज्यातील लाखो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित…

आकोट – संजय आठवले/ अशोक घाटे

सन २०१७ मध्ये युती शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेला सहा वर्ष उलटून गेले. तरीही अजुन पर्यंत राज्यातील लाखो शेतकरी कर्जमाफी पासून वंचित असल्याने ही शासन शेतकऱ्यांची थट्टा करीत असल्याचे मत शेतकरी व्यक्त करीत आहेत.

शेतकऱ्यांना समृद्ध करण्याचा संकल्प करून छत्रपती शिवाजी महाराजांचे नावावर शेतकर्‍यांचा सन्मान करण्याकरिता सन २०१७ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७” ही जाहीर केली. आणि देशाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या कर्जमाफीची प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना अतिशय आनंद व्यक्त केला.

मोठा गाजावाजा करित दि.१८.१०.२०१७ रोजी धनत्रयोदशी च्या दिवशी राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात तत्कालीन पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांचे हस्ते निवडक शेतकऱ्यांचा “जा तुमचं कर्ज माफ झालं तुमचा सातबारा कोरा झालायं आता आनंदात दिवाळी साजरी करा” असे सांगितले. त्यांना कर्ज माफ झाल्याचे प्रमाणपत्र व कपडे देऊन सपत्नीक सत्कार केला होता.

मुंबईत मंत्रालयात मुख्यमंत्री यांचे हस्ते राज्यातील निवडक

शेतकऱ्यांचा असाच सत्कार झाला होता. आता सन २०२३ ची सातवी दिवाळी आली. पण शासनाच्या दुर्लक्षीत पणामुळे व उदासीन धोरणामुळे अजुन पर्यंत राज्यातील ६ लक्ष ५६ हजार शेतकऱ्यांना ५ हजार ९७५ कोटी ५१ लक्ष रुपयांची कर्जमाफी बाकी आहे. सन २०१७ मध्ये योजना जाहीर केली तेव्हा राज्यातील ५० लक्ष ६० हजार शेतकऱ्यांना २४ हजार ७३७ कोटी रुपयांची कर्जमाफी ची रक्कम जाहीर झाली.

त्यानंतर पहिल्या टप्प्यात सन २०१७-१८ मध्ये ४४ लक्ष ४ हजार कर्जखात्यामध्ये १८ हजार ७६२ कोटी वितरीत करण्यात आले. त्यानंतर मधल्या काळात शासनाच्या दुर्लक्षीत पणामुळे सन २०२३ पर्यंत घोषित केलेल्या या कर्जमाफी साठी सहकार व पणन विभागाने पुरवणी मागणी सादर केल्यानंतर बजेट मध्ये ही तरतूदच करण्यात आली नाही.

सन २०२३-२४ या वित्तीय वर्षासाठी फक्त 55 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. म्हणजे बाकी राहिलेल्या
कर्जमाफी च्या एक टक्काही नाही. विशेष हे कि, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करीत देशाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या कर्जमाफीची फक्त घोषणा केली.

आणि फक्त मोठ्या गाजावाजाने शेतकऱ्यांना कर्जमाफ झाल्याचे प्रमाणपत्र देऊन सपत्नीक सत्कार केला. त्यातील असंख्य शेतकरी अजूनही कर्जमाफी पासून वंचित आहेत. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचे नावावर शेतकर्‍यांचा सन्मान करणार्‍या या कर्जमाफी योजनेचा शासनाला विसर तर पडला नाही ना? अशी शंका येत आहे…

धनत्रयोदशी (दि.१०.११.२०२३) ला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकर्‍यांचे आंदोलन…

अडगाव बु.येथील सेंट्रल कृषक सेवा सहकारी सोसायटी चे २४८ पात्र सभासद शेतकरी अजूनही कर्जमाफी पासून वंचित आहेत. आणि विशेष हे कि, यातील चार शेतकर्‍यांचा १८.१०.२०१७ रोजी धनत्रयोदशी च्या दिवशी तत्कालीन पालकमंत्री रणजित पाटील व जिल्हाधिकारी आस्तिकुमार पांडे यांनी “जा तुमचं कर्ज माफ झालं तुमचा सातबारा कोरा झालायं आनंदात दिवाळी साजरी करा” असे सांगत कर्ज माफ झाल्याचे प्रमाणपत्र व कपडे देऊन सपत्नीक सत्कार केला होता.

त्यांचीही सन २०२३ ची सातवी दिवाळी आली तरीही अजून पर्यंत कर्जमाफी झाली नाही. कर्जमाफी नसल्याने त्यांना निलचा दाखला मिळत नाही. त्यामुळेच दुसरे कर्ज किंवा लाभही मिळाला नाही. त्यामुळे गेल्या सहा वर्षांपासून आर्थिक संकटात सापडलेल्या या शेतकऱ्यांनी शासन आमची थट्टा करीत असल्याची भावना व्यक्त केली आहे.

याबाबत अन्याय निवारण कृती समिती अडगाव बु. च्या वतीने शासनाला इशारा दिला आहे कि, दि.१०.११.२३ रोजी धनत्रयोदशी च्या दिवशी पर्यंत सेंट्रल कृषक सोसायटी च्या २४८ शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले नाही, तर सन २०१६ ला धनत्रयोदशी च्या दिवशी तत्कालीन पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांनी दिलेले प्रमाणपत्र व कपड्यांचे अवशेष शासनाला साभार परत करू.

या कर्जमाफी प्रकरणाबाबत
शेतकरी अन्याय निवारण कृती समिती अडगाव बु. ने वारंवार पाठपुरावा केला. परंतु शासनाकडून कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे या आंदोलनानंतरही शासनाला जाग आली नाही, तर कृती समिती च्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल….मनोहरलाल फाफट अध्यक्ष सेंट्रल कृषक सेवा सहकारी सोसायटी अडगाव बु. दि.१८.१०.२०१७ रोजी दिवाळीच्या आदल्या दिवशी माझा व माझ्या पत्नीचा साडीचोळी, ड्रेस तसेचकर्ज माफ झाल्याचे प्रमाणपत्र देऊन तत्कालीन पालकमंत्री रणजित पाटील व जिल्हाधिकारी पांडे यांनी सत्कार केला. परंतु गेल्या सहा वर्षांपासून मला शासनाने कर्जमाफी चा लाभ दिला नाही. त्यामुळे संस्थेकडून मला निलचा दाखला मिळाला नसल्याने माझ कुटुंब आर्थिक संकटात सापडलं आहे…अनिल मधुकर मानकर सत्कार झालेला शेतकरी.

Sanjay Athavle
Sanjay Athavlehttp://mahavoicenews.com
नमस्कार, मी संजय आठवले रा. खानापूर वेस आकोट जिल्हा अकोला. मी मागील तीस वर्षांपासून पत्रकारिता करित आहे. समाजातील असामाजिक तत्त्वे, अराजकता, भ्रष्टाचार, अन्याय या विरोधात आवाज उचलण्याचा माझा जन्मताच स्वभाव आहे. त्यातूनच महाविद्यालयीन जीवनात वाचनाशी माझा जवळून संबंध आला. आणि तेव्हा निर्माण झालेली वाचनाची आवड आजतागायत कायम आहे. त्यानेच मराठी भाषेचे बऱ्यापैकी ज्ञान झाल्याने वाणिज्य पदवीधर झाल्यानंतर मी छंद म्हणून पत्रकारिता करू लागलो. त्यातील शोध पत्रकारितेत मला अधिक रुची आहे. अनेक रहस्य उलगडून जगापुढे आणणे मला अत्यंत आवडते. आता मी महा व्हाईस न्यूज चा कार्यकारी संपादक म्हणून कार्यरत आहे. महा व्हाईस न्यूजने पत्रकारितेचा फ्रीहँड दिल्याने विविध स्तरातील, विविध क्षेत्रातील जोखमीची पत्रकारिता मी करू शकत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: